Raj Thackeray On Eknath shinde Toll free : मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी टोलवाढीविरोधात उपोषण सुरू केलं होतं. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भेट घेऊन उपोषण मागे घेण्यास सांगितलं. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदे राज ठाकरेंनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच घेरलं.
ADVERTISEMENT
“मुंबई प्रवेशाच्या पाचही नाक्यावरच्या टोलवाढी विरोधात माझा सहकारी अविनाश जाधव व माझे महाराष्ट्र सैनिक उपोषणाला बसले आहेत कळल्यावर मी अविनाशला कळवलं “उपोषण वगैरे करणं आपलं काम नाही… मी येतो उद्या ठाण्याला भेटायला. मी अविनाशला सांगितलंय की, अशा नादान राजकारण्यांसाठी जीव गमावू नको… एक माणूस दगावला तरी ह्यांना काहीच फरक पडणार नाही. आता मी अविनाशला उपोषण मागे घ्यायला सांगितलं आहे”, असं राज ठाकरे यांनी सुरुवातीला सांगितलं.
टोलच्या मुद्द्यावर राज ठाकरे म्हणाले,”गेली अनेक वर्ष टोलधाडीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनेक आंदोलनं केली. महाराष्ट्रामध्ये 65 टोल नाके महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे बंद झाले. त्यानंतरच्या निवडणुकीत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात त्यांनी जाहीर केलं होतं की आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करू… काय झालं त्या आश्वासनांचं ? त्यांना कुणीही जाब विचारत नाहीये… ना माध्यमं, ना जाणकार, ना जनता.”
जो पूल बांधला नाही, त्याचाही टोल; राज ठाकरेंनी व्यक्त केलं आश्चर्य
राज ठाकरे म्हणाले, “सरकारी भाषा इतकी क्लिष्ट, घाणेरडी असते जेव्हा माझ्यावर केसेस होत्या तेव्हा मला कळायचंच नाही की मला धरलं आहे की सोडलं आहे. एका प्रशासकीय अधिकाऱ्याकडून काल मी माहिती घेतली तर त्यांनी एक माहिती पत्रक पाठवलं त्यात म्हटलंय दुचाकी, रिक्षा, ट्रॉली ट्रॅक्टर यांना टोल नाही. त्यानंतर एकीकडे असं म्हणतात 10-12 प्रवासी असणाऱ्या चारचाकी सुमो ह्यांच्यासाठी अमुक-अमुक पथकर मग 4-5 सीटर कारसाठी वेगळं काय? म्हणजे काहीच सुस्पष्टता नाही. पुढे कळस म्हणजे जो पेडर रोडचा उड्डाणपुलाचाही टोलसाठी उल्लेख आहे, जो पूल अजून बांधलाच नाहीये”, असं म्हणत त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं.
हेही वाचा >> What is Hamas : माणसांच्या कत्तली… इस्रायलला संपवण्यासाठी जन्म; काय आहे हमास?
“म्हैसकर कुणाचे लाडके, शिंदेंनी याचिका मागे का घेतली?”
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, “मुंबई प्रवेशाचे पाचही टोलनाके म्हैसकर ह्यांच्याकडे आहेत… हे म्हैसकर कोणाचे लाडके आहेत? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांनीही टोल बंद करण्यासाठी एक याचिका दाखल केली होती… मला त्यांना विचारायचं आहे की ती याचिका कुणाच्या सांगण्यावरून मागे घेतलीत तुम्ही? मला आपल्या जनतेचंही आश्चर्य वाटतं… जे लोक खोटी आश्वासनं देतात, सत्तेत येऊन पुन्हा तुम्हालाच पिळतात त्यांनाच मतदान कसं करता? जर लोकांना टोल भरून आनंद मिळत असेल तर मग घ्या. खोटी आश्वासनं देणाऱ्या नेत्यांच्या विरोधात मतदान झालं तरच त्यांना त्यांची चूक समजेल”, अशी नाराजी राज ठाकरेंनी व्यक्त केली.
हेही वाचा >> Relationship: लग्न झालेल्या महिलांकडे पुरुष का होतात सर्वाधिक आकर्षित?, कारण…
राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटणार
“येत्या 2-4 दिवसांमध्ये मी मुख्यमंत्र्याची भेट घेईन. त्यांच्यासमोर सविस्तर विषय मांडेन. त्यानंतर वाढीव टोलबाबतीत काय भूमिका घ्यायची ती घेऊच. मुंबईत, ठाण्यात दरवर्षी फुटपाथ खोदून पेवर ब्लॉक लावले जातात. हे का केलं जातं? एकदा अधिकाऱ्यांनाही जाब विचारलं गेला पाहिजे”, असंही ते यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT