Maharashtra New CM: मुंबई: राज्यात महायुतीचं सरकार आल्यापासून एकाच विषयाची चर्चा सुरू होती की, राज्याचा मुख्यमंत्री कोण? यावरच सर्वांचं लक्ष लागून होतं. अखेर काल मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा झाली. त्यानंतर आज (5 डिसेंबर) मुंबईतील आझाद मैदानावर फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
ADVERTISEMENT
महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून आता देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे. दिल्लीत अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचं नाव निश्चित झालं. पण एकनाथ शिंदे हे मात्र गृहमंत्री पदासाठी अडून बसले होते. पण त्यांची समजूत काढत त्यांना सरकारमध्ये सामील होण्यास राजी करण्यात आलं. राज्यात 23 नोव्हेंबर रोजी लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये भाजपल्या तब्बल 132 जागा मिळाल्या. याचंच यश हे त्यांना मिळालं आहे. यामुळेच देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली आहे.
हे ही वाचा>> Eknath Shinde: आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी, एकनाथ शिंदेंनी राज्यपालांना दिलं 'ते' पत्र!
लोकसभेमध्ये धक्का बसल्यानंतर महायुतीमधील पक्षांनी सक्रीय होत मोठ्या ताकदीने विधानसभेची तयारी केली होती. ज्यामध्ये लाडकी बहीण ही योजना महायुतीसाठी खऱ्या अर्थाने गेमचेंजर ठरली. पण या भरघोस यशानंतर महायुतीचा मुख्यमंत्री कोण असणार याबद्दल वेगवेगळे अंदाज वर्तवले जात होते. मात्र सर्वांवर मात करत महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
राज्यात यंदा महायुतीला घवघवीत यश मिळालं असून, एकट्या भाजपने 132 जागांवर विजय मिळवला तर महायुतीने 233 जागा मिळवल्या आहेत. एकूणच महायुतीने महाविकास आघाडीला अक्षरश: धोबीपछाड दिल्याचं पाहायला मिळालं. राज्यात मागच्या पाच वर्षामध्ये घडलेल्या घडामोडी आणि दोन प्रादेशिक पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर होणारी ही निवडणूक अत्यंत महत्वाची होती.
हे ही वाचा>> Maharashtra CM Oath Ceremony LIVE updates : शपथ घेण्याआधी फडणवीसांकडून गोमातेचं पूजन
पहिल्यांदाच राज्यात सहा मोठे पक्ष आणि वंचित, मनसे, परिवर्तन महाशक्तिसारखे छोटे पक्ष आणि आघाड्या स्वतंत्रपणे मैदानात उतरल्या होत्या. गेल्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 48 पैकी 30 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत नेमकं काय होणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. पण महायुतीने अत्यंत चत्मकारिकरित्या राज्याची सत्ता पुन्हा हस्तगत केली.
विधानसभेत कुणाचे किती आमदार जाणार?
महायुतीमध्ये सहभागी असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 57 आमदार, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 41 आमदार तर भाजपचे 132 आमदार विधानसभेत असणार आहेत. तर विरोधी बाकांवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 10 आमदार उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे 20 आमदार आणि काँग्रेसचे 16 आमदार विरोधी बाकांवर असणार आहेत. तर समाजवादी पक्षाचे दोन आमदारही त्यांच्यासोबत असतील. तर इतर 10 आमदारही यामध्ये असणार आहेत.
ADVERTISEMENT
