CM Devendra Fadnavis On Mla Sunil Shinde: महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांनी कुर्ला बस अपघाताच्या घटनेवर मोठं भाष्य केलं. बेस्टच्या बसेसची दुरावस्था झाली असून या बस अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे या समस्येकडे गांभीर्याने पाहायला पाहिजे, अशी मागणी करत शिंदे यांनी फडणवीस सरकारचा समाचार घेतला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठी प्रतिक्रिया दिलीय. "या अपघातातील सर्व वस्तूस्थिती जाणून घेऊन आयुक्तांना आपण निर्देश दिले आहेत. त्यांनी बेस्टच्या प्रमुखांसोबत बसून योग्य प्लॅन करावा. बेस्टच्या आणि प्रवाशांच्या सेफ्टीच्या संदर्भात देखील आपल्याला उचित उपाययोजना करता येतील. या संदर्भात लेखी निवेदन आपल्याला देता येईल, असं फडणवीस सभागृहात म्हणाले.
ADVERTISEMENT
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे नेमकं काय म्हणाले?
10 डिसेंबर रोजी कुर्ल्यासारख्या विभागात 'बेस्ट' बसच्या माध्यमातून अपघात घडला आणि 7 हून अधिक निष्पाप नागरिकांचा बळी गेला. 14 डिसेंबर 2024 रोजी गोवंडी येथेही शिवाजी नगर जंक्शनजवळ बसच्या धडकेत 25 वर्षीय युवकाचा दुर्देवी मृत्यू झाला. मुंबईतील बेस्ट अपघाताची एकाच आठवड्यातील ही चौथी घटना आहे. गेल्या वर्षभरात जवळपास बेस्ट च्या माध्यमातून 347 अपघात झाले आणि अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला. बेस्टची आर्थिक परिस्थिती पाहता ज्या गाड्यांचं लाईफ संपलं आहे, त्या गाड्या रोडवरून आणता येत नाहीत. तसच नवीन बस खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत, अशा कारणास्तव मुंबईकरांचा जीव धोक्यात येत आहे. त्यामुळे शासनाला माझी विनंती आहे, या सर्व गोष्टींकडे गांभीर्याने पाहायला पाहिजे. बेस्टच्या नादुरुस्त बसमुळे अपघात होत असतील, तर ते दुर्देव आहे.
हे ही वाचा >>Vijay Shivtare: "मंत्रिमंडळात शेवटपर्यंत नाव होतं माझं, अचानक..."; आमदार विजय शिवतारेंच्या विधानामुळे खळबळ
सुनील शिंदे यांच्या प्रश्नाला मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले...
ही घटना अतिशय गंभीर आहे. आम्ही यावर सविस्तर निवेदन करू. त्यानंतर आपण काही उपाययोजनाही केल्या आहेत. या केसमध्ये जे काही घडलं, त्यात टेस्ट केल्यानंतर अल्कहोल वगैरे आढळलं नाही, तरी त्यासंदर्भात रॅन्डम चेकिंग सुरु केलं आहे. मागच्या काळात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, तेव्हा बेस्टसाठी 1300 बसेस विकत घेण्याचा निर्णय झाला. त्याची ऑर्डरही प्लेस करण्यात आली आहे. बेस्टमधील अनेक बसेस खूप जून्या झाल्या आहेत. हे खरं आहे. त्यामुळे नवीन बसेसे खरेदी करण्यासाठी तेराशे बसेसची ऑर्डर प्लेस झालेली आहे. या अपघातातील सर्व वस्तूस्थिती जाणून घेऊन आयुक्तांना आपण निर्देश दिले आहेत. त्यांनी बेस्टच्या प्रमुखांसोबत बसून योग्य प्लॅन करावा. बेस्टच्या आणि प्रवाशांच्या सेफ्टीच्या संदर्भात देखील आपल्याला उचित उपाययोजना करता येतील. या संदर्भात लेखी निवेदन आपल्याला देता येईल.
हे ही वाचा >> Sudhir Mungantiwar: "मंत्रिमंडळात माझं नाव असल्याचं सांगितलं आणि..."; सुधीर मुनगंटीवारांनी सगळंच सांगून टाकलं
ADVERTISEMENT