India Alliance Seat Sharing for Lok Sabha : लोकसभा निवडणुकीसाठी एकवटलेल्या इंडिया आघाडीसमोर जागावाटपाचं सूत्र ठरवताना कसं लागणार आहे. विशेषतः महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं जागा वाटप कसं होणार, याची उत्सुकता आहे. उद्धव ठाकरेंकडून 23 जागांची मागणी केली जाणार असल्याचे म्हटलं जात आहे. पण, काँग्रेसच्या नेत्याने केलेल्या विधानाने ठाकरेंना जागावाटपात तडजोड करावी लागेल असंच दिसत आहे. काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी मुंबई Tak शी संवाद साधला. यावेळी ते काय म्हणाले, हे समजून घ्या.
ADVERTISEMENT
‘हैं तैयार हम’ असं काँग्रेस आता म्हणत आहेत. मग तुम्ही तडजोडी करण्यासाठी तयार आहात का? छोट्या पक्षांसोबत तडजोड करावी लागेल. तुमच्या जागा सोडाव्या लागतील. अनेक ठिकाणी तुम्हाला छोट्या भावाची भूमिका घ्यावी लागेल. मोठ्या भावाची भूमिका घेऊन इंडिया आघाडी चालवता येणार नाही. या सगळ्या तडजोडींसाठी काँग्रेस तयार आहे का? असा प्रश्न निरुपम यांना विचारण्यात आला.
‘मविआ’चं जागावाटप, संजय निरुपम काय बोलले?
या प्रश्नावर उत्तर देताना काँग्रेसचे नेते संजय निरुपम म्हणाले, “छोटा भाऊ-मोठा भाऊ असा विषय नाहीये. इंडिया आघाडी मजबूतीने निवडणुकीच्या मैदानात उतरावी. सर्व पक्षाचे प्रमुख नेते भेटत आहेत. चर्चा करत आहेत. ज्या जागेवर एखादा पक्ष निवडून येऊ शकतो. एखादा उमेदवार निवडून येऊ शकतो, अशा जागांबद्दल वाद करायला नको. सोबतचा पक्ष जिंकला तर इंडिया मजबूत होईल, मी जिंकलो तरच इंडिया मजबूत होईल, हा विचार चुकीचा आहे.
महाराष्ट्रात अडचण आहे, कारण चार पक्ष दिसत आहे. प्रकाश आंबेडकरही इंडियात येणार आहे. सर्वांना आपला वाटा हवा आहे. कोणीही वाटा सोडायला तयार नाही. शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 23 जागांची यादी तयारी केलीये. मग ही तडजोड कशी करणार?, या प्रश्नालाही निरुपम यांनी उत्तर दिले.
हेही वाचा >> बच्चू कडू एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीसांना धक्का देणार?
संजय निरुपम म्हणाले, “23 जागा शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मागितली असेल, तर साहजिकच आहे. त्यांना ते मागण्याचा अधिकार आहे. पण, 23 जागा मिळतील का, हा खूप मोठा प्रश्न आहे. 23 जागा घेऊन काय करणार? त्यांचे सारे नेते सोडून गेले आहेत. त्यांच्याकडे (उद्धव ठाकरे) उमेदवारच कुठे आहेत? महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचा मतदार किती आहे, हे आता कुणालाही माहिती नाही.”
हेही वाचा >> “हिंमत उरली नाही का?”; अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर पहिला वार
“शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत किती मतदार आहेत महाराष्ट्रात कुणालाही माहिती नाही. काँग्रेसचा किती मतदार आहे, हे पूर्ण देशाला माहिती आहे. आमच्याकडे नेता, कार्यकर्ता आणि मतदारही आहे. तुमच्याकडे अडचणी आहेत, त्यामुळे या. एकमेकांच्या उणीवा पूर्ण करून एकमेकांना सोबत घेऊन मजबूतीने उतरू आणि भाजपला रोखू. भाजपला रोखायचे आहे, तर आपसात लढून चालणार नाही. निश्चितच काँग्रेसलाच नाही, तर सर्वच पक्षांना तडजोडी कराव्या लागतील”, असा सल्ला निरुपम यांनी दिला.
ADVERTISEMENT