Shiv Sena : जाहिरातीत देवेंद्र फडणवीसांचा फोटो का नाही? CM एकनाथ शिंदे म्हणाले…

मुंबई तक

13 Jun 2023 (अपडेटेड: 13 Jun 2023, 03:11 PM)

“राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे”, या शिवसेनेकडून देण्यात आलेल्या जाहिरातीवरून भाजप-शिवसेना युतीत नाराजीनाट्य सुरू झालं आहे.

mumbaitak

mumbaitak

follow google news

Political News of Maharashtra : “राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे”, या शिवसेनेकडून देण्यात आलेल्या जाहिरातीवरून भाजप-शिवसेना युतीत नाराजीनाट्य सुरू झालं आहे. शिवसेनेच्या वेगवेगळ्या मतदारसंघावर भाजपच्या नेत्यांकडून दावा केला जात असताना मंगळवारी प्रकाशित झालेल्या शिवसेनेच्या जाहिरातीने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या. या जाहिरातीमुळे भाजपमधून नाराजीचा सूर उमटला असून, देवेंद्र फडणवीस यांनी अचानक कोल्हापूर दौरा रद्द केल्यानं वेगवेगळे कयास लावले जात आहे. लोकप्रियतेत फडणवीसांना शिंदेंनी मात दिल्याच्या मुद्दा चर्चेत आला असून, याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भूमिका मांडली.

हे वाचलं का?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या जाहिरातीबद्दल विचारण्यात आलं. यावर शिंदे म्हणाले, “आमचं सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. हे डबल इंजिन सरकार आहे. केंद्र सरकारकडून देखील महाराष्ट्रातील विकास प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो. आर्थिक पाठबळ दिलं जातं म्हणूनच महाविकास आघाडी सरकारच्या काळात मेट्रोसारखे प्रकल्प, पायाभूत सुविधांचे प्रकल्प बंद होते. आम्ही तात्काळ सुरू केले.”

हेही वाचा >> बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका टळलेला नाही, पाहा Live Tracker मधून क्षणाक्षणांचे अपडेट

शिंदे पुढे म्हणाले, “मुंबईतच नाही, तर संपूर्ण राज्यभर वेगाने प्रकल्प सुरू आहेत. राज्यातील जनतेने आशीर्वाद दिले आहेत. प्रेम दिले आहेत. मला देखील काही टक्के दिले आहेत. देवेंद्र फडणवीस साहेबांना देखील पसंती दिली आहे. आम्ही दोघे या राज्याचे प्रमुख म्हणून नेतृत्व करतोय. या राज्याला पुढे नेतोय.”

हेही वाचा >> देवेंद्र फडणवीसांचं टेन्शन वाढवणाऱ्या ‘त्या’ सर्व्हेमध्ये नेमकं काय?

“या राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न मी आणि देवेंद्रजी आमच्या मंत्रिमंडळाला सोबत घेऊन करतोय. आम्ही घरात बसून काम करत नाहीये, तर प्रत्यक्ष फील्डवर करतोय. रस्त्यावर उतरतोय. शेतावर जातोय. मुंबईही बदलतेय. विकासाभिमूख होतेय. या राज्यातील जनतेने एका सर्व्हेमध्ये मला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना कामात पसंती दिली आहे. त्यांचा मी आभारी आहे. त्यांना धन्यवाद देतो. आणखी आमची जबाबदारी वाढली आहे. आणखी वेग कामाचा वाढेल. याचा फायदा सर्वसामान्य लोकांना होईल”, अशी भूमिका शिंदेंनी यावेळी मांडली.

उपमुख्यमंत्र्यांचा फोटो का नाही?

“हे लोकांनी मनापासून अभिनंदन केलेले आहे. फोटो असेल, नसेल. आम्ही दोघेही लोकांच्या मनामध्ये आहोत. ही शिवसेना-भाजप युती बाळासाहेबांच्या विचारावर झालेली युती आहे. ही वैचारिक युती आहे. ही स्वार्थासाठी झालेली नाही, ती महाराष्ट्रातील लोकांच्या मनाप्रमाणे झालेली आहे. ही युती लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढेल आणि जिंकेल”, असं उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं.

देवेंद्र फडणवीस नाराज?

दरम्यान, शिवसेनेच्या या जाहिरातीमुळे भाजपतून नाराजीचा सूर उमटला आहे. कोल्हापूरमध्ये शासन आपल्या दारी उपक्रम कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार होते. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी हा दौरा अचानक रद्द केला. त्यामुळे फडणवीस नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

    follow whatsapp