शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर पक्षात मोठ्या घड्यामोडी सुरू झाल्या आहेत. पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या सिल्व्हर ओक वरील भेटीगाठी वाढल्या असून, शरद पवारांनी निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा वेळ मागितला आहे. दरम्यान, पक्षातील कार्यकर्त्यांकडून निर्णय मागे घेण्याचा आग्रह केला जात असून, पुण्यातील एका कार्यकर्त्याने पवारांना चक्क रक्तानेच पत्र लिहिलं आहे.
ADVERTISEMENT
पुण्यातील संदीप शशिकांत काळे यांनी हे पत्र लिहिलं आहे. संदिप काळे हे पुण्यातील साहेब प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत. काळे यांनी त्यांच्या भावना पत्रातून व्यक्त केल्या असून, रक्ताने लिहिलेल्या या पत्रात निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे.
शरद पवार यांना लिहिलेल्या पत्रात काय?
“माझे दैवत, माझे मार्गदर्शक आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आज प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आपण घेतलेल्या निर्णयाची बातमी बघून मी व्यथित होऊन अतिशय दुःख झालो. साहेब, मी आपल्या कार्याची माहिती पाहून मी आपल्या पक्षाचा कार्यकर्ता झालो. आपल्यासारख्या आभाळा एवढ्या नेत्याची उंची व कार्य पाहून आम्हाला प्रेरणा मिळते.”
हेही वाचा >> महाराष्ट्रात झाला, आता दुसरा राजकीय भूकंप कोणता?
“आम्ही पक्षात काम करतो व सर्वसामान्यांचे प्रश्न आम्ही आपले कार्य डोळ्यापुढे ठेवून सोडवतो. आपण माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचे दैवत आहात. व कायम राहणार. माझ्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांना आपण मोठं केलंत. घडवलंत. आम्ही कुणाकड पाहणार”, असं या पत्रात म्हटलेलं आहे.
हेही वाचा >> शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंचं शरद पवारांना भावनिक पत्र, म्हणाल्या…
“आम्हाला कोण घडवणार. साहेब, आम्हाला पोरकं करू नका. मी आपला निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि राहणार. मला साहेब तुमच्या नेतृत्वात काम करायचं आणि पक्ष कायम मोठा ठेवायचाय. साहेब, तुम्ही सांगाल धोरण आणि पक्षाचे प्रत्येक घरी तोरण. आदरणीय साहेब आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो. आपण आपला निर्णय मागे घ्या. आम्हाला पोरकं करू नका”, असं संदीप शशिकांत काळे या कार्यकर्त्याने पत्रात म्हटलं आहे.
पुण्यातील कार्यकर्त्यांचे पक्ष कार्यालयाबाहेर धरणे
शरद पवारांनी पदावरून निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर राज्यभरातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. पुण्यातही या निर्णयानंतर पडसाद उमटले आहेत. पुण्यातील कार्यकर्त्यांनी या निर्णयाला विरोध केला असून, पक्षाच्या कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर प्रवक्ते प्रदीप देशमुख, वरिष्ठ नेते रवींद्र मालवदकर, नीलेश निकम, काका चव्हाण, रुपाली पाटील-ठोंबरे, सदानंद शेट्टी, मृणालिनी पवार, अजिंक्य पालकर, विक्रम जाधव यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने पक्ष कार्यालयाबाहेर जमा झाले होते.
ADVERTISEMENT