Dr Tara Bhavalkar Speech: महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी राज्य स्थापन केलं, त्याचं विश्लेषण आमच्या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेंनी असं केलं आहे की, संतांनी शिवाजी महाराजांसाठी भूमी निर्माण केली होती. कारण मराठी भाषा संतांनी टीकवली आहे. भाषा ही प्रत्यक्ष जीवनात असावी लागते. कारण भाषा ही जैविक अशी गोष्ट आहे, जिवंत..जर भाषा बोलली तर ती जिवंत राहते. नुसती पुस्तकातून आणि ग्रंथातून ती जिवंत राहत नाही. म्हणून भाषा ही जैविक आहे. महाराष्ट्राला सातत्याने पांडुरंगाचं स्मरण मराठीत न करायला लावणारी ही भाषा संतांनी जिवंत ठेवली. ज्यादिवशी आईने पहिली ओवी आपल्या बाळाला म्हटली असेल, त्या दिवशी मराठी भाषा जन्माला आली, असं मोठं विधान संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी केलं. दिल्लीत आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्या बोलत होत्या. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
ADVERTISEMENT
डॉ. तारा भवाळकर आपल्या भाषणात पुढे म्हणाल्या, "कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी..लसुण मिरची कोथिंबीरी अवघा झाला माझा हरी..असं म्हणणारा आमचा सावता माळी त्यांनी ही भाषा जिवंत ठेवली आहे. या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. या सर्वांना मिळून अभिजातपण आलेलं आहे. मराठी फक्त लिखितमध्ये नाही, ती बोलितणं निर्माण झाली, म्हणून शिवाजी महाराजांना खेड्यातले मावळे मिळाले. त्यांच्यामुळे भाषा ही जिवंत राहिली. भाषा हे संस्कृतीचं बलस्थान असतं. आजही जगाच्या पाठीवर कुठेही हिंडत असलो, मराठी शब्द ऐकायला आला की आपण चमकून बघायला लागतो तुम्ही नागपूरचे का..तुम्ही महाराष्ट्रातले का..भाषा ही जोडणारी गोष्ट असायला पाहिजे, तोडणारी नाही".
हे ही वाचा >> Raj Thackeray: "...म्हणून मुंबई महानगरपालिकेवर खूप ताण", आयुक्तांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
"पंतप्रधान महाशय हे महाराष्ट्राचं प्रतिक म्हणून आपल्याला दिलेलं आहे. ही भाषा जोडणारी आहे. आज ज्यांना आम्ही पुरोगामी म्हणतो आणि कोणी कोणी फुरोगामी म्हणतात, ते फुरोगामी काहीही म्हणूदेत..खरोखरच आमचे संत पुरोगामी आहेत. स्त्री अध्यक्ष झालीय, हा महत्त्वाचा मुद्दा नाही, गुणवत्ता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. दिल्लीचं तख्त राखणारा महाराष्ट्र माझा हा साहित्यातून जिवंत राहिला आहे. कर्तबगारितून जिवंत राहिला आहे. ज्या ठिकाणी संमेलन होत आहे, त्या ठिकाणी मराठी माणसाने छावणी टाकलेली आहे. हा सर्व इतिहास आपल्याला माहिती आहे", असंही भवाळकर म्हणाल्या.
हे ही वाचा >> Manikrao Kokate यांची आमदारकी रद्द कधी करणार? 'त्या' प्रकरणाचा उल्लेख, विधानसभा अध्यक्षांना सवाल
ADVERTISEMENT
