Sharad Pawar Political Wrestling: मुंबई: शरद पवार (Sharad Pawar) म्हणजे राजकारणातील कुस्तीच्या फडातील तेल लावलेल पैलवान! जेव्हा भल्याभल्यांना वाटतं की, आपण पवारांना खिंडीत गाठलंय.. त्यांचा खेळ खल्लास झालाय.. तेव्हाच शरद पवार असा काही डाव टाकतात की, त्याच भल्याभल्यानं चीतपट होण्याशिवाय पर्याय नसतो. हे अवघ्या महाराष्ट्राने आतापर्यंत अनेकदा पाहिलं आहे. पण स्वत:च्याच पुतण्याला एकदा नव्हे तर दोनदा राजकीय पटलावर आस्मान दाखविण्याची किमया ही शरद पवार यांनी केली आहे. दोनच दिवसांपूर्वी शरद पवारांनी असा काही ‘हनुमंती’ डाव टाकला की, अजितदादांचा (Ajit Pawar) करेक्ट कार्यक्रमच झाला असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. (how ncp president sharad pawar defeated ajit pawar in political wrestling)
ADVERTISEMENT
शरद पवार यांनी अजित दादांवर कसा टाकला हनुमंती डाव?
महाविकास आघाडीची सत्ता गेल्यापासून अजित पवार हे बंडाच्या तयारीत असून राष्ट्रवादीच्या आमदारांना घेऊन ते भाजपसोबत जाणार असल्याची जोरदार चर्चा ही राजकीय वर्तुळात रंगली होती.
अखेर अजित पवारांनी पुढं येत या सगळ्याबाबत खुलासा केला होता. आपण राष्ट्रवादीतच शेवटपर्यंत राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यांच्याविषयी सुरु असलेल्या चर्चांचा देखील त्यांनी इन्कार केला होता. पण या सगळ्या घडामोडीनंतर अजित पवारांनी ‘सकाळ’ वृत्तपत्राला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये त्यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती.
हे ही वाचा >> NCP मध्ये शरद पवारच ‘बिग बॉस’, एका दगडात किती पक्षी मारले?
दुसरीकडे ईडीच्या कारवायांमुळे राष्ट्रवादीचा एक गट भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही असल्याचं बोललं जात होतं. परंतु भाजपसोबत जाण्यासाठी शरद पवार तयार नसल्याचं समोर आलेलं.
असं असताना फक्त अजित पवारच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना रोखण्यासाठी शरद पवार यांनी कोणतीही भावनिक साद वैगरे घालण्याचा प्रयत्न केला नाही. तर एकच असा डाव टाकला की, ज्यात अजित पवार आणि काठावर असलेल्या आमदारांना जबर हादराच बसला.
वयाच्या 83व्या वर्षी देखील कायम जनतेत असलेल्या शरद पवारांना पहिल्यापासूनच जनतेची नस अचूक कळली आहे. त्यामुळे याच भावनेचा योग्य वापर करण्याचा निर्णय पवारांना घेतला. म्हणूनच पवारांनी थेट मीडियासमोरच त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय जाहीर केला. पवारांचा हाच डाव म्हणजे हनुमंती…
पवारांनी राजीनामा जाहीररित्या दिल्यानंतर त्याचा जबरदस्त धक्का हा कार्यकर्ते आणि नेत्यांना बसला. त्यानंतर एक तीव्र भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली. काहीही झालं तरी पवार अध्यक्षपदी कायम हवेत असं सामान्य कार्यकर्ते म्हणू लागले. ज्यामुळे शरद पवारांनी एक प्रकारची जनभावनाच निर्माण केली.
हे ही वाचा >> NCP: उत्तराधिकाऱ्याबद्दल शरद पवार पहिल्यांदाच बोलले, म्हणाले…
अशावेळी अजित पवारांसह पक्षातील इतरही आमदारांना हे कळून चुकलं की, जर आपण आता पक्षात बंडखोरी केली तर तो राजकीय आत्मघात ठरेल. त्यामुळेच पवारांनी एका खेळीने सगळी हवाच पालटून टाकली.
शरद पवारांनी अजितदादांना पुन्हा उघडं पाडलं?
दुसरीकडे शरद पवारांनी अजित पवारांना पुन्हा उघडं पाडल्याची देखील आता चर्चा रंगली आहे. कारण 2 मे रोजी शरद पवार यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर त्या सभागृहातील प्रत्येक नेत्याने आणि कार्यकर्त्याने शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा यासाठी अक्षरश: टाहो फोडला होता. असं असताना फक्त एकमेव अजित पवार हे असे नेते होते की, जे म्हणत होते की, शरद पवार हे आपला निर्णय मागे घेणार नाहीत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते दुसरा अध्यक्ष तयार करतील. त्यामुळे आपण त्यांच्या या निर्णयाला साथ दिली पाहिजे.
एकीकडे अजित पवार हे असं म्हणत असताना दुसरीकडे सर्वच नेत्यांनी शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा असं मागणं लावून धरलं होतं. अखेर आज (5 मे) शरद पवार यांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला. पण अजित पवारांच्या भूमिकेमुळे ते पुन्हा राजकीयदृष्ट्या उघडे पडल्याची चर्चा रंगली आहे. कारण अनेकांना असं अपेक्षित होतं की, इतर नेत्यांप्रमाणेच अजित पवार हे शरद पवारांना राजीनामा मागे घेण्यासाठी आग्रह धरतील. पण पवारांनी टाकलेल्या जाळ्यात अजित पवार हे अलगद फसले. त्यांनी त्यांच्या भावना जाहीरपणे बोलून दाखवल्या. पण त्यामुळेच त्यांच्याविरोधात एक प्रकारचं वातावरण तयार झालं आणि त्याचाच शरद पवारांनीही अचूक फायदा घेतला. ज्या प्रमाणे कुस्तीच्या फडात कसलेला मल्ल हा प्रतिस्पर्ध्यावर मात करतो.. तशीच मात पवारांनी अजितदादांवर केल्याचं राजकीय तज्ज्ञांचं मत आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवारांनी भाजपसोबत संधान बांधून देवेंद्र फडणवीसांसोबत पहाटेच शपथविधी उरकून घेतला होता. ज्यामुळे राज्यात राजकीय भूकंप झाला होता. पण याचवेळी शरद पवारांनी आपला सगळा राजकीय अनुभव पणाला लावत अवघ्या काही तासात सर्व आमदारांना माघारी आणलेलं आणि फडणवीसांचं सरकार अवघ्या 72 तासात पाडलेलं. यावेळी पहिल्यांदा शरद पवारांनी जाहीरपणे अजित पवारांची मोठी राजकीय कोंडी केली होती.
कुस्तीच्या फडातील हनुमंती डाव असतो तरी काय?
बुद्धीच्या जोरावर प्रतिपक्षावर मात करण्याचे डावपेच असलेला प्रकार म्हणजे हनुमंती डाव. पौराणिक कल्पनेनुसार या कुस्तीच्या प्रकाराचा कर्ता रामायण काळातील वायुपुत्र हनुमान असून त्याने बुद्धीच्या जोरावर शक्तीवर मात करता येईल असे डावपेच निर्माण केले आहेत. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे तत्त्व या प्रकारच्या कुस्तीत प्रामुख्याने आढळते. त्यामुळे प्रतिस्पर्धी शरीराने व बलाने मोठा असला, तरी त्यावर मात करता येते. यावरून या कुस्तीच्या डावास हनुमंती कुस्ती हे नाव पडले.
ADVERTISEMENT