Rohit Pawar Protest : जामखेड मतदारसंघात एमआयडीसी करण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली होती. या मागणीकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी रोहित पवारांनी सोमवारी (24 जुलै) विधान भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या पायऱ्यावर आंदोलन केले. याचे विधानसभेत पडसाद उमटले. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कान टोचले. (Deputy chief minister ajit pawar recite to rohit pawar)
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांनी रोहित पवार हे विधान भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या पायऱ्यांवर आंदोलन करत असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिली. विधानसभेत बोलताना आमदार देशमुख म्हणाले, “रोहित पवार बाहेर पावसात त्यांच्या जामखेड मतदारसंघात पाटेगाव खंडाळा येथे एमआयडीसीची मागणी केली होती. मागच्या अधिवेशनात लक्षवेधीच्या माध्यमातून त्यांनी ही मागणी केली होती. त्या मागणीला उत्तर देताना उदय सामंत म्हणाले होते की, अधिवेशन संपायच्या आत त्याबद्दल आदेश काढू. आता दुसरं अधिवेशन आलं, तरी त्याचे आदेश निघालेले नाहीत. त्यासाठी ते उपोषण करताहेत आणि शासनाने याची दखल घ्यावी, ही विनंती.’
रोहित पवारांच्या आंदोलनावर नार्वेकर काय म्हणाले?
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, “आपल्या सभागृहात यापूर्वीही ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडच्या पायऱ्यांकडे उपोषण किंवा आंदोलन केलं, तेव्हा एकमताने या सभागृहाचा निर्णय झालेला की, त्याचं पावित्र्य राखणं गरजेचं आहे. त्यामुळे त्याठिकाणी कुणीही आंदोलन अथवा उपोषणाला बसणं अयोग्य आहे. त्यांनी तिकडे बसू नये, असं आवाहन आम्ही रोहित पवारांना केलं आहे. माझी ही विनंती असेल की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर सदस्यांनी त्यांची समजून घालावी, त्याचबरोबर शासनानेही त्यांची समजून घालावी. त्यांनी सभागृहात येऊन आपलं म्हणणं मांडावं.
वाचा >> पुण्यात खळबळ! आधी पत्नी-पुतण्याला घातल्या गोळ्या, नंतर केली आत्महत्या
अजित पवारांनी टोचले कान
आंदोलनाच्या मुद्द्यावर अजित पवार म्हणाले, “अनिल देशमुखांनी विधीमंडळ सदस्याच्या बाबतीत उपस्थित केला होता. त्याच्या पत्राची एक प्रत माझ्याकडेही आहे. उदय सामंतांनी 1 जुलै 2023 रोजी रोहित पवारांना दिलेल्या पत्रात पावसाळी अधिवेशनात बैठक घेऊन उचित निर्णय घेण्यात येईल. उपोषणाला बसण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा. आता मंत्र्यांनी पत्र दिलं. अजून अधिवेशन संपलेले नाहीये. एकच आठवडा झालेला आहे. लोकप्रतिनिधींनीपण निवेदन दिल्यानंतर त्या एमआयडीसीचे चेअरमन आणि राज्याच्या उद्योगमंत्र्यांनी पत्र दिल्यानंतर त्याची गंभीरतेने नोंद घ्यायला पाहिजे. अशा पद्धतीने बसणं उचित नाही’, असं म्हणत अजित पवारांनी त्यांचे कान टोचले.
उदय सामंतांचं आश्वासन, रोहित पवारांचं आंदोलन मागे
“एमआयडीसी संदर्भातील निर्णयासाठी बैठक बोलावण्यात येईल, असं आश्वासन दिलं होतं. अधिसूचना काढण्यासाठी उद्योग विभाग सकारात्मक असून, तातडीने निर्णय घेईल. रोहित पवारांचं आंदोलन त्यांच्या मतदारसंघासाठी होतं. जेव्हा लोकप्रतिनिधी अशा पद्धतीने आंदोलन करतात तेव्हा सरकारने त्याची नोंद घ्यायची असते. त्यामुळे मी त्यांना जाऊन भेटलो. विनंती केली. त्यांनी माझ्या विनंतीला मान दिला”, असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं.
वाचा >> Irshalwadi Landslide : अश्रु आटले, डोळे थिजले… शेवटचं बघायची इच्छा राहिली अपूर्णच
“आंदोलन सुरू केल्यानंतर अनेक आमदार मला येऊन भेटले. त्यानंतर उदय सामंत यांनी माझी भेट घेतली. उद्या बैठक बोलवणार आणि पुढच्या काही दिवसांत एमआयडीसीची अंतिम प्रक्रिया पूर्ण होणार असा शब्द त्यांनी दिला आहे. त्यामुळे मी हे आंदोलन मागे घेत आहे. पण, हे जर झालं नाही, तर माझ्या मतदारसंघातील हजारो युवा मुंबईत येऊन आमरण उपोषण सुरू करतील”, असा इशारा रोहित पवार यांनी दिला.
ADVERTISEMENT