Maharashtra Politics Latest News: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर अशी जोरदार चर्चा सुरू झाली होती की, एकनाथ शिंदेंना बाजूला सारून भाजप अजित पवारांना मुख्यमंत्री पद देऊ करेल. मात्र, आता याचबाबत भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचंड मोठं विधान केलं आहे. ते देखील जाहीररित्या त्या माध्यमांसमोर. विधानसभा परिसरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, महायुतीचे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच राहणार!
ADVERTISEMENT
पाहा देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले:
‘कोणत्याही पक्षातील लोकांना वाटणं की, आपल्या पक्षाचे नेते हे मुख्यमंत्री झाले पाहिजे यात वावगं काही नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला वाटू शकतं की, त्यांचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. आमच्या पक्षातील लोकांना वाटू शकतं की, भाजपचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. शिवसेनेचे मुख्यमंत्री आज आहेत. मात्र, मी अतिशय अधिकृतपणे या महायुतीतील सर्वात मोठ्या पक्षाचा नेता म्हणून सांगतो की, या महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेच राहणार आहेत. दुसरा कोणीही मुख्यमंत्री याठिकाणी होणार नाही. मुख्यमंत्री पदात कोणताही बदल होणार नाही. या संदर्भात अजित पवार आणि मी आमच्या दोघांच्या मनात पूर्ण स्पष्टता आहे.’ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
‘शिंदे साहेबच मुख्यमंत्री राहतील…’
‘ज्यावेळी महायुतीची चर्चा झाली त्यावेळेसही अजितदादांना अतिशय स्पष्टपणे याची कल्पना देण्यात आली आहे आणि ती त्यांनी स्वीकारली देखील आहे. केवळ स्वीकारलीच नाही. तर त्यांनी स्वत: आपल्या वक्तव्यात हे स्पष्टपणे सांगितलं आहे की, मुख्यमंत्री बदलाची चर्चा देखील नाही. जे आमच्या महायुतीतील लोकं अशाप्रकारचं वक्तव्य करत आहेत त्यांना माझं अतिशय स्पष्टपणे सांगणं आहे की, अशाप्रकारेच संकेत देणं किमान संभ्रम पसरवणं त्यांनी तात्काळ बंद केलं पाहिजे. कारण यातून महायुतीच्या संदर्भात संभ्रम निर्माण होतो. नेत्यांच्या मनात संभ्रम नाही. शिंदे साहेबच मुख्यमंत्री आहेत तेच मुख्यमंत्री राहणार आहेत.’ असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
हे ही वाचा >> Afzal Guru ला फाशी देताच जेलर ढसाढसा रडला, कधीही समोर न आलेला ‘हा’ किस्सा जरूर वाचा!
‘दहा तारखेला काहीही होणार नाही… झालंच तर..’
‘यामुळे कार्यकर्त्यांनीही संभ्रम ठेवण्याचं कारण नाही. आता पृथ्वीराज बाबा जे काही बोलले ते अशाप्रकारची पतंगबाजी सध्या अनेक लोकं करत आहेत. अनेक लोकं राजकीय भविष्यवेत्ते झाले आहेत. पण त्यांनी कितीही भविष्य सांगून आमच्या युतीत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरीही मी अतिशय स्पष्टपणे आणि पूर्ण अधिकृतपणे सांगतो की, दहा तारखेला काही होणार नाही, अकरा तारखेला काही होणार नाही.. झालंच काही तर आमचा विस्तार होणार आहे. त्याची तारीख ठरायची आहे.’ असंही फडणवीस म्हणाले.
‘माझं वक्तव्य कानउघडणी करण्यासाठी पुरेसं..’
‘मुख्यमंत्री ठरवतील त्या तारखेला आमचा विस्तार होईल. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेच राहतील. मला असं वाटतं की, माझं वक्तव्य हे कानउघडणी करण्यासाठी पुरेसं आहे. समजदार को इशारा.. आमचे सगळे लोकं समजुतदार आहेत. त्यामुळे त्यांना इशारा मिळाला असेल.’
हे ही वाचा >> नितीन गडकरींनी प्रत्येक घरी पोहोचवलं किलोभर मटण, तरीही…
‘म्हणूनच मी सांगितलं.. कोणाला असं वाटावं की, त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री असावा हे गैर नाही. पण बोलताना प्रत्येकाने वास्तवाचं भान ठेवलं पाहिजे. वास्तव हे आहे की, महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. तेच राहणार आहेत.’ असं म्हणत फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाबाबत ज्या काही चर्चा सुरू आहेत त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ ट्विटनंतर फडणवीस मीडियासमोर आले अन् म्हणाले शिंदे साहेबच…
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार हे मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरू होती. याच चर्चेदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब भेट घेतली होती. त्यांच्या याच भेटीनंतर पंतप्रधान मोदींनी शिंदेंचा ‘कष्टाळू मुख्यमंत्री’ असा उल्लेख करणारं ट्वीट केलं होतं. ज्यामुळे शिंदेंच्या हितशत्रूंना योग्य तो संदेश मिळाल्याची चर्चा सुरू झाली.
दरम्यान, या सगळ्या घडामोडीनंतर स्वत: देवेंद्र फडणवीस यांना मीडियासमोर हे स्पष्ट करावं लागलं की, एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री आहेत आणि तेच कायम राहतील. आता या सगळ्या राजकीय खेळींमुळे नेमकं कोणी कोणाला.. कशाप्रकारे शह दिलाय हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे.
अजित पवारांना धक्का?
अजित पवार यांना राज्याचं मुख्यमंत्री पद हवं आहे आणि त्यांची ही महत्त्वाकांक्षा कधीही लपून राहिलेली नाही. अशावेळी शिंदेंना शह देण्यासाठी भाजपने अजित पवारांना सत्तेत सामील करून घेतलं होतं. त्यामुळे शिंदेंची देखील धाकधूक चांगलीच वाढली होती. मात्र, आता स्वत: फडणवीसांनी जाहीर केलं की, शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. तर हा एकप्रकारे अजित पवार यांना मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.
कारण, गेले अनेक वर्ष ज्या मुख्यमंत्री पदाची मनिषा ठेवून अजित पवारांनी आपल्या राजकारणाला दिशा दिली आहे तेच मुख्यमंत्री पद हे अद्यापही त्यांच्या टप्प्यात येऊ शकलेलं नाही. पण दुसरीकडे अजित पवारांना विधिमंडळात देखील ज्युनिअर असलेल्या एकनाथ शिंदेंनी ज्या पद्धतीने राज्याचं मुख्यमंत्रीपद मिळवलं आहे त्यातून एक सुप्त प्रकारच्या स्पर्धेला सुरुवात झाली आहे.
ADVERTISEMENT