Maharashtra Politics Lok Sabha elections 2024 seat sharing : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे)२३ जागा मागितल्या आहेत. तर वंचित बहुजन आघाडीने १२ जागा. शरद पवार गटाने अद्याप त्यांची इच्छा बोलून दाखवलेली नाही. पण, चार पक्षांच्या वेगवेगळ्या मागण्यांमुळे एकूण जागा आणि मागणी यांचं गणित बसवण्याचं आव्हान महाविकास आघाडीसमोर आहे. याचसंदर्भात काँग्रेसच्या नेत्यांची महाराष्ट्रातील नेत्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत काय चर्चा आली याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर मविआतील घटक पक्षांचं एका निकषावर एकमत झालं आहे. त्यामुळे त्याच आधारे जागा वाटप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. एकीकडे महायुती (भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी-अजित पवार गट) तर दुसरीकडे महाविकास आघाडी (काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी-शरद पवार गट, वंचितची चर्चा आहे, पण सोबत घेण्याबद्दल अद्याप घोषणा झालेली नाही.) मैदानात आहे. त्यामुळे दोन्ही आघाड्यांमध्ये जागा वाटप कसे होणार याचीच सगळ्यांना उत्सुकता आहे.
महाविकास आघाडीत जागा वाटपावरून मतभेद
महाविकास आघाडीचे जागा वाटपाचे सूत्र अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र, कोणता मतदारसंघ कुणाला सोडायचा, याच्या निकषाबद्दल चर्चा झाली आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्याची दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत बैठक झाली. याबैठकीतही या निकषावर चर्चा झाली.
हेही वाचा >> ‘मविआ’पासून दूर जाण्यासाठी 12 जागांची मागणी? आंबेडकर स्पष्टच बोलले, काँग्रेसला दाखवला आरसा
काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी सांगितले की, “लोकसभेसाठी संजय राऊत (शिवसेना युबीटी) यांची २३ जागांची इच्छा आहे. प्रकाश आंबेडकरांचीही १२ ते १३, शरद पवारांचीही काही इच्छा असेल, तर काँग्रेसचीही तशी इच्छा असेल. पंरतु या सर्वांची इच्छांची गोळाबेरीज हे ४८ जागांच्या पुढे जाईल. त्यामुळे सगळ ४८ जागांच्या अनुषंगाने ठरवावं लागेल. त्यासाठी कुणाची जिंकण्याची परिस्थिती आहे? कोण निवडून येऊ शकतो, ही समीकरणे राहणार आहे.”
हेही वाचा >> अजित पवार चिडले, संजय राऊतांना म्हणाले ‘सोम्या गोम्या’
ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही याच पद्धतीने भूमिका मांडलेली आहे. ज्या मतदारसंघात ज्यांची जिंकून येण्याची क्षमता आहे, त्याला तो मतदारसंघ द्यायचा, अशी चर्चा इंडिया आघाडीच्या बैठकीत झालेली आहे, असे राऊतांनी म्हटले होते. शरद पवारांनीही अशीच भूमिका या बैठकीत मांडलेली आहे. त्यामुळे या निकषाचा विचार करूनच महाविकास आघाडीचे जागा वाटप होण्याची शक्यता आहे.
वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचं अद्यापही अनिश्चित
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने इंडिया आघाडीत येण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत वंचितची आधीच आघाडी झालेली आहे. शरद पवारांनीही त्यांना सोबत घेण्याबद्दल सकारात्मक भूमिका घेतली आहे. मात्र, काँग्रेसकडून अद्यापही याबद्दल अधिकृत भूमिका मांडण्यात आलेली नाही. त्यामुळे वंचितला सोबत घेतल्यास जागा वाटपाचा वेगळा फॉर्म्युला ठरवावा लागणार आहे.
ADVERTISEMENT