-दीपेश त्रिपाठी, मुंबई
ADVERTISEMENT
Raj Thackeary On Toll : महाराष्ट्रात पुन्हा एकदा टोलचा मुद्दा तापू लागला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्तेत असलेल्या आणि राहिलेल्या नेत्यांच्या टोलमुक्त महाराष्ट्राबद्दलचे व्हिडीओ दाखवत कोंडीत पकडलं आहे. राज ठाकरेंनी फडणवीसांच्याच एका व्हिडीओवरून संताप करत थेट टोल नाके जाळण्याचा इशारा दिला आहे.
राज ठाकरे यांची टोल वाढीसंदर्भात पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत नेमकं काय झालं, ते समजून घ्या.
राज ठाकरे सुरुवातीलाच म्हणाले की, “अविनाश जाधव आणि इतर सहकारी ठाण्यातील पाच टोल ठिकाणी टोलमध्ये वाढ करण्यात आल्याच्या विरोधात उपोषणाला बसले होते. टोलच्या माध्यमातून जाणारा पैसा कुठे जातो? आपल्याला घाणेरडे रस्तेच वापरावे लागतात. टोलच्या आंदोलनावेळी भाजप-शिवसेना युती होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी आघाडी होती. आता काय आहे, कुणालाच माहिती नाहीये. त्याचं काय झालं मातेरं ते. त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काय म्हणाली, शिवसेना-भाजप काय म्हणाली होती, हे मी तुम्हाला दाखवतो.”
राज ठाकरेंनी ठाकरे-फडणवीसांना दाखवला आरसा…
राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्धव ठाकरे, गोपीनाथ मुंडे यांची टोलमुक्तीबद्दल असलेल्या भूमिकेचे व्हिडीओ दाखवले.
1) यात देवेंद्र फडणवीस या व्हिडीओत म्हणताहेत, “महाराष्ट्रात रस्त्यांचं नाही, खड्ड्यांचं राज्य आहे. इतके पैसे आपण कऱ्च करतो. ते केवळ भ्रष्टाचारात वाहून जातात. सरकारला रस फक्त टोलमध्ये, टोलच्या रस्त्यांमध्ये आहे. टोलचा झोल असा आहे की, ठेकेदारच त्याचा आराखडा तयार करतो, टेंडर तयार करतो, भरतो आणि वर्षानुवर्षे सामन्य माणूस टोल भरतो. टोलचा झोल संपवावाच लागेल. अन्यायकारक टोल हा बंद करावाच लागेल. ज्याठिकाणी लोकांना सोयी नाहीत. त्या देण्यासाठी महाराष्ट्रात परिवर्तन करावंच लागेल.”
अजित पवार, उद्धव ठाकरेंचा दाखवला व्हिडीओ
2) दुसऱ्या व्हिडीओत अजित पवार म्हणताहेत की, “राज्यातील ४४ टोल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर एसटीला टोल द्यावा लागणार नाही, असा निर्णय घेतला आहे.” तिसऱ्या व्हिडीओत उद्धव ठाकरे म्हणताहेत की, “महाराष्ट्र टोलमुक्त करणार.”
हेही वाचा >> “फडणवीसांची हरकाम्या करून ‘लायकी’ काढली हे…”; ठाकरे गटाचा वर्मावर ‘बाण’
3) एक व्हिडीओ गोपीनाथ मुंडे यांच्या पत्रकार परिषदेचा आहे. यात ते म्हणताहेत की, “टोलमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आझाद मैदानावर मोर्चा काढणार आहोत. तुम्ही जर केला नाही, तर आमचं सरकार आल्यावर आम्ही टोलमुक्त महाराष्ट्र करू. टोलच्या उत्पन्नाबद्दल एक तज्ज्ञ समिती नेमून त्याला पर्याय शोधू, पण महाराष्ट्र टोलमुक्त करू.” यालाच जोडून एका व्हिडीओत उद्धव ठाकरे म्हणताहेत की, “गोपीनाथजींनी सांगितलं आहे की आमचं सरकार आल्यावर महाराष्ट्र टोलमुक्त करू.”
टोलचे पैसे राजकारण्यांना मिळतात
“हे सगळे टोलमुक्त महाराष्ट्र करू म्हणालेत. या सगळ्यांची सरकारं येऊन गेली आहेत. पण, यापैकी एकही गोष्ट घडलेली नाही. राजकारणातील अनेक लोकांच्या उदरनिर्वाहाचं ते एक साधन आहे. त्यांच्याकडे दरदिवसाला, आठवड्याला आणि प्रत्येक महिन्याला या टोलमधून पैसे जात असतात. त्यामुळे हे लोक ते बंद करायला तयार नाहीत. त्यामुळे तुम्हाला चांगले रस्ते मिळणार नाही. याच लोकांचा फायदा होणार आहे.”
“मला फक्त लोकांचा प्रश्न पडला आहे की, हे सगळे येऊन थापा मारतात. थापा मारूनही पुन्हा त्याच पक्षांना मतदान होतं, ते कसंकाय होतं? हेच माझ्यासाठी अनाकलनीय आहे. मी टोलसंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेईन असं सांगितलं. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस काय बोलले ते ऐका”, असं म्हणत राज ठाकरेंनी फडणवीसांचा व्हिडीओ दाखवला.
हेही वाचा >> शिंदेंना माझा सवाल, ती याचिका कुणाच्या सांगण्यावरून मागे घेतली -राज ठाकरे
त्या व्हिडीओत देवेंद्र फडणवीस म्हणताहेत, “असं आहे की, जी घोषणा आम्ही तेव्हा केली होती. त्यानुसार राज्यातील सर्व टोलवर जे फोर व्हिलर किंवा मोठ्या गाड्यांना मुक्ती दिलेली आहे. केवळ कमर्शियल मोठ्या गाड्यांकडूनच महाराष्ट्रात टोल घेतो. त्याचे पैसे राज्य सरकारने दिलेले आहेत,” या व्हिडीओनंतर राज ठाकरे म्हणाले, “हे खरंय का? म्हणजे याला धादांत खोटं असंच म्हणायचं ना? मग हे पैसे जाताहेत कुठे?”
आम्हाला विरोध केला, तर टोलनाके जाळून टाकू…
“खऱ्या अर्थाने आपण बघितलं तर टोल हा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा स्कॅम आहे. मला वाटतं की याची शाहनिशा झाली पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. त्यांच्याकडून काय उत्तर येते ते बघू, अन्यथा उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे फोर व्हिलर, टू व्हिलर, थ्री व्हिलरला टोल नाहीये, तर आमची माणसं प्रत्येक टोलनाक्यावर उभी राहतील. फोर व्हिलर, थ्री व्हिलर आणि टू व्हिलरला कोणताही टोल लावू दिला जाणार नाही. याला विरोध करायचा प्रयत्न केला, तर हे टोलनाके आम्ही जाळून टाकू. पुढे काय सरकारला करायचं, ते सरकारने करावं. जर सरकार म्हणतंय की, फोर व्हिलर, थ्री व्हिलर, टू व्हिलरसाठी टोल नाहीये, तर टोलवाले लुटताहेत. त्याचं उत्तर द्यावं लागेल. मी मुख्यमंत्र्यांना भेटणार. त्यानंतर मी माध्यमांशी बोलेन”, असे राज ठाकरे म्हणाले.
ADVERTISEMENT