Milind deora Joined Shiv Sena : ज्यांनी देशात आर्थिक उदारीकरण आणले, तेच आज उद्योजक आणि उद्योगपतींना देशद्रोही म्हणत आहे. आताची काँग्रेस आणि पूर्वीची काँग्रेस यात खूप फरक आहे. आताच्या काँग्रेसचे उद्दिष्ट फक्त मोदीजी जे बोलतील आणि जे करतील, त्याविरोधात बोलायचं इतकंच आहे”, अशा शब्दात माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेसवर घणाघात केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर देवरांनी काँग्रेस सोडण्याच्या कारणाचा खुलासा केला. (Former MP Milind Deora has joined Shiv Sena of Eknath Shinde)
ADVERTISEMENT
मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी मिलिंद देवरा यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना ते म्हणाले, “आजचा दिवस माझ्यासाठी खूप भावनिक आहे. मी खूप भावूक आहे. मी काँग्रेस सोडेन असं कधीच वाटलं नव्हतं. आज माझ्या कुटुंबाचे काँग्रेस पक्षाशी ५५ वर्षांचे जुने नाते शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संपवत आहे. माझं राजकारण नेहमीच सकारात्मक, संरचनात्मक राहिले आहे. आम्हा सर्वांना अभिमान आहे की एकनाथ शिंदे अत्यंत मेहनती, सर्वांसाठी उपलब्ध असलेले जमिनीवरचे नेते आहेत”, अशा शब्दात मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले.
मिलिंद देवरा पुढे म्हणाले, “मुंबई आणि महाराष्ट्रासाठी त्यांचं व्हिजन खूप मोठे आहे आणि त्यामुळे मला त्यांचे हात आणखी बळकट करायचे आहेत. पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांकडे देशासाठी मोठे व्हिजन आहे. शिवसेनेच्या माध्यमातून मला त्यांचे हात बळकट करायचे आहेत.”
माझ्या कुटुंबाचे शिवसेनेशी जुने नाते -मिलिंद देवरा
“माझ्या कुटुंबाचे शिवसेनेशी जुने नाते आहेत. माझे वडील मुरली देवरा हे बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने महापौर झाले आणि माझ्या आईचे माहेरचे नाव फणसळकर असल्याने बाळासाहेब मुरलीभाईंना महाराष्ट्राचे जावई म्हणायचे. एकनाथ शिंदे आणि माझ्या वडिलांमध्ये बरेच साम्य आहेत. दोघेही सामान्य कुटुंबातून आलेले आहे.
“खासदार होऊन शिंदेंच्या व्हिजनचं प्रतिनिधित्व करेन”
“माझ्यावर चुकीचा आरोप होण्याआधी शिंदेंनी मला पक्षात प्रवेश करण्याचे आमंत्रण का दिले, हे मी आज सांगू इच्छितो. याचं कारण आहे की, शिंदे साहेबांना मुंबई-महाराष्ट्राच्या हितासाठी काम करू शकणारे चांगले लोक हवे आहेत. खासदार होऊन मुंबई, महाराष्ट्र, शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या व्हिजनचे उत्तम प्रतिनिधित्व करू शकतो, असे एकनाथजी आणि श्रीकांतजी यांचे मत आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो”, असे म्हणत अप्रत्यक्षपणे त्यांनी निवडणुकीसाठी स्वतःची उमेदवारी घोषित केली.
हेही वाचा >> शिंदेंच्या शिवसेनेत जाण्यामागे देवरांचा ‘हा’ आहे खरा प्लॅन?
“सगळे मला विचारताहेत की आपण ५५ वर्षांपासूनचे काँग्रेस पक्षासोबतचे नाते का तोडले. मी एक गोष्ट सांगू इच्छितो की, मी पक्षाच्या सर्वात आव्हानात्मक काळात निष्ठावान राहिलो आहे. खेदाची बाब आहे की, आजची काँग्रेस १९६८ ची काँग्रेस जेव्हा माझे वडील या पक्षात आले. २००४ ची काँग्रेस जेव्हा मी या पक्षात सामील झालो, दोन्ही काँग्रेस खूप वेगळी आहे”, असे त्यांनी सांगितले.
“काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाने विधायक आणि सकारात्मक सूचना, गुणवत्ता आणि योग्यतेला महत्त्व दिले असते, तर आज एकनाथ शिंदे आणि मी इथे नसतो. एकनाथजींना मोठा निर्णय घ्यावा लागला. मलाही मोठा निर्णय घ्यावा लागला”, अशी भूमिका देवरा यांनी मांडली.
गौतम अदाणींवरील टीकेला देवरांनी दिले उत्तर
मिलिंद देवरांनी काँग्रेसवर पहिला हल्ला केला. राहुल गांधी गौतम अदाणींना लक्ष्य करताना दिसत आहे. यावरूनच आता मिलिंद देवरा यांनी टीकास्त्र डागलं. “आज खेदाची बाब आहे की, ज्या पक्षाने ३० वर्षांपूर्वी जेव्हा डॉ. मनमोहन सिंग हे केंद्रीय अर्थमंत्री होते. ज्या पक्षाने आर्थिक सुधारणा स्वीकारल्या. तोच पक्ष उद्योगपती, उद्योजकांना शिव्या देतोय. उद्योजकांना देशद्रोही म्हणत आहे”, असे ते म्हणाले.
हेही वाचा >> “राहुल गांधींशी बोलायचं आहे, दक्षिण मुंबईची जागा ठाकरेंच्या शिवसेनेकडे…”, मिलिंद देवरांचा काँग्रेस सोडण्यापूर्वी शेवटचा कॉल?
“जो पक्ष देशाच्या विकासासाठी विधायक सूचना मागवायचा, आज त्या पक्षाचे एकच उद्दिष्ट आहे, मोदींजी ते बोलतील, जे करतील त्याच्या विरोधात बोलायचं. उद्या जर मोदी म्हणाले की, काँग्रेस पक्ष एक चांगला पक्ष आहे, तर त्याचाही विरोध करतील. मी एक गोष्ट सांगू इच्छितो की, मी ज्या प्रकारच्या राजकारणावर विश्वास करतो, ते म्हणजे विकास, महत्त्वकांक्षा, सर्वसमावेशकता आणि राष्ट्रीय एकात्मता”, असे मिलिंद देवरा यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT