Eknath Shinde : नाशिकच्या जागेसाठी शिंदेंनी बनवला होता 'हा' प्लॅन; भुजबळांना दिली होती ऑफर

मुंबई तक

25 Apr 2024 (अपडेटेड: 25 Apr 2024, 01:59 PM)

Nashik Lok Sabha Election : छगन भुजबळ यांचे नाव समोर आल्यानंतर एकनाथ शिंदेंनी त्यांना वेगळ्या मतदारसंघातून लढवण्याचा पर्याय दिला होता.

एकनाथ शिंदे यांनी नाशिकची जागा मिळावी म्हणून छगन भुजबळ यांना ऑफर दिली होती.

छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे.

follow google news

बातम्या हायलाइट

point

नाशिक लोकसभा मतदारसंघ निवडणूक २०२४

point

छगन भुजबळ यांना शिंदेंनी काय दिला होता प्रस्ताव?

point

छगन भुजबळांना सूचवला होता वेगळा मतदारसंघ

Nashik Lok Sabha Election 2024 : महायुतीत नाशिकच्या जागेचा तिढा सुटलेला नाही. या मतदारसंघावर एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने दावा केलेला आहे. त्यामुळे उमेदवार कोण असणार आणि कोण असणार, हा सस्पेन्स अजूनही कायम आहे. पण, अशात एकनाथ शिंदेंचा एक प्लॅन समोर आला आहे. नाशिकमधून भुजबळ लढतील अशी चर्चा सुरू झाल्यानंतर शिंदेंनी नाशिकची जागा मिळवण्यासाठी वेगळा प्लॅन तयार केला होता. यासंदर्भात भुजबळ यांना प्रस्तावही दिला होता. पडद्यामागे नेमकं काय घडलं, जाणून घ्या.

हे वाचलं का?

झालं असं की, भोसरी येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलताना अमोल कोल्हे यांनी एकनाथ शिंदेंच्या या प्लॅनबद्दल भाष्य केलं. 

अमोल कोल्हे काय म्हणाले, ते वाचा...

"मीडियात बातमी आली होती की, समोर असलेले महायुतीचे उमेदवार जरी चार पक्षांमध्ये बेडूक उड्या मारून गेले असले, तरी सुद्धा पहिल्या पसंतीचे उमेदवार नव्हते. उमेदवारी खरंतर वेगळ्याच ठिकाणी देण्याची मुख्यमंत्र्यांची इच्छा होती."

हेही वाचा >> ...म्हणून महाराष्ट्र काँग्रेसने विशाल पाटलांवर केली नाही कारवाई

"जी बातमी मला मीडियातून ऐकायला मिळाली, त्यानुसार छगन भुजबळांना उमेदवारी ही मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात होती. पण, छगन भुजबळांनी नकार दिल्यामुळे ही उमेदवारी घेण्यासाठी पुन्हा एकदा जिथे आधी उद्धव ठाकरेंना धोका देऊन शिंदेंच्या शिवसेनेत गेले, तिथून उडी मारून शेवटी ज्यांच्यावर टीका केली आणि ज्यांना २०१९ मध्ये हिंमत असेल, तर समोर लढून दाखवा असं आव्हान संसदेच्या प्रांगणात जाऊन देत होते, त्यांच्याच वळचणीला जाऊन आज उमेदवारी घ्यावी लागली."

छगन भुजबळांनी सांगितली पडद्यामागची स्टोरी

अमोल कोल्हे यांनी याबद्दल वाच्यता केल्यानंतर छगन भुजबळ यांनी याला दुजोरा दिला. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यामध्ये काय बोलणं झालं, याबद्दल माहिती दिली. 

भुजबळ म्हणाले की, "मी मुख्यमंत्र्यांना दोष देत नाही. ज्यावेळी ठरलं की जवळजवळ भुजबळ फायनल झाले नाशिकमध्ये. मुख्यमंत्र्यांना अडचण होती की, त्यांची सीट आहे म्हणजे गोडसेंची. त्यांना पण अडचण येत होती. म्हणून मग त्यांनी मला कॉल केला आणि विचारलं की, ओबीसी समाज, माळी समाज शिरूरमध्ये पण खूप आहे. तर तुम्ही तिथे लढू शकता का? त्यांचा हिशोब हा होता की, मी तिकडे गेलो तर नाशिकचा तिढा सुटेल. हा त्याच्या पाठीमागचा चांगला हेतू होता."

हेही वाचा >> "शपथेला नाही, खंजिराला महत्त्व", शरद पवारांचा बावनकुळेंनी काढला इतिहास 

"मी त्यांना सांगितलं की, भाऊ ओबीसी समाज महाराष्ट्रात सगळीकडे आहे. मी सगळीकडे जातो, भाषणे करतो आणि येतो. माझा सगळ्यात जास्त संबंध कुठे येतो, नाशिकमध्येच ना? नाशिक मी काही मागितलेलं नाही. त्यामुळे मला पाहिजेच म्हणून कुठेही जाऊन उभा राहीन, हे माझं म्हणणं नाही. ही माझी वृत्ती नाही. पक्षाने सांगितलं होतं उभं रहा म्हणून मी तयार झालो होतो."

शाहांनी सूचवलं होतं भुजबळांचं नाव

भाजपचे नेते अमित शाह यांनी नाशिकमधून छगन भुजबळ यांचं नाव सूचवलं होतं. तसं त्यांनी एकनाथ शिंदेंनाही म्हटलं होतं. त्यामुळे शिंदेंनी भुजबळांना शिरूरचा पर्याय सूचवला होता. पण, आता छगन भुजबळ यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे या जागेचा पेच सुटण्याची शक्यता दिसत होती. पण, अजित पवारांच्या राष्ट्रवादी अजूनही या जागेवरील दावा सोडलेला नाही. 

शिंदेंकडून ही जागा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण, अजूनही या जागेचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे उमेदवार कोण असणार आणि कुणाचा असणार? याची उत्सुकता वाढलेली आहे.

    follow whatsapp