Namdev Shastri: बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणमुळे सध्या अवघा बीड जिल्हा ढवळून निघाला आहे. त्यातच सर्वपक्षीय नेत्यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. असं असताना काल (31 जानेवारी) अचानक धनंजय मुंडे यांनी भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. ज्यानंतर मीडियाशी बोलताना नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंना भक्कम पाठिंबा असल्याचं सांगितलं. पण त्याचवेळी त्यांनी एक वादग्रस्त विधान देखील केलं.
ADVERTISEMENT
'मला अजूनही मीडियाला विचारावं वाटतं की, ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, निर्घृण हत्या केली. त्यांची मानसिकता का बिघडली हे मीडियाने का नाही दाखवली? कारण की, त्यांना अगोदर जी मारहाण झाली आहे ती पण दखल घेण्याजोगी आहे. असं मला वाटतं.' असं म्हणत नामदेव शास्त्री यांनी खरं तर मारेकऱ्यांची मानसिकता कशी बिघडली? असा भुवया उंचावणारा सवाल उपस्थित केला.
हे ही वाचा>> धनंजय मुंडेंवरचा 'तो' प्रश्न अन् नामदेव शास्त्री मुंबई Tak च्या LIVE शोमधून उठून गेले!
'मारेकऱ्यांना अगोदर जी मारहाण झाली आहे ती पण दखल घेण्याजोगी आहे...', पाहा नामदेव शास्त्री नेमकं काय म्हणालेले
'तास, दोन तास आम्ही बोललो दोघं व्यवस्थित.. राजकीय बोललो, सामाजिक बोललो.. आध्यात्मिक बोललो.. दोन-अडीच तास चर्चा झाली. त्यांच्या मानसिकतेचा आढावा घेतला मी. सगळं समजून घेतल्यानंतर मला असं जाणवलं की, जो मुलगा राजकीय घराण्यामध्ये जन्माला आला आहे आणि पक्षाचे सगळे नेते ज्याचे बालमित्र आहेत त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला गुन्हेगार का ठरवतात? असं मला वाटतं. कारण की, इतक्या वर्षांपासून तो जवळ आहे. गोपीनाथरावांचा पुतण्या आहे. त्याची पार्श्वभूमी ही गुन्हेगाराची राहिलेली नाहीच.'
हे ही वाचा>> Dhananjay Munde : "भगवानगडाच्या पाठिंब्यामुळे मोठी ताकद मिळाली, आत्मविश्वास वाढला"
'त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवतायेत असं मला वाटतं. पण यात नुकसान आमच्या संप्रदायाचं इतकं झालं की, गेल्या 700 वर्षांपासून जातीवाद नसावा या मताचे ज्ञानेश्वर महाराज आहेत. जातीवाद नष्ट होत असताना काही राजकीय स्वार्थी लोकांनी पुन्हा तो उफळून आणला. हे संतांच्या कार्यावर कुठे तरी पाणी फिरलं असं वाटतं.'
'भक्कम पाठीमागे आहोत.. केवळ पाठीमागे नाही तर भक्कमपणे पाठीमागे आहे. दोन भाग आहेत याचे. जे गुन्हेगार असतील त्यांचा शोध सुरू आहे. मला अजूनही मीडियाला विचारावं वाटतं की, ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, निर्घृण हत्या केली. त्यांची मानसिकता का बिघडली हे मीडियाने का नाही दाखवली?'
'कारण की, त्यांना अगोदर जी मारहाण झाली आहे ती पण दखल घेण्याजोगी आहे. असं मला वाटतं. तो त्यांच्या गावातील बैठकीतील विषय आहे. अशा संवेदनशील विषयाला राजकीय हवा देऊन सामाजिक सलोखा बिघडला असं वाटतं मला यातून.'
'तो त्यांचा गावाचा मुद्दा आहे तो आणि खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत ना. ज्यावर मीडिया आज आक्षेप करतो. गेले 53 दिवस मीडिया ट्रायल सुरू आहे. यामध्ये धनंजय मुंडे हे खंडणी घेऊन जगणारे धनंजय मुंडे नाही ना. त्याची पार्श्वभूमी ती नाही ना.'
'धनंजय गुन्हेगार नाहीए हे मी 100 टक्के सांगू शकतो आणि गड त्याच्या पाठीमागे उभा आहे. पक्षाचे जे नेते आहेत त्यांना देखील याची जाणीव आहे.'
'जाणीवपूर्वक त्रास दिला जातोय. मी धनंजयला बोललो देखील की, आमच्या क्षेत्रात इतका त्रास सहन करणारा असतात तर मोठा संत झाला असतास. कारण की, एकदाच धनंजयवर ही पाळी आलेली नाही. घर फुटलं तेव्हा धनंजयने भरपूर सोसलंय. गेल्या 53 दिवसापासून तरी त्याची मानसिक अवस्था काय आहे.. तुम्ही त्याच्या हाताला पाहा सलाइन लावली आहे. किती सहन करावं एखाद्या माणसाने.' असं म्हणत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे.
ADVERTISEMENT
