Maharashtra Politics News Today : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या वावड्या गेल्या अनेक महिन्यांपासून उठत होत्या. त्यावर 2 जुलै रोजी शिक्कामोर्तब झाले. अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांशी हातमिळवणी करत एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकारी आमदारांनाच चिमटा काढलाय. पाटील नेमकं या म्हणाले तेच पाहुयात… ()
ADVERTISEMENT
अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 जणांनी शपथ घेतली. त्यानंतर जयंत पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, “लोटस हा सिम्बॉल (चिन्ह) भारतीय जनता पक्षाचा आहे. मला वाटतं की भाजपने महाराष्ट्रात अशी एक घटना केलेली होती. आता ही दुसरी घटना केलेली आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात भाजपबद्दल वेगळ्या भावना पुन्हा एकदा निर्माण झाल्या आहेत. जे शिवसेना फोडल्यानंतर झालं, तेच राष्ट्रवादी फोडल्यावर महाराष्ट्रातील जनता प्रतिक्रिया व्यक्त करेल.”
हेही वाचा >> Maharashtra politics : अजित पवारांनी घेतली शपथ, शरद पवारांनी मानले नरेंद्र मोदींचे आभार
“सुप्रीम कोर्टाचा निकाल वाचला, तर सगळ्याचं गोष्टी स्पष्ट होतील. मी जितेंद्र आव्हाड यांची मुख्य प्रतोद म्हणून निवड केली आहे. पक्षाचा प्रदेश अध्यक्ष म्हणून मी पुन्हा सांगतो की, राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजप-शिंदे गटाला कोणताही पाठिंबा नाहीये. आमच्या पक्षाच्या आदेशाचं, धोरणांचं उल्लंघन करून ज्यांनी सरकारमध्ये शपथ घेऊन मंत्री झाले, त्यांनाही आमच्या पक्षाचा कोणताही पाठिंबा नाही”, असंही जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं.
एकनाथ शिंदेंबद्दल जयंत पाटील काय म्हणाले?
अजित पवारांच्या बंडाबद्दल बोलताना जयंत पाटील यांनी शिंदेंनाही इशारा केला. ते म्हणाले, “संख्या बरीच आमच्याबरोबर आलेली आहे. आता तुमच्या मनाप्रमाणे राज्य चालणार नाही, आता आमच्या मनाप्रमाणे चालेल, असं आता भाजप त्यांना सांगेल.”
“मधल्या काळात एकनाथ शिंदे हे प्रचंड जोरात चाललेले होते. ते फारसं कुणाचं ऐकून घेत नव्हते. ठाणे जिल्ह्यात तर कुणाचीच अपॉईंटेंट मान्य करत नव्हते. त्यामुळे काही लोकांना एकनाथ शिंदेंचा प्रचंड राग असावा. त्यामुळे त्यांना पर्याय निर्माण करण्यासाठी… आता एकनाथ शिंदेंनी जाताना काय सांगितलं? शिवसेनेतून तिकडे जाताना अनेक आमदारांनी काय सांगितलं? अजित पवार अर्थमंत्री होते आणि त्यांच्यामुळे आणि राष्ट्रवादीमुळे आमच्यावर अन्याय झाला आणि म्हणून आम्ही तिकडे चाललो आहोत. आता हेच सगळे तिकडे गेले असतील, तर त्यांना परत जायला एक संधी आहे”, असा चिमटा काढत जयंत पाटलांनी शिंदेंना सल्ला दिला.
वाचा >> Maharashtra Politics: कोण अजितदादांसोबत अन् कोण पवारांसोबत? NCP आमदारांची संपूर्ण यादी
“ज्या नऊ सदस्यांनी शपथ घेतलेली आहे. पक्षाच्या धोरणात विरोधात जाऊन, त्यांनीच पलिकडे पाऊल टाकलेलं आहे. उरलेल्या सर्व आमदारांना मी दोष देणार नाही. त्यांनी जर कशावर सह्या केलेल्या असतील. तर त्यातील बरेचसे आमदार आज आमच्याशीही बोलताहेत. त्यामुळे शरद पवार यांना जाऊन भेटत आहेत. मलाही बऱ्याच आमदारांचे फोन आले. दोन तास बरेच आमदार आमच्याशी बोलले. त्या सर्वांची नक्की भूमिका काय आहे, हे त्यांच्याशी बोलल्यानंतर आम्हाला त्यावर विचार करावा लागेल”, असंही जयंत पाटील म्हणाले.
आमदारांना कराव्या लागल्या सह्या -जयंत पाटील
“काही आमदार म्हणताहेत की आम्ही तिथे गेलो आणि आम्हाला सह्या करायला सांगितलं. कशावर सह्या करतोय, हेही दाखवलं गेलं नाही. आम्हाला सह्या कराव्या लागल्या. कशावर सह्या केल्या माहिती नाही, असं म्हणणारे दोन-तीन आमदार मला भेटले”, असा दावाही जयंत पाटील यांनी केला आहे.
वाचा >> Maharashtra politics : अजित पवारांची NDA त एन्ट्री एकनाथ शिंदेंसाठी ‘बॅड न्यूज’!
“पक्षाचं धोरण या सरकारला पाठिंबा देण्याचं नसताना काही लोकांनी जाऊन शपथ घेतली आहे. त्यामुळे कायदेशीर काही अडचणी त्यांना आल्या, तर… शेवटी ते आमचे सगळे सहकारी आहेत, पण कायदेशीर अडचणी आल्या तर त्यांना त्याला तोंड द्यावं लागेल”, असा इशारा जयंत पाटील यांनी दिला.
ADVERTISEMENT