भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते भास्कर जाधव यांच्यावर भडकल्या. भास्कर जाधव यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल एक विधान केलं. या विधानावरून संताप व्यक्त करत चित्रा वाघ यांनी “अरे भास्कर… आता बस कर…”, म्हणत खडेबोल सुनावले आहेत.
ADVERTISEMENT
ठाण्यातील लोकमान्यनगरमध्ये शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखेचं अनावर करण्यात आलं. यावेळी भास्कर जाधव यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली.
चंद्रशेखर बावनकुळे वेस्ट इंडिजच्या खेळाडूंसारखे; भास्कर जाधव काय बोलले?
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार भास्कर जाधव म्हणाले, “काय म्हणाले बावनखुळे. अध्यक्ष झाल्यानंतर भारीच बोलायला लागला. हे सारखं असं का वागतात म्हणून मी त्यांच्याकडे बघितलं. म्हटलं बावनकुळे तर महाराष्ट्रातील आहेत पण, वाटताहेत वेस्ट इंडिजच्या प्लेअरसारखे. बावनकुळे सारखे उद्धव ठाकरेंवर बोलतात.”
“परवा तर गडी भारीच फोफावला. कुणी तरी म्हटलं व्हिवियन रिचर्डसारखे. ब्रायन लारासारखे दिसतात का तर नाही. मग माझ्या लक्षात आलं की हा कर्टली एब्रोस यांच्यासारखा दिसतो. जुन्या लोकांना माहिती असेल, ते कसे होते. कदाचित बावनकुळे त्यांना लाजवतील. हा वेस्ट इंडिजच्या प्लेअरसारखे दिसतात पण, ते खेळणारे होते. तुम्ही कुणाबरोबर खेळता आहात, उद्धव ठाकरेंबरोबर? एका बॉलमध्ये विकेट कधी काढतील, पत्ता लागणार नाही”, असं विधान भास्कर जाधव यांनी बावनकुळेंबद्दल केलं होतं.
भास्कर जाधवांच्या विधानावर चित्रा वाघ काय म्हणाल्या?
चित्रा वाघ ट्विट करून म्हणतात, “कोण विचारत नाही म्हणून एवढ्या खालच्या दर्जाचं विधान करून लोकांचं लक्ष वेधून घेण्याची तुमची ही तऱ्हा आम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे. पण, किती खाली पडायचं याला पण काहीतरी लिमिट असू द्या!”
हेही वाचा >> Chitra Wagh: “असं वक्तव्य एखादी ‘सटवी’च करू शकेल”, वाघांचा चढला पारा
“तुमच्यासारख्या लोकांनी राजकारणाचा चिखल केलाय..! आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या कामाबद्दल बोलायची तुमच्यात हिंमत नाही, तर आता त्यांच्या वर्णावरून बोलायला लागलात. असे करून तुम्ही फक्त बावनकुळेजी यांचा अपमान करत नाही आहात तर समस्त कृष्णवर्णीयांचा अपमान करताहात”, असं चित्रा वाघ यांनी भास्कर जाधवांवर टीका करताना म्हटलं आहे.
“असो, तुमच्यासारख्या अकार्यक्षम आणि निर्बुद्ध लोकांकडून दुसरी काय अपेक्षा? राजकारणात तुम्ही आलातच आहात स्वतःचे खिसे भरून लोकांना नाव ठेवायला! स्वतःच्या शब्दांची जरा जरी लाज असेल, तर ताबडतोब माफी मागा. बाकी… देव तुमच्यासारख्यांना सद्बुद्धी देवो हीच प्रार्थना”, असा उपरोधिक टोलाही चित्रा वाघ यांनी भास्कर जाधवांना लगावला आहे.
ADVERTISEMENT