-मिथिलेश गुप्ता
ADVERTISEMENT
राज्यात राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत असून, सहाव्या जागेवरून बरंच खलबतं सुरू आहेत. छत्रपती संभाजीराजे यांना पाठिंबा देण्यास शिवसेनेनं नकार दिल्यानंतर मनसेने पाठिंबा जाहीर केलाय. याचसंदर्भात आज मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी छत्रपती संभाजीराजेंची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माहिती दिली.
संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढे आली आहे. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी संभाजीराजे यांची भेट घेतली आणि मनसेचा पाठिंबा जाहीर केला. दोन दिवसांपूर्वीही मनसे आमदार राजू पाटील यांनी एक ट्विट केलं होतं.
काय म्हणाले आमदार राजू पाटील?
“छत्रपती संभाजीराजेंनी सर्वांना मेल आणि फोन केला होता. मलाही १५ तारखेला मेल आला. फोनही आला होता. त्यानंतर १६ तारखेला मी राज ठाकरेंना भेटायला गेलो,” असं राजू पाटील म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले,”त्यांना (राज ठाकरे) विषयाची कल्पना दिली. त्यांना सर्व गोष्टी सांगितल्या. त्या वेळी राज ठाकरे म्हणाले की, ‘होय, आपण त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. मी महाराजांना भेटलो आणि राज ठाकरे काय म्हणाले ते सांगितलं. मला हे उघड करायचं नव्हतं कारण माझी काही पक्षांना अॅलर्जी आहे.”
“मी छत्रपती संभाजीराजेंना भेटून सांगितलं की, राज ठाकरेंचा आणि माझा पाठिंबा आहे आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. जेव्हा पाठिंब्याची गरज असेल, तेव्हा आम्हाला सांगा आम्ही तिथे सहीसाठी येऊ. आम्ही त्यांना पाठिंबा व्यक्त केला आहे. खरं सांगायचं तर भाग्याची गोष्ट आहे. मला पहिल्यांदाच या घराण्याला मतदान करण्याची संधी मिळणार आहे.”
“इतके दिवस जे चाललय आहे. पक्षात आलात तर तिकीट देऊ, महाराजांवर अटीशर्ती कशासाठी? महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी सर्व पक्षांनी महाराजांना पुढे केलं पाहिजे. माझी नम्र विनंती आहे की महाराष्ट्रातून एखादा चेहरा राज्यसभेवर गेला पाहिजे,” असं राजू पाटील म्हणाले.
राजू पाटलांनी काय ट्विट केलं होतं?
मनसेचे आमदार राजू पाटील यांनी यापूर्वी एक ट्विट केलं होतं. त्यात ते म्हणाले होते, ‘राज्यातील गडकिल्ले संवर्धन व मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या छत्रपतींना पक्षात येण्याची अट कशासाठी? प्रत्येक गोष्टीत राजकारणच केलेच पाहिजे का?,’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.
त्याचबरोबर ‘सर्वच पक्षांनी छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेवर बिनविरोध पाठविण्याचे पुण्य आपल्या पदरात पाडून घ्यावे,” असं देखील राजू पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले होते.
ADVERTISEMENT