Maharashtra Politics : शिवसेनेत 2022 मध्ये झालेल्या राजकीय बंडानंतर अनेक नेते उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंसोबत जात असल्याचं चित्र आहे. नुकताच ठाकरे गटाच्या विधान परिषदेतील आमदार मनिषा कायंदे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. आता आमदार कायंदे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने ठाकरेंच्या शिवसेनेकडे असलेले विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते पद धोक्यात आलं आहे. त्यामुळे कायंदेंच्या सोबत विरोधीपक्ष नेते पद देखील ठाकरेंना सोडावं लागणार का?, हेच आपण समजावून घेऊयात…
ADVERTISEMENT
ठाकरेंच्या विधान परिषदेतील आवाज असलेल्या मनिषा कायंदे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या आदल्या दिवशीच कायंदे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. कायंदे या विधान परिषदेच्या आमदार आहेत. त्यांनी विधान परिषदेत ठाकरेंची बाजू चांगलीच लावून धरली होती. आता कायंदे यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केल्याने त्यांचं विधान परिषदेतील संख्याबळ देखील कमी झालं आहे.
हेही वाचा >> Lok Sabha : भाजपचं मिशन-80 काय?; खासदारांना फॉर्ममधून द्यावा लागणार हिशोब
मनिषा कायंदे यांच्या जाण्याने आता ठाकरे गटाचे 9 आमदार विधान परिषदेत राहिले आहेत. तितकीच संख्या राष्ट्रवादी काँग्रेसची देखील विधान परिषदेमध्ये आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाकडून विरोधीपक्ष नेते पदावर दावा करण्यात येण्याची शक्यता आहे.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावरही राष्ट्रवादीचा डोळा
राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी विरोधीपक्ष नेते पद राष्ट्रवादीकडे असावं असं देखील बोलून दाखवलं आहे. त्यातच ठाकरेंचं विधान परिषदेतील संख्याबळ कमी झाल्याने विरोधीपक्ष नेते पदावर दावा करणार का? असं जेव्हा अजित पवारांना पत्रकरांनी विचारलं, तेव्हा स्मितहास्य करत, त्यांनी ‘तुम्ही लक्षात आणून दिल्यामुळे आम्ही यावर विचार करु’ असं म्हंटलं. त्यामुळे राष्ट्रवादी या पदावर दावा करणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
Video >> शिवसेना शाखेतच शिवसैनिक आणि मुंबई पोलिस आमनेसामने आल्यावर काय झालं?
सध्या विधान सभेचं विरोधीपक्ष नेते पद हे राष्ट्रवादीकडे आहे. अजित पवार हे विधान सेभेचे विरोधीपक्ष नेते आहेत. तर ठाकरे गटाचेच आंबादास दानवे हे विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते आहेत. ठाकरे गटाच्या नीलम गोऱ्हे या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते पदावर दावा करु शकते. किंवा काँग्रेस देखील ही जागा मागण्याची शक्यता आहे. सर्व महत्त्वाची पदं ठाकरे गट आणि राष्ट्रवादीकडे असल्याने काँग्रेस देखील या जागेवर दावा करु शकते.
विधान परिषदेमध्ये कुठल्या पक्षाचं किती आहे बलाबल?
विधान परिषदेमध्ये भाजपचे 22 आमदार आहेत. मनिषा कायंदे यांच्या जाण्यामुळे ठाकरे गटाचे 9 आमदार आता विधान परिषदेत राहिले आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचे 2 आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 आमदार आहेत, तर काँग्रेसचे 8 आहेत. अपक्ष व इतर असे 7 आमदार आहेत, तर विधान परिषदेच्या 21 जागा या सध्या रिक्त आहेत.
हेही वाचा >> शिंदे-ठाकरेंची मोर्चेबांधणी, पण हर्षवर्धन जाधवांमुळे होणार ‘करेक्ट कार्यक्रम’?
ज्यावेळी विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेते पदावरुन चर्चा सुरु झाली तेव्हा ‘महाविकास आघाडी म्हणून आमच्यात सामंजस्य आहे. विधान परिषदेत अंबादास दानवे हेच विरोपक्ष नेते राहतील’, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी यावर दिली. त्यामुळे येत्या काळात राष्ट्रवादी या पदावर दावा करते की, ठाकरेंकडेच हे पद राहतं हे पाहावं लागेल.
ADVERTISEMENT