Mahayuti : शाहांच्या घरी ठरला जागावाटपाचा फॉर्म्युला, शिंदे-पवारांना किती जागा?

रोहिणी ठोंबरे

• 10:38 AM • 09 Mar 2024

Loksabha Election Mahayuti Seat Sharing : महाराष्ट्रातील जागावाटपाबाबत गृहमंत्री अमित शहा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी सुरू असलेली बैठक रात्री उशिरा संपली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाला 3-4 जागा मिळण्याची शक्यता असल्याची बैठकीत चर्चा झाली.

Mumbaitak
follow google news

Loksabha Election Mahayuti Seat Sharing : महाराष्ट्रातील जागावाटपाबाबत (Maharashtra Seat Sharing) गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या दिल्लीतील (Delhi) निवासस्थानी सुरू असलेली बैठक रात्री उशिरा संपली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) गटाला 3-4 जागा मिळण्याची शक्यता असल्याची बैठकीत चर्चा झाली. कारण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने 4 जागा जिंकल्या होत्या. पण अजित पवारांना जास्त जागा हव्या आहेत अशी माहिती आहे. तर, शिंदेच्या शिवसेनेला 10-12 जागा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय भाजप आणि शिवसेनेमध्ये काही जागांची देवाणघेवाणही होऊ शकते. 

हे वाचलं का?

गृहमंत्र्यांच्या निवासस्थानी सायंकाळी सात वाजता बैठक सुरू झाली होती. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.

महायुतीतील जागावाटपावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? 

याआधी गुरुवारी (7 मार्च) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, 'राज्यातील महायुतीमध्ये सर्व काही सुरळीत सुरू आहे, दोन-तीन जागांवर चर्चा सुरू असून लवकरच त्यावर तोडगा निघेल.'

शुक्रवारी (8 मार्च) प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, 'लोकसभेसाठी जेव्हा जेव्हा तिकीट वाटपाचा विषय येतो तेव्हा तो वास्तविकतेवर आधारित असतो. आमच्या महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये सर्व काही सुरळीत सुरू आहे. दोन-तीन जागांवर अजूनही चर्चा सुरू आहे, जिथे कोंडी झाली होती, पण तीही लवकरच सोडवली जाईल. आमच्यात कोणत्याही प्रकारचा वाद नाही.'

यापूर्वी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील NDA ने 41 जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील UPA आताची INDIA ने पाच जागा जिंकल्या आणि AIMIM च्या नेतृत्वाखालील आघाडीने 48 जागांपैकी एक जागा जिंकली. या वर्षी एप्रिल-मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत.

    follow whatsapp