Devendra Fadnavis Manoj Jarange Patil : महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावेत, मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी सुरू केलेले उपोषण मनोज जरांगे पाटलांनी मागे घेतलं. जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी सरकारला २ जानेवारीपर्यंत वेळ दिला आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे आभार मानले. पण, उपोषणादरम्यान, जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची उठवली. त्यामुळे जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यानंतर फडणवीस काय म्हणतात, याची सगळ्यांना उत्सुकता होती. अखेर फडणवीसांची यावर पहिली प्रतिक्रिया आली आहे. (Devendra fadnavis reaction on Manoj jarange hunger strike)
ADVERTISEMENT
मनोज जरांगे पाटलांनी 25 ऑक्टोबरपासून दुसऱ्या टप्प्यात उपोषण सुरू केले होते. त्यांची मनधरणी करण्यात शिंदे सरकारच्या प्रयत्नांना 2 नोव्हेंबर रोजी यश आले. मराठ्यांना सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावी आणि मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा, अशा मागण्या जरांगे पाटलांनी केल्या. त्यासाठी 2 जानेवारीपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. सरकारकडून आश्वासन मिळाल्यानंतर जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतले.
जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतल्यावर फडणवीस काय बोलले?
मराठा आरक्षणासाठी सुरू केलेले उपोषण मनोज जरांगे पाटलांनी स्थगित केले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मांडलेल्या भूमिकेचा व्हिडीओ रिट्वीट करत आभार मानले.
हे ही वाचा >> “मोदींच्या खिशात आरक्षणाची चावी, जरांगेंनी…”, ठाकरेंचे दहा सवाल
फडणवीस म्हणाले, “मराठा आरक्षणासाठी गेल्या 9 दिवसांपासून उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतल्याबद्दल राज्य सरकारच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. या प्रक्रियेत माजी न्यायमूर्ती न्या. सुनील शुक्रे आणि न्या. मारोती गायकवाड यांनी राज्य सरकारला बहुमूल्य सहकार्य केले, मी त्यांचे विशेष आभार मानतो. माझ्या सर्व सहकारी मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांचेही आभार!”, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी जरांगे पाटलांनी उपोषण सोडल्यानंतर व्यक्त केली.
मनोज जरांगेंनी फडणवीसांना केलं होतं लक्ष्य
उपोषणाला बसल्यानंतर मनोज जरांगेंवर गुणरत्न सदावर्ते यांनी टीका केली होती. देवेंद्र फडणवीसांकडे जरांगेंना अटक करण्याची मागणी केली होती. त्यानंतर मनोज जरांगे फडणवीसांवर टीका करताना दिसले.
“दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी एक उपमुख्यमंत्री काड्या करणारे आहेत”, असं ते म्हणाले होते. इतकंच नाही, तर “त्यांना आयुष्यात दुसरं काय आलंय? घरं कुणी जाळली आम्हाला माहिती नाही. भाजप तुमच्यामुळेच संपत आहे. तुम्ही किती ताकदवर आहे, किती 307 करायचे ते करा”, असा आव्हान जरांगेंनी फडणवीसांना दिले होते.
हे ही वाचा >> मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं अन् CM शिंदे म्हणाले, ‘आम्ही कोणाचीही…’
फडणवीसांचा नामोल्लेख टाळत जरांगे पाटील असंही म्हणाले होते की, “कुणाच्याही धमक्यांना भिणार नाही. तू ये बरं रस्त्यावर… आम्ही तुला शांततेने उत्तर देतो. लोक रस्त्यावर उतरली तर सरकार जबाबदार असेल. त्यातला एक उपमुख्यमंत्री नक्की जबाबदार असेल. आम्ही जर मनावर घेतलं, तर यांचा आवाज पाच मिनिटात बंद होईल”, असं जरांगे पाटील म्हणाले होते.
ADVERTISEMENT