Nawab Malik Maharashtra Assembly Winter Session 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यापासून माजी मंत्री नवाब मलिक कोणत्या गटात असा प्रश्न सातत्याने उपस्थित होत आहे. यावर नवाब मलिक यांनीही मी खऱ्या राष्ट्रवादीसोबत असल्याचे सांगत संभ्रम कायम ठेवला होता. पण, आता नवाब मलिक नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावणार आहेत. त्यामुळे ते कोणत्या बाकावर बसणार, यावरून त्यांची भूमिका स्पष्ट होणार आहे. दरम्यान, मलिक यांना अजित पवारांनी कॉल केला होता. त्याचबरोबर अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांच्या कार्यालयात गेल्याने ते महायुतीच्या वाटेवर असल्याची सांगितले जात आहे.
ADVERTISEMENT
नवाब मलिक हे सध्या वैद्यकीय कारणामुळे जामिनावर आहेत. तुरुंगातून बाहेर आल्यापासून ते अलिप्त असल्याचे दिसत होते. मात्र, हिवाळी अधिवेशनाला हजर झाल्याने मलिक सक्रिय झाल्याचे म्हटले जात आहे. त्यातच मलिक अजित पवारांबरोबर जाणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
अजित पवारांचा मलिकांना फोन
नवाब मलिकांबद्दल माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारताच अजित पवार म्हणाले, “तुम्हाला काय करायचं आहे? ते आमदार आहेत. स्वतःचा निर्णय घ्यायला ते खंबीर आहेत. सभागृहात कुणी कुठे बसायचं या संदर्भातील अधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे. मधल्या काळात काय काय घटना घडल्या, ते तुम्हाला माहितीये. आज ते आलेत. माझा त्याच्याशी फोन झाला. मी त्यांना नागपुरात स्वागत म्हणून कॉल केला होता.”
हेही वाचा >> Sukhdev Singh Gogamedi ची हत्या का? गँगस्टर रोहित गोदाराने केला खुलासा
जयंत पाटील मलिकांबद्दल काय बोलले?
शरद पवार गटाचे जयंत पाटील म्हणाले, “माझं बोलणं नाही झालं. मी कॉल करेन. आल्यानंतर सभागृहात भेटतील.” यावर माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलं की, ते (नवाब मलिक) अजित पवारांसोबत आहेत की, शरद पवारांसोबत? त्याला उत्तर देताना जयंत पाटील म्हणाले, “त्यांना तुम्ही का अडचणीत आणत आहात? ते ठरवतील. त्यांचा निर्णय ते घेतील.”
अजित पवार गटाच्या प्रतोदांनी केले स्वागत
नागपूर येथील विधिमंडळ परिसरात दाखल झाल्यानंतर नवाब मलिक यांचे अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांनी स्वागत केले. त्यानंतर मलिक हे अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांच्या कार्यालयात गेले. त्यामुळे मलिक अजित पवारांसोबत असल्याचेच म्हटले जात आहे.
हेही वाचा >> “फडणवीस सरकारने मराठा…”, संभाजीराजेंचं खासदारांना पत्र, लढा होणार तीव्र?
जामिनावर बाहेर आल्यानंतर नवाब मलिक यांना ते कुणासोबत आहेत, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी अजित पवार वा शरद पवार या दोघांपैकी कुणाचंही नाव घेतलं नव्हतं. पण, आपण खऱ्या राष्ट्रवादीसोबत असल्याचे सांगत त्यांनी भूमिकेबद्दलचा गोंधळ कायम ठेवला होता. मात्र, आता ते अजित पवारांसोबत असल्याचे दिसत आहे.
ADVERTISEMENT