Maharashtra Politics News Today : शिवसेनेकडून देण्यात आलेल्या एका जाहिरात युतीमध्ये कळीचा मुद्दा ठरला आहे. भाजप-शिवसेनेत सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा आधीच सुरू असताना प्रसिद्ध झालेल्या या जाहिरातीने विरोधकांच्या हाती आयत कोलीत दिले आहे. याच ‘राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रामध्ये शिंदे’ या जाहिरातीवर बोट ठेवत ठाकरेंच्या सेनेनेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर प्रहार केला आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर टीका करतानाच ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपच्या नेत्यांनाही टोले लगावले आहे. (Politics of Maharashtra)
ADVERTISEMENT
पुन्हा मुख्यमंत्री म्हणून जनतेची सर्वाधिक पसंती देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांना असल्याचा दावा करणाऱ्या जाहिरातीने युतीतील राजकारण ढवळून निघालं. याच जाहिरातवर सामना अग्रलेखातून शिवसेनेने भाष्य केले आहे. महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांना डिवचत ठाकरेंच्या शिवसेनेने एकनाथ शिंदेंवर प्रहार केला आहे.
शिवसेनेच्या जाहिरातीवर सामना अग्रलेखात काय?
– “आतापर्यंत या बेकायदा सरकारने असंख्य जाहिराती दिल्या, पण काल मिंधे गटातर्फे प्रसिद्ध झालेल्या एका पूर्ण पान जाहिरातीने फडणवीसांसह त्यांच्या 105 आमदारांच्या काळजाचे पाणी पाणीच झाले आहे. सर्वच वृत्तपत्रांत कोट्यवधी रुपये खर्च करून अगदी पहिल्या पानावर ‘मोदी-शिंद्यां’च्या फोटोसह जाहिराती प्रसिद्ध झाल्या. त्या जाहिरातीतून देवेंद्र फडणवीस गायब आहेत. ही जाहिरात सरकारी नसून चोरलेल्या बनावट शिवसेनेची आहे.”
हेही वाचा >> देवेंद्र फडणवीसांचं टेन्शन वाढवणाऱ्या ‘त्या’ सर्व्हेमध्ये नेमकं काय?
– “जाहिरातीत पंतप्रधान मोदी यांचा फोटो खुबीने वापरला, पण फडणवीस कोठेच नाहीत. जाहिरात सरकारी नसल्यामुळेच फडणवीसांवर फुली मारली असा त्यावर खुलासा असेल, तो तितकासा खरा नाही; पण ‘आम्हीच खरी शिवसेना व आम्हीच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार’ असे ढोल पिटणाऱ्यांच्या या जाहिरातीत मोदी आहेत, पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेदेखील पूर्णपणे गायब आहेत. यावर भाजप व शिंदे गटाच्या टिल्ल्या-चिल्ल्या टिनपाट प्रवक्त्यांचे काय म्हणणे आहे?”
– “एकाच वेळी फडणवीस यांना धक्का देणाऱ्या व शिवसेनाप्रमुखांकडे दुर्लक्ष करणाऱ्या जाहिरातींचे प्रयोजन काय? प्रश्न एका जाहिरातीचा नाही, तर स्वतःस शिवसेना म्हणवून घेणाऱ्यांनी त्यांचा गट मोदींच्या पायाशी लीन करून ठेवला हा आहे. बाळासाहेब ठाकरे वगैरे काही नसून ‘सब कुछ मोदी’ असेच या शिंदेछाप जाहिरातीने सांगितले. जाहिरात सांगते, ‘राष्ट्रात मोदी व महाराष्ट्रात शिंदे!’ याचा अर्थ मिंधे गट फडणवीसांचा 105 आमदारांचा ‘टेकू’ मानायला तयार नाही.”
“भाजपवाल्यांची तोंड काळी ठिक्कर पडलीत”
– “कोणत्या तरी न झालेल्या सर्वेक्षणाचा हवाला देऊन जाहिरातीत सांगितले आहे, ‘श्री. एकनाथजी शिंदे यांना महाराष्ट्रातील 26.1 टक्के जनतेला पुन्हा मुख्यमंत्रीपदी पाहायचे आहे व श्री. देवेंद्र फडणवीस यांना 23.2 टक्के जनतेला मुख्यमंत्रीपदी पाहायचे आहे.’ याचा अर्थ असा की, गेल्या फक्त 9-10 महिन्यांत शिंदे यांनी लोकप्रियतेच्या बाबतीत फडणवीस यांच्यावर चढाई केली. मोदी राष्ट्रात व शिंदे महाराष्ट्रात लोकप्रिय ठरत असल्याच्या जाहिरातबाजीने भाजपवाल्यांची तोंडे महाराष्ट्रात काळी ठिक्कर पडली आहेत.”
समजून घ्या >> Lok Sabha Election 2024 : ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपकडून शिवसेनेकडे कसा गेला? युतीच्या बैठकीत काय घडलेलं?
– “एक वर्षापूर्वी ‘देशात नरेंद्र व महाराष्ट्रात देवेंद्र’ असा प्रचार सुरू होता. तो प्रचार या जाहिरातीने संपुष्टात आणला. सत्य असे की, भाजप व मिंधे गटात चढाओढीचे राजकारण सुरू झाले असून आपल्या लोकप्रियतेबाबत केलेली जाहिरातबाजी हे मिंधे गटाचे उसने अवसान आहे. मुळात फुटीर मिंधे गटास लोकांचा पाठिंबा नाही.”
तीन बंगल्यात केलेला सर्व्हे
– “लोकांचा पाठिंबा किती व कसा हे अजमावयाचे असेल तर मुंबईसह 14 महानगरपालिकांच्या निवडणुका हाच पर्याय आहे, पण ‘मिंधे’ मंडळ निवडणुकांपासून पळ काढत आहे. ज्या ‘सर्व्हे’चा हवाला दिला जात आहे तो नक्की कोठे केला? मुख्यमंत्री शिंदे यांच्या ताब्यात मलबार हिलचे तीन सरकारी बंगले आहेत. बहुधा याच तीन बंगल्यांत हा सर्व्हे केलेला दिसतो.”
– “मुळात जे अधिकृत ‘सर्व्हे’ प्रतिष्ठत माध्यम समूहांनी मधल्या काळात केले, त्यात एकनाथ शिंदे यांच्या बाजूने तीन टक्के लोकांनीही कौल दिलेला दिसत नाही. मग हे 26.1 टक्के जनमत खोके देऊन खरेदी केले काय, असा प्रश्न लोकांना पडू शकतो. शिंदे यांनी गेल्या नऊ-दहा महिन्यांत कोणते दिवे लावले की, राज्यातील 26 टक्के लोकांनी त्यांच्या बाजूने कौल दिला?”
मोदी, शाहांच्या भीतीने…
“भारतीय जनता पक्षाची उरलीसुरली प्रतिष्ठा मिंधे शिंदे गटामुळे धुळीस मिळाली हे सत्य आहे. शिंदे गट हा दिल्लीश्वरांचा गुलाम बनला आहे. ही गुलामी इतक्या थराला गेली की, मोदी व शाहांच्या भयाने त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्रही जाहिरातीत टाकणे बंद केले. बाळासाहेबांचे नाव घेणेही बंद केले. असे डरपोक लोक स्वतःला शिवसेना व बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार वगैरे मानतात, याची निंदा करावी तेवढी थोडीच. मुळात भविष्यातले चित्र असे दिसते की, राष्ट्रात 2024 नंतर मोदींचे राज्य राहणार नाही व महाराष्ट्रात सत्तांतर होऊन आजचे बेकायदा राज्यकर्ते भ्रष्टाचार व फसवणुकीच्या खटल्यांत गजाआड पडलेले असतील.”
– “अब्दुल सत्तारांसारखे घोटाळेबाज मंत्री शेतकऱ्यांचे रक्तच शोषित आहेत. त्यांच्या बोगस धाडींचे प्रकरण दिल्लीपर्यंत पोहोचलेच आहे. अनेक घोटाळेबाज मंत्र्यांना जावेच लागेल अशी स्थिती आहे. त्यामुळे या घोटाळेबाज मंत्र्यांचे टोळीप्रमुख मुख्यमंत्री लोकप्रिय कसे, हा संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर भाजपच्या टिल्ल्या-चिल्ल्या प्रवक्त्यांनीच द्यायचे आहे.”
“शिवसेनाप्रमुखांना फक्त 10 महिन्यांत विसरणाऱ्या या लोकांकडून काय अपेक्षा ठेवणार? मिंधे गटाची फुकाची जाहिरातबाजी म्हणजे वरवरची रंगसफेदी आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग जाहिरातबाजीने उजळणार नाही. चला एक बरे झाले, शिवसेनाप्रमुखांबाबतचे यांचे प्रेम व आदर म्हणजे निव्वळ ढोंग होते हे कालच्या जाहिरातबाजीने स्पष्ट केले, पण जो बाळासाहेबांचा झाला नाही तो मोदींचा तरी होईल का? आतापर्यंत आपण सगळय़ांनी खूप कल्पक जाहिराती पाहिल्या असतील, पण अशी जाहिरात होणे नाही!”
ADVERTISEMENT