मुंबई: ‘मुंबई महापालिकेत (BMC) उबाठाच्या लोकांनी जे गैरधंदे केले त्याची एसआयटी मार्फत पोलिसांमार्फत चौकशी होणार हे स्पष्ट झाले. त्यामुळे उबाठाचा मोर्चा निघणार आहे. हा मोर्चा म्हणजे “चोर मचाए शोर” असा प्रकार आहे. ‘लागली मिरची निघाला मोर्चा’ अशी गत आहे. अशी टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली. (march on mumbai municipal corporation scam uddhav thackeray 1 july bjp ashish shelar)
ADVERTISEMENT
आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर तुफान टीका
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना शेलार म्हणाले की, ‘ज्यावेळी कॅगने चौकशी करून आपला अहवाल जेव्हा विधानसभेच्या पटलावर ठेवला त्यावेळी उबाठाचे आमदार गप्प बसले याचा अर्थ त्यांची मूकसंमती होती. यांनी भ्रष्टाचार केला हे जणू मान्य केले. मुंबईकरांचा करातून जमा झालेला पैसा माझे कुटुंब आणि माझी जबाबदारीसाठी आणि माझे कुटुंब आणि माझे कंत्राटदार यासाठी जो खर्च झाला त्याची एसआयटी मार्फत चौकशी होणार म्हणून मिरची लागली का? हा निर्णय घेणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभारच मानायला हवे. जे-जे दोषी आहेत त्यांनी चौकशीला सामोरे जावे. कोविडच्या काळात एकीकडे जनता बेडसाठी तडफडत होती तर त्याचवेळी उबाठाचे लोक आपल्या नातेवाईकांना कंत्राटे देण्यात गुंतले होते. त्यामुळे चौकशी व्हायलाच हवी.’ असं शेलार यावेळी म्हणाले.
‘मोर्चाचा विषय आज अचानक का आला? परवा शिबीर झाले, काल वर्धापन दिन झाला त्यावेळी मोर्चाचा विषयी काही बोलले नाही. आता जेव्हा चौकशी लागली आणि आपण पकडले जाणार हे कळले तेव्हा आता मोर्चे काढणार आहेत. त्यामुळे हा प्रकार चोर मचाए शोर असा प्रकार आहे. मोर्चाचे नावच चोर मचाए शोर असे द्या.’ अशी टीका आशिष शेलार यांनी केली.
हे ही वाचा >> उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे असलेल्या महत्त्वाच्या पदावरच राष्ट्रवादीचा ‘डोळा’!
‘दुसरं कारण स्पष्ट आहे, ज्यावेळी महाविकास आघाडीची वाताहत होते आहे अशा वेळी आपल्या मुलाचे नेतृत्व उभे करण्यासाठी हा मोर्चा काढला जाणार आहे. त्यामुळे हा मोर्चा केवळ आपल्या मुलासाठी आहे, मुंबईकरांसाठी नाही.’ असा टोमणाही आशिष शेलार यांनी यावेळी मारला.
‘जो ज्या भाषेत बोलणार त्याच भाषेत आम्ही उत्तर देऊ तुम्ही जर देवेंद्र फडणवीस यांच्यावर रामदास पाद्येंची पात्र घेऊन बोलणार असाल तर मग रामदास पाद्येंचा तात्याविंचू कोण? असे ही आम्ही विचारू.’
मनसेचे संदीप देशपांडे यांना जी मारहाण झाली त्यातील आरोपी सापडले असून मालकाला खूश करण्यासाठी हे केल्याचे त्यांनी पोलीसांना सांगितले आहे. या आरोपींचा तुमच्या पक्षाशी सबंध काय? हे उध्दव ठाकरे यांनी सांगावे. याबाबत बोलायला ते तयार नाहीत. पालिकेतील भ्रष्टाचाराबाबत प्रश्न विचारला म्हणून संदीप देशपांडे यांना स्टंप, बॅट घेऊन जर मारहाण करता तर भविष्यात तुम्हाला दीड कोटी मुंबईकर पै आणि पैचा हिशोब विचारणार आहे, तेव्हा तुमच्याकडे तेवढे स्टंप आणि बॅट आहेत का? असा उपरोधिक सवाल ही शेलार यांनी केला.
उद्धव ठाकरेंनी टाकला नवा डाव
मागील वर्षभरात महापालिका निवडणूक झालेली नाही. त्यामुळे सध्याचं सरकार हे महापालिकेचा वारेमाप पैसा वापरत असून आतापर्यंत 9 हजार कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे. शिवसेना (UBT) आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात 1 जुलै रोजी मुंबई महापालिकेवर मोर्चा काढणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरेंनी केली.
‘एक वर्ष होऊन गेलं.. पण महापालिकेची निवडणूक झालेली नाही. पावसाप्रमाणे निवडणुका लांबत चालल्या आहे. निवडणुका घेण्याची हिंमत सरकारमध्ये नाही. लोकांची कामं, सेवा कशी करायची?, पैसा उधळला जातोय, खर्च केला जातोय. त्याला जाब विचारणारं कोणीच नाही. मुंबई महापालिकेत वारेमाप उधळपट्टी सुरू आहे. मुंबईला मायबापच कोणी राहिलेला नाही. जे काही आहे ते लुटालूटच सुरू आहे. महापालिकेतील भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी येत्या 1 जुलैला शिवसेना महापालिकेवर विराट मोर्चा काढणार आहे.’ अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत केली.
हे ही वाचा >> ‘तो’ Video पाहिला, 700 किमी प्रवास करत आला अन् घटस्फोट घेतलेल्या बायकोला…
‘या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना नेते आणि आदित्य करेल. एक काळ असा होता की, मुंबई महापालिका 650 कोटी तुटीत होती. त्यानंतर शिवसेनेने कारभार जेव्हा सांभाळला तेव्हापासून आतापर्यंत 92 हजार कोटींच्या ठेवीपर्यंत कारभार गेला आहे.’
‘हे सगळे पैसे महापालिकेचे होते असं नाही. यात काही ठेवी होत्या. त्या ठेवींमधून अनेक प्रकल्प देखील सुरू आहेत. मग ते कोस्टल रोड असेल किंवा इतर योजना पार पडत होत्या. आता कोणत्याही कामासाठी बेधडकपणे महापालिकेचा पैसा वापरला जातोय. माझ्या कानावर असं आलं की, जवळपास 9 हजार कोटी हे एफडीमधून वापरण्यात आले आहेत. हा जनतेचा पैसा आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी 1 जुलैला मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा काढणार आहे.’असं म्हणत उद्धव ठाकरेंनी यावेळी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली होती.
ADVERTISEMENT