Maharashtra Politics News : बच्चू कडूंनी झगडून शिंदे-फडणवीस सरकारला दिव्यांग मंत्रालय स्थापन करायला लावलं. इतकंच नाही तर आपल्यालाच पहिला मंत्री बनवावं, अशी इच्छाही बोलून दाखवली. पण शेवटच्या क्षणी बच्चू कडूंचा गेम झाला. आता चर्चा सुरू झालीय, बच्चू कडूंचं झालं, तेच अमरावतीच्या रवी राणांचं होणार का की कडूंना मिळालं नाही, ते राणांना मिळणार?
ADVERTISEMENT
सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल दिला. त्यानंतर राज्यात चर्चा सुरू झाली ती मंत्रिमंडळ विस्ताराची. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात नंबर लागावा म्हणून इच्छूकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली.
बच्चू कडूंचा मंत्रिमंडळ विस्तारातून पत्ता कट
विस्ताराच्या तोंडावर सरकारी पातळीवरही घडामोडींना वेग आलाय. पण कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेण्याच्या तयारीत असलेल्या बच्चू कडूंचा ऐनवेळी गेम झाला. बच्चू कडूंना मंत्रिपदाऐवजी सध्याच्या घडीला कॅबिनेट मंत्रिपदाच्या दर्जावरच समाधान मानावं लागतंय. त्यामुळे कडूंना दुधाची तहान ताकावर भागवावी लागतेय, अशीही चर्चा होतेय.
हेही वाचा >> MNS: राज ठाकरेचं भाजपसोबतचं लव्ह-हेट रिलेशन, आतापर्यंत किती वेळा बदलली भूमिका?
दिव्यांग कल्याण विभागाचं अध्यक्षपद देऊन एकनाथ शिंदेंनी कडूंना मंत्रिपदाचा दर्जा दिलाय. त्यामुळेच आता बच्चू कडूंची नव्या कोटमध्ये कॅबिनेटमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता मावळलीय, असं म्हटलं जातंय. त्यासोबतच अमरावतीचा पालकमंत्री होण्याचाही विषय संपलाय.
अमरावतीच्या रवी राणांचं काय होणार?
दुसरीकडे अमरावतीच्या आखाड्यात कडूंची कट्टर विरोधक म्हणून रवी राणांचं काय होणार याबद्दलही चर्चा सुरू झालीय. अपक्ष कडूंचं झालं, तेच अपक्ष रवी राणांचंही होणार की राणांचं प्रमोशन होणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.
मातब्बर इच्छुकांची संख्या जास्त झाल्यानं शिंदेंनी कॅबिनेट दर्जाचा मध्यममार्ग काढल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळेच अपक्ष बच्चू कडू राज्यमंत्रीपदाचा त्याग करून शिंदेंसोबत गुवाहाटीला गेले. तरीही त्यांना कॅबिनेट दर्जावरच समाधान मानावं लागलंय.
हेही वाचा >> Jayant Patil, IL&FS scam : नऊ तास चौकशी, पण ईडीने पाटलांना कोणते प्रश्न विचारले?
याच न्यायानं कोणतंही मंत्रीपद नसलेल्या अपक्ष रवी राणांनाही मंत्रिपद मिळण्याची शक्यता धूसर झालीय. तसंच राणांविरोधात अमरावतीतल्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये असंतोष असल्याचंही समोर आलं होतं. कडूंचाही राणांना विरोध आहे. याउलट मंत्रिपदाची लॉटरी लागली, तर राणांसाठी ही मोठी उपलब्धी असेल.
अमरावती जिल्ह्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारी गोष्ट म्हणून याकडे बघितलं जाऊ शकतं. पण सध्याच्या घडीला बच्चू कडूंच्या निमित्तानं जो ट्रेंड समोर आलाय, त्यानुसार, रवी राणांनाही यंदाच्या विस्तारात संधी मिळण्याची शक्यता धुसर होताना दिसत आहे.
ADVERTISEMENT