Dhananjay Munde and Pankaja Munde : असं म्हणतात की, राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा मित्र नसतो आणि कुणीही कुणाचा कायमचा शत्रू नसतो. याची प्रचिती देणारी घटना बीडच्या राजकारणात घडली आहे. या घटनेला कारण ठरलंय अजित पवारांचं बंड! एकमेकांचे टोकाचे राजकीय विरोध बनलेले आमदार धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे कधी एकत्र येतील असं कुणालाही वाटतं नव्हतं. पण, हे खरं होताना दिसतं आहे. भाऊ धनंजय मुंडे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर बहीण पंकजा मुंडे यांनी चक्क त्यांची भेट घेतली. त्यांचं औक्षण केलं आणि बहीण भावाने पेढा भरवून एकमेकांचं तोंड केलं. (Pankaja Munde Meet Dhananjay Munde after he takes oath as cabinet minister)
ADVERTISEMENT
अजित पवारांचं बोट धरून धनंजय मुंडेंनी भाजप सोडली. त्यानंतर मुंडे कुटुंबातील वैर टोकाला गेलं. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. धनंजय मुंडेंनी परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडेंना पराभूत करत गुलाल उधळला आणि पंकजा मुंडेंना हा मोठा धक्का असल्याचंही म्हटलं गेलं. या निवडणुकीनंतर बहीण-भावातील वैर कायम राहिलं.
वाचा >> NCP चे अध्यक्ष शरद पवार की, अजित पवार? पक्षाची घटना, नियम काय सांगतात?
पण, गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात समेट घडत असल्याचे दिसून येत होतं. अलिकडेच बीड जिल्ह्यातील साखर कारखाना निवडणुकीत मुंडे बहीण-भाऊ एकत्र दिसले. त्यातच आता धनंजय मुंडे मंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडेंनी घेतलेली भेट आणि केलेले औक्षण बदलत्या राजकारणाची नांदी समजली जात आहे.
पंकजा मुंडेंच्या भेटीनंतर धनंजय मुंडेंनी औक्षण करतानाचा एक व्हिडीओ ट्विट केलाय. धनंजय मुंडेंनी म्हणतात, “राज्याच्या मंत्री पदी नियुक्तीनंतर माझ्या भगिनी तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे ताईनं माझं औक्षण केलं व शुभेच्छा दिल्या. भाजपची राष्ट्रीय सचिव म्हणून मीही ताईचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. आनंदाचा डोह असो किंवा दुःखाचा सागर, बहीण-भावाचे नाते कायमच अबाधित आहे”, अशा भावना धनंजय मुंडेंनी व्यक्त केल्यात.
वाचा >> अजित पवारांच्या बंडामुळे सुप्रिया सुळेंचं वाढलं टेन्शन, ‘हे’ असेल मोठं आव्हान
पंकजा मुंडे भाजप सोडणार?
भाजपमध्ये पंकजा मुंडे यांची घुसमट होत असल्याच्या आणि त्या पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा सातत्याने डोकं वर काढत असतात. के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएसने तर पंकजा मुंडेंना पक्षात येण्यासाठी मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली. या चर्चेची धूळ खाली बसत नाही, तोच आता पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे बोललं जाऊ लागलं आहे. त्याला कारण धनंजय मुंडे यांचंच दिलं जात होतं. धनंजय मुंडे भाजपसोबत आल्याने पंकजांची आणखी कोंडी होणार आणि त्या भाजप सोडू शकतात, असे तर्कविर्तक राजकीय वर्तुळात लावले जाताहेत. पण, त्यातच आता दोघांनी घेतलेली भेट नव्या राजकीय शक्यतांना निर्माण करताना दिसत आहे.
ADVERTISEMENT