Politics of Maharashtra : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात रात्री (10 जुलै) उशिरापर्यंत मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर बैठक झाली. अजित पवार गट सत्तेत सामील झाल्याने काही मुद्द्यांवरून मोठा पेच निर्माण झाला असून, त्याच पार्श्वभूमीवर या बैठकीत तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. (Eknath Shind, Ajit Pawar, Devendra Fadnavis meeting on Maharashtra Cabinet Portfolio Allocation)
ADVERTISEMENT
अजित पवार यांच्यासह 9 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेऊन आठ दिवसांपेक्षा अधिक काळ लोटला असून, बिनखात्याचे मंत्री आहेत. खातेवाटपावरून घोडं अडलं असून, अजित पवार गटाकडून काही महत्त्वाची खाती मागण्यात आलेली आहेत. अर्थ व नियोजन खातं अजित पवारांना देण्यास एकनाथ शिंदेंच्या आमदारांचा विरोध आहे. त्यामुळेच यावरून धुसपूस दिसत आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर बैठक
दरम्यान, 17 जुलैपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यापूर्वी खातेवाटप करावी लागणार आहे. पुढील दोन दिवसांत खातेवाटप होण्याची सांगितलं जात असतानाच एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात रात्री उशिरापर्यंत बैठक झाली.
वाचा >> BJP: उद्धव ठाकरेंना नितीन गडकरींनी सुनावलं, म्हणाले; जरा तुमची भाषा…
वर्षा बंगल्यावर तब्बल तीन तास ही बैठक चालली. रात्री (10 जुलै) 11 वाजून 12 मिनिटांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर पोहोचले. ते मध्यरात्री (11 जुलै) 2 वाजून 9 मिनिटांनी बाहेर पडले. या बैठकीसाठी अजित पवार हे 12.03 वर्षा बंगल्यावर पोहोचले होते. पण, देवेंद्र फडणवीसांच्या आधीच म्हणजे 1 वाजून 26 मिनिटांनी बाहेर पडले.
अजित पवार गटाला अर्थ व नियोजन, ग्रामविकास, सामाजिक न्याय, ऊर्जा, गृहनिर्माण, महिला व बालविकास आणि अल्पसंख्याक ही खाती हवी आहे. यातील अर्थ व नियोजन हे खातं अजित पवारांकड देण्यास शिंदेंच्या आमदारांचा विरोध आहे. त्याचबरोबर इतर काही खाती भाजपच्या नेत्यांकडे असून, त्यांचीही नाराजी असल्याचे समजते. या सगळ्यातून मार्ग काढण्यासाठी कसरत सध्या सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही बैठक झाल्याचे समजते.
मंत्रिमंडळ विस्तार कधी?
शिवसेनेच्या आमदारांसह भाजपतील काही इच्छुकांचे मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागलेले आहे. जुलैमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होणार, हे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी इच्छुकांमध्ये आनंद होता, पण 2 जुलै रोजी झालेल्या शपथविधीने त्यांच्या आनंदावर विरजण पडले.
वाचा >> एकनाथ शिंदेंना नको तेच होणार; अजित पवारांकडे जाणार तिजोरीच्या चाव्या!
अचानक अजित पवार गटाची सत्तेत एन्ट्री झाल्याने दुसरा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, याबद्दल अजून चित्र स्पष्ट झालेले नाही. मुख्यमंत्री शिंदेंनी लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं सांगितलं असलं तरी त्याबद्दलची अनिश्चितता कायम आहे. दुसरीकडे अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार करण्याची मागणी शिवसेनेच्या आमदारांकडून केली जात आहे. त्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंकडे तगादा लावला असल्याचेही राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.
ADVERTISEMENT
