राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी शरद पवार कायम राहणार का? पवारांनी निर्णय कायम ठेवला, तर पुढचा अध्यक्ष कोण? राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्र अजित पवारांकडे जाणार की, सुप्रिया सुळेंकडे? असे वेगवेगळे प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. राष्ट्रवादीत निर्माण झालेल्या या परिस्थितीवर भाष्य करताना माजी आमदार शालिनीताई पाटील यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप करत मोठं विधान केलं आहे.
ADVERTISEMENT
अजित पवार, जरंडेश्वर साखर कारखाना आणि ईडी प्रकरण
शालिनीताई पाटील म्हणाल्या, “जरंडेश्वर सहकारी सोसायटी एक भाग आहे. जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना हा एक भाग आहे. जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याला 2010 ला लिलावाची नोटीस आली. 2007 ते 2010 या काळात शिखर बँकेने महाराष्ट्रातल्या 45 सहकारी साखर कारखान्यांची विक्री केली. अजित पवार त्याचं समर्थन करताहेत कारण ते त्यावेळी शिखर बँकेचे सर्वेसर्वा होते. 70 संचालकांपैकी 57 संचालक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते. बाकीचे नियुक्त आणि काही सरकारचे प्रतिनिधी होते. पण, त्या काळात घेतलेले हे निर्णय, पैशाचं वाटप. या सगळ्यामध्ये अजित पवारांनी अध्यक्षता केलेली आहे.”
हेही वाचा >> नरेंद्र मोदी शिवसेनेपेक्षा ‘राष्ट्रवादी’साठी आग्रही होते; शरद पवारांचा गौप्यस्फोट
“कोर्टाच्या निर्णयामध्ये कोणती बैठक किती तारखेला झाली आणि त्यामध्ये कोण कोण उपस्थित होते, यामध्ये पहिलं नाव अजित पवारांचं आहे. त्यामुळे ते लिलाव झाले. कालपरवा ते बोलले की ते सगळे कारखाने तोट्यात होते. ते तोट्यात असले तरी पुनर्वसनासाठी केंद्र सरकार पैसे द्यायला तयार होतं. महाराष्ट्र सरकारला त्यांनी कळवलं होतं. यादी आणि समस्या कळवा असं सांगितलं होतं. समित्या नेमल्या पण, वेळेत प्रस्ताव पाठवले नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार असेपर्यंत ते उपमुख्यमंत्री होते”, असंही शालिनीताई पाटील यांनी म्हटलं आहे.
“ईडीच्या कोर्टानं जो निकाल दिला आणि कारखाना ताब्यात घेण्यास सांगितलं. त्यानंतर ईडी आणि आयकरने धाडी टाकल्या. ईडीच्या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे की, अजित पवारांनी जरंडेश्वर कारखान्यात 1400 कोटींचं मनी लॉड्रिंग केलेलं आहे. गुरू कमोडिटी नावाची संस्था सांगत असले, तरी त्याचे प्रमुख अजित पवार आहेत. 45 पैकी 13 कारखाने अजित पवारांनी वेगवेगळ्या नावाने कंपन्या काढून घेतलेले आहेत. 45 पैकी 90 टक्के कारखाने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतलेले आहेत”, असं त्या म्हणाल्या.
हेही वाचा >> शरद पवारांचा राजीनामा : ‘सामना’तून पुन्हा अजित पवारांबद्दल शंका, दोन सवाल
“राजेश टोपे यांनी पुणे जिल्ह्यातील एक कारखाना 3 कोटींना घेतला. 3 कोटींना कारखाना मिळतो का? त्यांच्या जमिनीचं शंभर एकर असेल. सरकारने दिलेल्या जमिनी आहेत. त्यामुळे कोर्टांचं जे म्हणणं आहे की हा 25 हजार कोटींचा घोटाळा आहे. ते अभ्यासपूर्ण आहे. ज्या माणसाने एकट्याने 13 कारखाने घेतले, ते त्याचं समर्थन करणारच ना. पण, ते विकायचं काही कारण नव्हतं. तुम्ही केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला असता, तर कारखाने विकावे लागले नसते”, असा दावा शालिनीताई पाटील यांनी केला.
सुप्रिया सुळेंना अध्यक्ष करावं; शालिनीताई पाटील नक्की काय बोलल्या?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोण असावं, याबद्दल बोलताना शालिनीताई पाटील म्हणाल्या, “जर पुढचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष ठरवायचा असेल, तर सुप्रिया सुळे यांनाच बनवावं. कारण ती याच्यासाठी सक्षम आहे. अजित पवार हे घोटाळेबाज आणि गुन्ह्याखाली अडकलेले नेते आहेत. त्यांना कधीही अटक होऊ शकते म्हणून त्यांना अध्यक्षपद देणं हे चुकीचं ठरेल”, असं मोठं विधान त्यांनी केलं.
“अजित पवारांच्या पाठिशी भाजपच्या एका मोठ्या नेत्याचा हात”
शालिनीताई पाटील यांनी आणखी एक मोठा दावा केला आहे. त्या म्हणाल्या, “आमदार हसन मुश्रीफ यांना 100 कोटीच्या मनी लॉन्ड्रीग प्रकरणात ईडी चौकशीसाठी बोलवते, पण अजित पवार यांना 1400 कोटींच्या मनी लॉन्ड्रीग प्रकरणात का बोलवत नाही? अजित पवार यांच्या पाठीशी भाजपच्या एका मोठ्या नेत्याचा हात आहे, म्हणून त्यांना सावली भेटत आहे आणि कुठल्याही चौकशीसाठी त्यांना बोलवणं येत नाही. अजित पवार यांना कधीही अटक होऊ शकते. एवढे त्यांच्यावर गुन्हे आणि आरोप आहेत.”
ADVERTISEMENT