2024 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांना वर्षभराचा वेळ असला तरी राजकीय पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. भाजपने पुढच्या लोकसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी स्ट्रॅटजीवर काम सुरू केलं आहे. भाजपच्या मंत्र्यांचा ‘लोकसभा प्रवास’ सुरू झाला. दुसरीकडे विरोधकांच्याही भेटीगाठी सुरू असून, विरोधकांची मोट बांधण्यासाठी पुन्हा एकदा वेग आला आहे. त्यानुषंगानेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मुंबई दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. नितीश कुमार गुरुवारी (11 मे) मुंबईत येणार असून, उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर, तर शरद पवार यांची सिल्व्हर ओक येथे भेट घेणार आहे. यात भेटीत आगामी निवडणुकीसंदर्भातील स्ट्रॅटजीवर चर्चा होणार असल्याचे समजते.
ADVERTISEMENT
बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल (यूनाइटेड) चे राष्ट्रीय नेते नितीश कुमार 11 मे रोजी मुंबईत येत आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची ते भेट घेतील, अशी माहिती जदयूचे राष्ट्रीय महासचिव आमदार कपिल पाटील यांनी दिली.
हेही वाचा >> Pradeep Kurulkar : हनीट्रॅपमध्ये अडकलेले कुरूळकर RSS च्या शाखेत जायचे का?
नितीश कुमार यांच्यासोबत बिहार विधान परिषदेचे सभापती देवेशचंद्र ठाकूर आणि बिहार सरकारमधील मंत्री संजय कुमार झा असणार आहेत. देवेशचंद्र ठाकूर यांनी नुकतीच मुंबईत आमदार कपिल पाटील यांच्यासह उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेतली होती.
विरोधकांची मोट बांधण्याची तयारी सुरू
विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी नितीश कुमार देशभर नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची नीतीश कुमार यांनी भेट घेतली. भाजपसमोर आव्हान उभं करायचं असेल, तर विरोधकांची एकजूट महत्त्वाची असल्याची चर्चा सातत्याने होत असून, त्यादृष्टीने नितीश कुमारांच्या या भेटींना महत्त्व प्राप्त झालं आहे.
आधी ‘मातोश्री’वर चर्चा, नंतर ‘सिल्व्हर ओक’वर शरद पवारांशी खलबतं
मुंबईत ‘मातोश्री’ निवासस्थानी नितीश कुमार शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी नितीश कुमारांना स्नेहभोजनाचं आमंत्रण दिलेलं आहे. ते नितीश कुमारांनी स्वीकारलं आहे. ‘मातोश्री’ भेटीनंतर नितीश कुमार ‘सिल्वर ओक’ वर शरद पवार यांची भेट घेऊन आगामी निवडणुकीसंदर्भात खलबतं करणार आहेत.
नितीश कुमारांची पंतप्रधानपदासाठी तयारी?
मुंबई विमानतळावर आमदार कपिल पाटील जनता दल (यूनाइटेड) च्या प्रमुख कार्यकर्त्यांसोबत नितीश कुमार यांचं स्वागत करतील. कलानगरच्या चौकात जदयूच्या कार्यकर्त्यांकडून नितीश कुमार यांचं स्वागत केलं जाणार आहे. विरोधकांकडून अद्याप पंतप्रधान पदाच्या उमेदवाराच्या नावाबाबत कोणतीही चर्चा होत नसली, तरी यात नितीश कुमारांचं नाव सातत्यानं चर्चेत राहत आहे. अशात कपिल पाटील यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.
हेही वाचा >> सुषमा अंधारेंच्या अश्रुंचा फुटला बांध! शरद पवारांकडे केली अजित पवारांची तक्रार
“बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांची स्वच्छ प्रतिमा, सुशासन आणि संयमी नेतृत्व ही त्यांची ओळख आहे. बिहारचा त्यांनी कायापालट केला. महिलांना सुरक्षित केलं. तरुणांना आशा दिली. आता देशाला नितीश कुमार यांचा इंतजार आहे. देश माँगे नितीश ही घोषणा देशभर घुमते आहे. नितीश कुमार यांचा मुंबई दौराही ऐतिहासिक ठरेल. देशाच्या राजकारणाला वेगळं वळण त्यातून मिळेल”, असं आमदार कपिल पाटील यांनी म्हटलं.
ADVERTISEMENT