Maharashtra budget: “सत्यजित, आज खऱ्या अर्थाने तुझ्या कामकाजाला सुरुवात होतेय”

मुंबई तक

27 Feb 2023 (अपडेटेड: 29 Mar 2023, 06:19 PM)

“सत्यजित, आज खऱ्या अर्थाने तुझ्या कामकाजाला सुरुवात होतेय” विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडून आल्यानंतर आज आमदार सत्यजित तांबेंनी सभागृहात हजेरी लावली. विधानभवनात प्रवेश करतानाच्या भावना सत्यजित तांबेंनी व्यक्त केल्या. त्यावरच त्यांचे वडील सुधीर तांबे यांनी ट्विट करत त्यांना शुभेच्छा दिल्या. “जशी उत्सुकता, उत्कंठा व मनाची घाळमेळ शाळेच्या पहिल्या दिवशी होती तशीच काहीतरी भावना आज […]

Mumbaitak
follow google news

“सत्यजित, आज खऱ्या अर्थाने तुझ्या कामकाजाला सुरुवात होतेय”

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडून आल्यानंतर आज आमदार सत्यजित तांबेंनी सभागृहात हजेरी लावली. विधानभवनात प्रवेश करतानाच्या भावना सत्यजित तांबेंनी व्यक्त केल्या. त्यावरच त्यांचे वडील सुधीर तांबे यांनी ट्विट करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

हे वाचलं का?

“जशी उत्सुकता, उत्कंठा व मनाची घाळमेळ शाळेच्या पहिल्या दिवशी होती तशीच काहीतरी भावना आज विधानभवनात सदस्य म्हणून प्रवेशाच्या पहिल्या दिवशी आहे. माझे आई-वडील-मामा,माझे सर्व मित्र, माझे मतदार, सर्व ज्येष्ठ नेते यांच्या आशिर्वादाने आज कामकाजाला सुरुवात करीत आहे”, असं सत्यजित तांबे म्हणाले.

सत्यजित तांबे यांचं ट्विट रिट्विट करत सुधीर तांबे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. “सत्यजीत, आज खऱ्या अर्थाने तुझ्या कामकाजाला सुरुवात होतेय. मला खात्री आहे विधानभवनात देखील तू पदवीधरांचे, तरुणांचे, सर्वसामान्यांचे प्रश्न त्याच ताकदीने मांडशील आणि यशस्वीपणे सोडवशील! माझ्या शुभेच्छा नेहमी तुझ्या पाठीशी आहेत”, असं सुधीर तांबे यांनी म्हटलं आहे.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा : मुख्यमंत्री म्हणाले पंतप्रधानांची भेट घेणार

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्याचा मुद्दा ज्येष्ठ सदस्य छगन भुजबळ यांनी उपस्थित केला. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात सांगितलं की, “लवकरच, तातडीने मी आणि उपमुख्यमंत्री आणि शिष्टमंडळ, आपण पंतप्रधानांना भेटू. त्यांना विनंती करू. आपली विनंती ते मान्य करतील. आपण त्यासाठी तातडीने जाऊन भेट घेऊ, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

Maharashtra budget Session: मिलिंद नार्वेकरांची चूक, आदित्य ठाकरेंनी आणून दिली लक्षात

राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली. मात्र, अभिभाषण सुरू असताना एका गोष्टीमुळे गोंधळ झाला. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सचिव मिलिंद नार्वेकर हे थेट अभिभाषणावेळी विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये जाऊन बसले.

विधान परिषद आणि विधानसभेच्या सदस्यांसमोर राज्यपाल सेंट्रल हॉलमध्ये अभिभाषण करतात. सेंट्रल हॉलमध्ये फक्त आमदारांनाच प्रवेश असतो. मात्र मिलिंद नार्वेकर सेंट्रल हॉलमध्ये जाऊन पोहोचल्याने याची चर्चा सुरू झाली.

आदित्य ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांना लगेच त्यांची चूक लक्षात आणून दिली. त्यानंतर मिलिंद नार्वेकर सेंट्रल हॉलमधून उठून बाहेर गेले. प्रेक्षक गॅलरी समजून सेंट्रल हॉलमध्ये जाऊन बसलो होतो. पण, चूक लक्षात आल्यावर लगेच बाहेर आलो, असं मिलिंद नार्वेकर यांनी सांगितलं.

भास्कर जाधवांनी अध्यक्षांना काय केली विनंती?

संपूर्ण देशात महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या सर्वोच्च सभागृहाचा देशामध्ये काय सन्मान आहे, हे सांगितलं आणि ते राखण्याची जबाबदारी सर्वांची आहे, असं सांगितलं. अध्यक्ष महोदय हे आम्हाला मान्य आहे पण माझी सूचना वजा विनंती आहे की, याची सुरूवात आणि आमच्याकडून घेण्याची जबाबदारी या सभागृहाच्या सर्वोच्च स्थानावर बसलेल्या आपली म्हणून आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, भास्करराव दम देताहेत. ठिके मागच्या वेळी मी सांगितलं की, माझा आवाज मोठा आहे. तुमचा आवाज मोठा होता, नाना पाटेकरांनी सांगितल्यामुळे बारीक केला. राज्यपालांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव सत्ताधारी पक्षाने मांडायचा असतो. जे सत्ताधारी पक्षाला समर्थन करणारे पक्ष असतात, त्यातल्या एखाद्या सदस्याने उठून अनुमोदन द्यायचं असतं. हा काही हट्टाचा, विरोधाचा भाग नाही. ही बाब मी लक्षात आणून देत होतो. ते तुम्ही त्यांना सांगितलं असतं तर बरं झालं असतं.

राज्यपालांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात

राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. सरकारकडून करण्यात आलेल्या कामांचा आणि भविष्यातील कामांचा लेखाजोखा अभिभाषणात मांडला. यात ७५ हजार तरुणांसाठी रोजगार निर्मितीचा निर्णय, मराठा समाजासाठी विशेष योजना, पेन्शन योजनेत सुधारणा, राज्यात विविध क्षेत्रात नोकरभरती सुरू, केंद्राप्रमाणे राज्यातही आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना आदी बाबींचा उल्लेख राज्यपालांनी केला.

आम्हाला व्हिप मिळालेला नाही, सुनील प्रभूंनी दिलं उत्तर

शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी व्हिप बजावला आहे. त्यावरून सुनील प्रभू यांनी आक्रमक भूमिका घेतली. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच सुनील प्रभू म्हणाले, “आम्हाला अजूनही व्हिप मिळालेला नाही. सुप्रीम कोर्टात त्यांच्या वकिलांनी सांगितलेलं आहे की आम्ही व्हिप बजावणार नाही. असं असतानाही त्यांनी व्हिप बजावला, तर आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ. सभागृहात उपस्थित राहण्याबद्दल जो व्हिप असेल, तो आम्ही काढू. ते आमच्यावर बजावू शकत नाही. त्यांनी तसं कोर्टात सांगितलेलं आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. यात नंतर कळेल. जे योग्य असेल ते करू, असा इशारा सुनील प्रभू यांनी दिला आहे.

शिवसेनेच्या 56 आमदारांसाठी व्हिप जारी

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं आहे. असं असलं तरी या निर्णयाला ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला आणि शिंदे गटाला नोटीस बजावली असून, दोन आठड्यानंतर यावर सुनावणी होणार आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाने कोणताही व्हिप जारी करणार नाही, अशी माहिती दिली होती. मात्र, शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांसाठी व्हिप जारी केला आहे. अधिवेशनात आमदारांनी उपस्थित राहण्यासंदर्भातील हा व्हिप आहे. आदित्य ठाकरेंसह सर्वांसाठी हा व्हिप असला, तरी व्हिप न पाळल्यास कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असं भरत गोगावले यांनी स्पष्ट केलं.

कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा गाजणार

काही दिवसांपूर्वी आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावरही हल्ल्याची घटना समोर आली होती. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर पाळत ठेवली जात असल्याचं आणि त्यांचा विनायक मेटे करण्याची चर्चा, जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची दिलेली धमकी आणि राज्यातील विविध भागात वाढलेल्या गुन्हेगारीच्या घटनांवरून विरोधक सरकारची कोंडी करण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच राज्यात कायद्याचे राज्य अस्तित्वात आहे का? असा सवाल करत त्याचे सुतोवाच केले आहे.

    follow whatsapp