Mla Disqualification case uddhav thackeray rahul narvekar : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकालाच्या तारखेपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने वाद निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरेंनी थेट सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. न्यायमूर्तीच आरोपीला भेटत असतील तर कोणत्या न्यायाची अपेक्षा ठेवायची, असा सवाल ठाकरेंनी केला. ठाकरेंनी भूमिकेवरच शंका घेतल्याने राहुल नार्वेकरांनी मौन सोडत पलटवार केला.
ADVERTISEMENT
मुंबई विमानतळाबाहेर माध्यमांशी बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले, “असे आरोप केवळ निर्णय प्रक्रियेवर दबाव टाकण्यासाठी हेतूपुस्सर केले जात आहेत. मुख्यमंत्र्यांना अध्यक्ष कोणत्या कारणासाठी भेटतात, काय काय कामं असतात, याची कल्पना माजी मुख्यमंत्र्यांना असायला हवी, असं माझं मत आहे. तरीही ते आरोप करत असतील, तर त्याच्या मागचा हेतू काय आहे, स्पष्ट होते. विधानसभा अध्यक्ष अपात्रता याचिका निकाली काढत असतात, त्यावेळी त्यांनी इतर कामे करू नयेत, असा कुठेही आदेश नाहीये. विधानसभा अध्यक्ष म्हणून विधिमंडळ बोर्डाची कामे असतात. त्यात मुख्यमंत्रीही सदस्य असतात. आमदार म्हणून माझ्या मतदारसंघातील प्रश्न सोडवणं हेही माझं काम आहे. राज्याशी निगडित इतर जे प्रश्न आहे, त्यासंदर्भातही राज्यातील कार्यकारी मंडळाच्या मुख्य व्यक्तीशी संपर्क साधून जर प्रश्न सोडवण्याची मला गरज वाटत असेल, तर मला वाटत नाही की, मला त्यासाठी कुणाची परवानगी घेण्याची गरज आहे”, असं उत्तर राहुल नार्वेकर यांनी ठाकरेंना दिले.
एकनाथ शिंदेंची का घेतली भेट? राहुल नार्वेकर म्हणाले…
“माझी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक ३ जानेवारी रोजी नियोजित होती. परंतु ती होऊ शकली नाही, कारण मी आजारी होतो. मला तीन-चार दिवस घराबाहेर पडता आलं नाही. रविवारी मी मतदारसंघातील काही प्रश्न तसेच, विधिमंडळ बोर्डातील काही प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत तातडीने चर्चा करणं आवश्यक असल्यामुळे मी त्यांची भेट घेतली. त्या भेटीत कुलाबा-नरिमन पॉईंट कनेक्टरचा विषय, त्यात एमएमआरडीएकडून होणारी दिरंगाई, स्थानिकाचा विरोध… त्यामुळे तो पूल वरून न करता पाण्यातून करण्याचा प्रस्ताव मांडलेला आहे. त्यावर चर्चा करायची होती. दक्षिण मुंबईतील आठ रस्त्यांचे काँक्रिटीकरण थांबलेलं आहे, ते त्वरित चालू करणं आवश्यक आहे. दक्षिण मुंबईतील सहा ठिकाणी सुशोभीकरण करणं आणि विधिमंडळातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची कायम स्वरुपी नियुक्ती करणे आणि १३२ पदे रिक्त आहेत, त्यावर निर्णय घेण्यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांना भेटलो”, अशी भूमिका नार्वेकर यांनी शिंदेंच्या भेटीबद्दल मांडली.
हेही वाचा >> शिंदे-ठाकरेंची धडधड वाढली, व्हीपच करणार करेक्ट कार्यक्रम!
“जी लोक स्वतः माजी मुख्यमंत्री झाली आहेत, त्यांना विधानसभा अध्यक्ष्यांचा कार्याची माहिती असावी, त्यांनीच जर असे बिनबुडाचे आरोप केले, तर त्यांचा हेतू काय आहे, आपल्या सर्वांना समजलं असेल. मी आज विमानतळावर जयंत पाटील आणि अनिल देसाईंना भेटलो, मग तेही हेतू पुरस्सर होतं का? माझी तिकडे भेट झाली. चर्चा होते. ज्या आमदारांवर अपात्रतेची याचिका दाखल आहे, त्यापैकी एकही मला भेटला नाही का? मला सुनील प्रभू येऊन भेटले, अजय चौधरी भेटलेत. मला अनेक लोक येऊन भेटलेत. मी या कुणाला भेटायचं नाही का?”, असा सवाल राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरेंना केला.
राज्याच्या जनतेला न्याय मिळेल -नार्वेकर
“जेव्हा बिनबुडाचे आरोप होतात, त्यावेळी ते केवळ जो व्यक्ती निर्णय घेत असतो, त्या व्यक्तीच्या निर्णय प्रक्रियेवर दबाव टाकण्यासाठी असे आरोप केले जातात. राज्याच्या आणि देशाच्या जनतेला मी आश्वासित करू इच्छितो की, मी जो निर्णय घेणार आहे, तो संविधानाच्या तरतुदींच्या आधारावर, १९८६ चे जे नियम आहेत, त्याच्या आधारावर आणि विधिमंडळाचे जे पायंडे आहेत, ज्या प्रथा परंपरा आहे, त्या सर्वांचा विचार करून अत्यंत कायदेशीर शाश्वत निर्णय मी घेईन. ज्यातून या राज्याच्या जनतेला न्याय मिळेल”, असे राहुल नार्वेकर म्हणाले.
ADVERTISEMENT