२१ जून रोजी महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ उठलं. शिवसेनेत उभी फूट पडल्यानं थेट सरकारच्या स्थिरतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. गेल्या आठ दिवसात अनेक घटना घडामोडी घडल्या असून या प्रकरणात आता पहिल्यांच भाजपची एन्ट्री झालीये. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आमदारांच्या बंडखोरीपासून ते देवेंद्र फडणवीस-राज्यपाल भेटीपर्यंत काय घडलं?
ADVERTISEMENT
२० जूनला विधान परिषदेची निवडणूक झाली. त्यात भाजपचे पाचही आमदार निवडून आले आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी पक्षात नाराज असलेल्या आमदारांनी आम्हाला मतदान केलं असं सांगितलं. २० जूनच्या रात्रीच राजकीय भूकंप होणार आहे याची कल्पना तेव्हा कुणालाच नव्हती. २१ जूनला तो झाला आणि असा झाला की त्याचे पडसाद अजूनही उमटत आहेत.
२१ जूनला काय समोर आलं?
शिवसेनेतले क्रमांक दोनचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असल्याची बातमी समोर आली एवढंच नाही तर त्यांच्यासोबत काही आमदारही नॉट रिचेबल आहेत असं कळलं. सुरूवातीला दहा आमदार, मग पंधरा आमदार मग २० करत ही संख्या वाढत गेली.हे सगळे जण सुरतमध्ये आहेत ही माहिती समोर आली. महाराष्ट्राच्या राजकारणातील भूकंपाचं केंद्र सुरतमध्ये असल्याची माहिती समोर आली.
२२ जून रोजी एकनाथ शिंदे यांचं बंड तीव्र झालं. शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार सुरतहून गुवाहाटीला निघाले. कार, बसमधून निघत एकनाथ शिंदे आणि त्यांना समर्थन दिलेले आमदार हे सुरत विमानतळावर पोहचले. त्यानंतर हे सगळे आमदार गुवाहाटीच्या रॅडिसन ब्लू हॉटेलमधे पोहचले. त्यानंतर शिवसेना समर्थक राज्यमंत्री बच्चू कडूही गुवाहाटीत पोहचले. गुवाहाटीत पोहचल्यानंतर आपल्यासोबत ४० आमदारांचा दावा केला. तसंच शिवसेनेला आव्हान दिलं.
याच दिवशी बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेना आणि अपक्ष असे मिळून ५० आमदार आहेत असं सांगितलं. याच दिवशी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोना झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर ठाण्यातले ५ आजी-माजी नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले, आणखी नगरसेवकही तयारीत असल्याचं समोर.
२२ जूनला या सगळ्या घडामोडी घडत असताना देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजप नेत्यांची बैठक झाली. तर शरद पवार हे सिल्वर ओक या ठिकाणची बैठक संपल्यानंतर वाय. बी. चव्हाण सेंटरला पोहचले. याच दिवशी संजय राऊत यांनी राजकीय संकटावर राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने असं ट्विट केलं. त्यानंतर काही वेळातच ही बातमी समोर आली की मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही कोरोना झाला.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर दीपक केसरकर यांचं वक्तव्य समोर आलं ज्यात ते म्हणाले होते की शिवसेना-भाजपने एकत्र व्हायला हवं. तर याच दिवशी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर नारायण राणे पोहचले.
एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांचा ‘रात्रीस राजकीय खेळ’?; पहाटे २ ते ४ दरम्यान गुजरातला काय घडलं?
शिवसेनेच्या विधीमंडळ मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले यांची शिंदे गटाने केली विनंती. याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियावर जनतेशी संवाद साधला. तसंच त्यांनी मी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे असं सांगितलं आहे. तसंच आमदारांना हे सांगितलं की तुम्ही माझ्यासमोर या आणि भूमिका मांडा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे लाइव्ह संपल्यानंतर तातडीने वर्षा हे शासकीय निवासस्थान सोडलं तसंच मातोश्री गाठलं.
२२ जूनलाच गुवाहाटीला गेलेले शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख महाराष्ट्रात आले. त्यांनी आपल्याला मारहाण आली असाही आरोप केला. तसंच हे सगळं भाजपचं कारस्थान असल्याचा दावा केला.
२३ जूनला काय काय झालं?
शिवसेनेचे आणखी सहा आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर मातोश्रीवर बैठकांचं सत्र सुरू झालं. प्रियंका गांधी मुंबईत आल्या, विमानतळावर त्यांनी काँग्रेस नेत्यांशी चर्चा केली. गुवाहाटीमध्ये शिवसेना आमदार असलेल्या हॉटेलबाहेर तृणमूल कांग्रेसने आंदोलन केलं. शिवसेनेच्या आमदारांना डांबून ठेवण्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. शिवसेनेचे १७ ते १८ आमदार भाजपच्या ताब्यात असल्याचा आरोप त्यांनी केला.
आमदार संजय शिरसाट यांनी लिहिलेलं पत्र एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलं. मातोश्रीवरच्या बडव्यांचा उल्लेख या पत्रात होता, तसंच मुख्यमंत्री भेटत नसल्याची तक्रारही होती. हे पत्र पोस्ट करत हीच सगळ्या आमदारांची भावना असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. दुसरीकडे मुंबईत मुख्यमंत्र्यांनी गटनेता नेमला हे पत्र स्वीकारल्याचं नरहरी झिरवळ यांनी सांगितलं. सदा सरवणकर यांच्यासह काही आमदार शिंदे गटात गेल्याने शिवसैनिक आक्रमक झाले.
गुवाहाटीत एकनाथ शिंदे यांनी शक्तीप्रदर्शन केलं त्याचा व्हीडिओ समोर आला. त्यानंतर कृषी मंत्री दादा भुसे हेदेखील शिंदे गटात गेले. शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावं अशी आमदारांची इच्छा असेल तर आमदारांनी २४ तासात मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख यांच्यासमोर उपस्थित राहून चर्चा करावी असं आवाहन संजय राऊत यांनी केलं.
एकनाथ शिंदे यांनीच त्यांच्यासोबत जे आमदार आहेत त्यांची यादी जाहीर केली. शिंदे यांनी आपल्यासोबत शिवसेनेचे ३७ आमदार आणि ९ अपक्ष आमदार त्यांनी केला. एवढंच नाही तर सुटका करून पळून आल्याचा दावा नितीन देशमुखांनी केला आहे तो खोटा आहे असंही शिंदे गटाने सांगितलं. शिंदे गटाने त्यासाठीचा फोटोही जारी केला.
शरद पवार मंत्री रातोरात निघून गेले ते कळलं कसं नाही? हे म्हणत गृहखात्यावर नाराज झाल्याची बातमी समोर. वणवण फिरू नका घराचे दरवाजे उघडे आहेत असं संजय राऊत यांचं परत आवाहन. आसाममधील शिवसेनेच्या आमदारांना बंगालमध्ये पाठवा त्यांना पाहुणाचर करू असा टोला ममता बॅनर्जी यांनी लगावला.
शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली त्यात या सगळ्या बंडामागे भाजपच आहे असं सांगितलं. एवढंच नाही तर या बंडामागे भाजप नाही हे अजित पवारांचं वक्तव्य शरद पवार यांनीच खोडून काढलं. तसंच शरद पवार यांनी बंडखोर आमदारांना परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला. तर नारायण राणे यांनी ट्विट करून शरद पवारांनी धमक्या देऊ नयेत हे म्हटलंय.
१२ आमदारांचं सदस्यत्व रद्द करा अशी मागणी करणारं पत्र शिवसेनेच्या मार्फत विधानसभेच्या उपाध्यक्षांकडे केली. तर आम्ही धमक्यांना भीक घालत नाही असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला.
२४ जूनला काय काय घडलं?
बहुमतासाठीचं आवश्यक असणारी संख्या पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला. मात्र पाठिंबा काढण्याचा निर्णय झाला नाही असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. एकनाथ शिंदे यांच्याकडून कुठलाही प्रस्ताव आलेला नाही राज्यातील घडामोडींशी भाजपचा संबंध नाही असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
अजय प्रभू, सुनील चौधरी यांच्याविरोधात कोर्टात जाणार असल्याचं शिंदे गटाने स्पष्ट केलं. शिवसेनेने यानंतर शिंदे गटातील आणखी चार आमदारांचं सदस्य रद्द करावं ही मागणी केली. १२+४ अशा १६ आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी अर्ज करण्यात आला.
आपल्यासोबत कुणीही नाही असं समजून नवी शिवसेना उभी करा हे आव्हान उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला दिलं. तसंच मला या सगळ्याचा वीट आला असून हीच वीट तुमच्या डोक्यात हाणणार म्हणत उद्धव ठाकरे आक्रमक झाले.
नरहरी झिरवळ यांच्याविरोधात आम्ही दोन दिवसांपूर्वीच अविश्वास प्रस्ताव आणला असल्याचं अपक्ष आमदारांनी सांगितलं. शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर आक्रमक होऊ शकतात हे समजल्याने पोलिसांचा हाय अलर्ट लागू. राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले.
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीवर बैठक पार पडली. या दोन नेत्यांमध्ये दोन तास चर्चा झाली. आदित्य ठाकरे यांनी भाषणात मुख्यमंत्री आजारी असतानाची वेळ आमदारांनी बंड करण्यासाठी निवडल्याचा उल्लेख केला.
ठाकरेंचं टेन्शन वाढलं! एकनाथ शिंदे गटाची
सरकारचा पाठिंबा काढण्याची तयारी
२५ जून
‘भोग्यांना हाताशी धरून भाजप स्वतःला महाशक्ती म्हणून मिरवतेय’, सामनातून शिवसेनेचा हल्लाबोल, एकनाथ शिंदेंना बाबा ‘योगराज’ची उपमा देण्यात आली. एकनाथ शिंदे गटाकडून सत्ता स्थापनेसाठी हालचाली; चर्चेसाठी शिष्टमंडळ स्थापन करणार असल्याची माहिती समोर
शिवसेनेत भांडणं लावून राष्ट्रवादी मजा पाहतेय, आमदार संजय शिरसाट यांचा आरोप शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना अॅक्शन मोडमध्ये; आदित्य ठाकरेंचे मुंबईत मेळावे घेण्याचं जाहीर केलं. त्याप्रमाणे त्यांनी आक्रमक मेळावेही घेतले.
शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. एकनाथ शिंदे यांचा नवा आरोप; राजकीय आकसाने मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी बंडखोर आमदारांचे संरक्षण काढले तर गृहमंत्र्यांनी आरोप फेटाळले
बंडखोर आमदार तानाजी सावंतांच्या पुण्यातील कार्यालयाची तोडफोड, शिवसैनिक आक्रमक, सावंत यांच्यासह काही बंडखोर आमदार, खासदारांची कार्यालयं फोडली, ठाण्यात खासदार डॉ श्रीकांत शिंदेंचंही कार्यालय फोडलं, नाशिकमध्येही शिवसैनिक आक्रमक, दादा भुसे आणि सुहास कांदेच्या नावाला काळे फासले, शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागरांविरुद्ध शिवसैनिक आक्रमक, घरावर हल्लाबोल मोर्चा
शिवसेनेच्या बंडाची लढाई आता कोर्टात; शिंदे गट सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याची माहिती समोर आली.
आमदारांप्रमाणे शिवसेनेचे 18 पैकी 10 खासदार बंडखोरीच्या तयारीत, भाजप खासदार प्रताप चिखलीकर यांनी हा दावा केला. तर शिंदे गटाला स्वत: च्या बापाच्या नावानं मतं मागा म्हणत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला. शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांवर कारवाईस सुरुवात; विधानसभा उपाध्यक्षांनी बजावली नोटीस. पक्ष सोडलेला नाही, आम्ही शिवसेनेतच; एकनाथ शिंदे गटाचे स्पष्टीकरण समोर आलं.
एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ ठाण्यात शक्तीप्रदर्शन, श्रीकांत शिंदेही उपस्थित राहिले. ‘मविआ’चा खेळ ओळखा, अजगराच्या विळख्यातून शिवसैनिकांना सोडवण्यासाठी लढतोय; एकनाथ शिंदेंचं नवं ट्विट ‘जे गेले ते गेले…आमचे नवे उमेदवार जिंकण्यासाठी सज्ज आहेत’, आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला विश्वास. शिवसेनेत राजीनामा नाराजीनाट्याला सुरुवात, ठाण्याचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्केंचा राजीनामा. एकनाथ शिंदे समर्थकांचा गुवाहाटीमधील मुक्काम वाढला, हॉटेलचं बुकिंग ३० जूनपर्यंत वाढवण्यात आलं.
उद्धव ठाकरेंनी सांगावं गुवाहाटीत आलेला कोणता आमदार तुमच्या संपर्कात? एकनाथ शिंदे यांचं आव्हान
२६ जून
नरहरी झिरवळ यांचा भन्नाट फोटो पोस्ट करत संजय राऊत यांनी आमदारांना यावंच लागेल या आशयाचं ट्विट केलं. शिवसेनेत झालेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर सिल्वर ओकवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक आणि खलबतं सुरू झाली. बंडखोर आमदारांमध्ये हिंमत असेल तर राजीनामा द्यावा असं आव्हानच संजय राऊत यांनी दिलं. बंडखोर आमदारांना केंद्र सरकारने वाय सुरक्षा पुरवली. आमदारांच्या घरांबाहेर CRPF चे जवान तैनात करण्यात आले.
बंडखोरांना विधानसभेची पायरी चढू देणार नाही असं आदित्य ठाकरेंनी बंडखोरांना सुनावलं. शिवसेनेच्या बंडखोर गटावर कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई शक्य आहे असं शिवसेनेने स्पष्ट केलं. बंडखोरांना आपला गट एखाद्या पक्षात विलीन करावा लागेल असंही सांगण्यात आलं. ठाकरे सरकार जो निर्णय घेईल तो मान्य आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं.
महाराष्ट्रातल्या राजकीय भूकंपाचा खेळ सुप्रीम कोर्टात गेला. अपात्रतेच्या कारवाईविरोधात शिंदे गटाने थेट सुप्रीम कोर्टात य़ाचिका दाखल केली. आमच्या जिवाला धोका आहे अशी दुसरी याचिकाही दाखल केली. एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने हरिश साळवे तर ठाकरे सरकारकडून कपिल सिब्बल कोर्टात समोर येणार हे स्पष्ट झालं.
बंडखोर आमदारांचा आत्मा मेला आहे त्यांची फक्त जिवंत प्रेतं इथे येतील हे वक्तव्य त्यांनी केलं होतं. ज्यानंतर एकनाथ शिंदे यांचं एक ट्विट समोर आलं ज्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना वाचवताना प्राण गेला तरी बेहत्तर ते आम्ही आमचं भाग्य समजू असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं.
२७ जून
सुप्रीम कोर्टाने बंडखोर आमदारांना ११ जुलैपर्यंत दिलासा दिला. त्यामुळे आता सत्तासंघर्षाचा पुढचा अंक हा राजभवनात दिसण्याची चिन्हं आहेत. १६ आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईला संरक्षण दिल्याने शिंदे गटानेही हालचाली सुरू केल्या. तर इकडे मुंबईत भाजपच्या आमदारांचीही बैठक आणि खलबतं सुरू झाली.
उद्धव ठाकरे यांनी २१ आणि २२ जून रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची तयारी केली होती मात्र शरद पवार यांनी रोखलं अशी बातमी सूत्रांच्या हवाल्याने समोर आली. तर राज्यातल्या अस्थिर स्थितीवर आमची वेट अँड वॉचची भूमिका आहे असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
२८ जूनला काय झालं?
भाजपचं सरकार येईल तुमचं नाही असं सामनातून बंडखोर गटाला सुनावण्यात आलं. एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच गुवाहाटीच्या रॅडिसन ब्लू हॉटेलच्या बाहेर आले त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि आमच्यापैकी कुणीही उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात नाही हे सांगितलं. तसंच बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनाच आम्हाला पुढे घेऊन जायची आहे असं त्यांनी सांगितलं.
महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासह विविध मागण्यांसाठी शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंडखोरी केली. गेल्या आठवडाभरापासून राजकीय नाट्य रंगलं असून, दिवसागणिक राजकीय नाट्याला वेगळं वळण मिळताना दिसत आहे.देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत असताना आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्याबाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे. आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत. आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो. कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही. माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे. आपण या माझ्या समोर बसा. हे आवाहन केलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आवाहनानंतर एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. फडणवीसांनी आता बहुमत सिद्ध करण्याची मागणी केलीये.
मागच्या आठ दिवसात या सगळ्या घडामोडी आत्तापर्यंत घडल्या आहेत. आता हे सत्तानाट्य कुठे जातं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT