Maharashtra Cabinet Expansion Latest News, Eknath Shinde-Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार जाऊन महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झालं, त्याला आता वर्ष झालं आहे. गेल्या वर्षभरात शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सातत्याने होत राहिल्या. सरकारच्या वर्षपूर्तीच्या पूर्वसंध्येला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली असून, देवेंद्र फडणवीस यांनीही याला दुजोरा दिला. फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्तही सांगून टाकला.
ADVERTISEMENT
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना युतीने राज्यात सरकार स्थापन केले. सरकारला वर्षपूर्ण झाले असून, मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्यांचे डोळे विस्ताराकडे लागले आहेत. दरम्यान, मुख्यमत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल चर्चा झाल्याचंही फडणवीसांनी सांगितलं.
शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार?
औरंगाबाद दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना दिल्ली भेटीचं कारण आणि मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल प्रश्न विचारण्यात आला.
हेही वाचा >> शरद पवारांच्या ‘त्या’ गुगलीवर गेली अजित पवारांची विकेट? फडणवीस ‘सेफ’?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “राज्याचे अनेक प्रश्न असतात. त्यासंदर्भात भेट घ्यावी लागते. त्याचा पाठपुरावा करावा लागतो. अनेक वेळा त्यासंदर्भातील बैठका देखील असतात. आणि अर्थातच तुमचा जो आवडता प्रश्न आहे की, तर विस्तार देखील आम्हाला करायचाच आहे. त्यामुळे मुख्यमंत्री त्याबद्दल निर्णय घेतीलच, पण जुलै महिन्यात आम्ही विस्तार करू. तारीख कुणीच सांगत नाही.”
हेही वाचा >> ‘मोदी-शाहांच्या इशाऱ्यावर शिंदेंनी कोंबडी कापून खाण्याचे ठरवलंय’, BMC मोर्चा आधी ‘सामना’तून हल्ला
“केंद्रातील मंत्रिमंडळाचा विस्तार आणि राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार यांचा आपापसात काहीही संबंध नाही. केंद्राचा कधी होणार, हे आम्हाला माहिती देखील नाही. आम्ही राज्याच्या विस्तारात जास्त इंटरेस्टेड आहोत,” असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. मिळालेल्या माहितीप्रमाणे मंत्रिमंडळ विस्तार जुलैमध्ये रविवारच्या दिवशी आणि राजभवनातच होऊ शकतो.
शिंदे-फडणवीस आणि अमित शाह यांच्या काय झाली चर्चा?
मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीत तिन्ही नेत्यांची बैठक जवळपास तीन ते चार तास चालली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. त्याचबरोबर शिंदे-फडणवीस आणि शाहांमध्ये किती मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करायचा? त्यांना कोणती खाती द्यायची? सध्या एका मंत्र्याकडे एकापेक्षा अधिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आहे. त्यामुळे किती जणांना पालकमंत्री करायचं? आणि कुणाला कोणती खाती द्यायची? याबद्दल चर्चा झाल्याची माहिती आहे.
हेही वाचा >> Senthil Balaji : राज्यपाल मंत्र्याची हकालपट्टी करू शकतात, कायदा काय सांगतो?
चार मंत्र्यांना डच्चू मिळणार?
मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांनी गेल्या महिनाभरापासून जास्तच जोर धरलाय. याची सुरूवात शिंदेंच्या शिवसेनेतील चार मंत्र्यांना डच्चू दिला जाणार, या वृत्ताने झाली होती. यात गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, दादा भूसे, अब्दुल सत्तार यांची नावे प्रामुख्याने चर्चेत राहिली. आता देवेंद्र फडणवीस यांनी जुलै महिन्यातच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत मंत्रिमंडळातून कुणाला डच्चू मिळणार की नाही, हेही स्पष्ट होईल.
ADVERTISEMENT