Maharashta politics : Sanjay Raut Vs Ajit Pawar : महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचं चाललंय काय? असा प्रश्न शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानामुळे उपस्थित होऊ लागला आहे. आधीच जागावाटपावरून मविआती तिन्ही पक्षात रस्सीखेच सुरू असल्याच्या वृत्तांनंतर संजय राऊतांनी महाविकास आघाडीत राहण्याबद्दल असं भाष्य केलं की, सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या. संजय राऊतांचं हे विधान म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेस या मित्रपक्षांना अप्रत्यक्षपणे इशारा असल्याचंही बोललं जात आहे.
ADVERTISEMENT
शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राज्यव्यापी शिबीर पार पडलं. या शिबिरात खासदार संजय राऊतांनी शिवसैनिकांमध्ये ऊर्जा भरण्यासाठी जोरदार भाषण केलं. पण, भाषण करताना संजय राऊतांनी भावी मुख्यमंत्री पदाच्या जाहिरातीवर भाष्य करताना महाविकास आघाडी राहण्याबद्दल एक विधान केलं.
संजय राऊत काय म्हणाले?
“सध्या महाराष्ट्रामध्ये भावी मुख्यमंत्र्यांचं फार पिक आलेय उद्धवजी. पहावं तिकडे भावी मुख्यमंत्री… आपण महाविकास आघाडीमध्ये आहोत. राहू… जोपर्यंत आपली इच्छा आहे, तोपर्यंत! हे काही आमच्या इच्छेवर नाहीये. हे राजकारण आहे. पण, आपण पाहतोय की, भावी मुख्यमंत्री… भावी मुख्यमंत्री. अरे बाबानों, अजूनही विद्यमान मुख्यमंत्री समोर बसलेले आहेत”, असं संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा >> “…म्हणून उद्धव ठाकरेंचे दुकान बंद पाडलं”, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
एकीकडे महाराष्ट्रात अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडीप्रमाणेच देशभरात विरोधी बाकावरील पक्षाची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा ही एकजूट होणे कसे गरजेचे आहे, याबद्दल शिबिरात सांगितले. पण, संजय राऊतांना नेमकं म्हणायचं काय? याचे वेगवेगळे अर्थ आता लावले जाऊ लागले आहेत.
अजित पवारांनी संजय राऊतांच्या विधानावर काय म्हटलंय?
“हो, त्यांचा अधिकार आहे. प्रत्येकाचा तो अधिकार आहे. प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा पूर्ण अधिकार आहे. आजच्या घडीला आम्ही तिघे एकत्र आल्याशिवाय आम्ही भाजप-शिंदे गटाचा मुकाबला करू शकत नाही म्हणून आम्ही एकत्र आलोय. त्याच्याकरिता त्यांनी पुढे कायमचं एकत्र राहू…”, असं अजित पवार यावर म्हणाले.
हेही वाचा >> मोदी, शाह, फडणवीस; उद्धव ठाकरेंनी भाजपविरोधात फुंकले रणशिंग, शिवसैनिकांना काय दिला मेसेज?
अजित पवार इतक्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी संजय राऊतांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार असताना केलेल्या विधानावरही बोट ठेवलं. ते म्हणाले, “संजय राऊतांचं मी मागे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तेच म्हणायचे की, आमची आघाडी 25 वर्ष टिकणार आहे. त्यावेळी त्यांना ती 25 वर्षे टिकावी असं वाटत असेल. आता त्यांना पुढे एकट्याचं सरकार याव असं वाटत असेल, त्यात चुकीचं काय आहे? प्रत्येक पक्ष ध्येय डोळ्यासमोर ठेवून पक्ष वाटचाल करत असतो. त्यांनी त्यांची इच्छा बोलून दाखवली, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत.”
जागावाटपाचा तिढा
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षानी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. तशी तयारी सुरू केली असून, तिन्ही पक्षातील स्थानिक कार्यकर्त्यांचे मनोमिलन घडवून आणण्यासाठी वज्रमूठ सभेतूनही प्रयत्न केले जात आहेत. पण, दुसरीकडे लोकसभेच्या जागावाटपावरून तिन्ही पक्षात रस्सीखेचही सुरू आहे. एकीकडे शिवसेनेने 19 जागा लढवण्याची इच्छा व्यक्त केलीये, तर दुसरीकडे काँग्रेसने 28 जागांवर दावा सांगण्याबद्दल चर्चा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही जिथे ज्या पक्षाचा चांगला उमेदवार त्याला जागा सोडावी अशी भूमिका मांडली आहे. त्यामुळे हा तिढा तिन्ही पक्ष कसा सोडवणार, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.
ADVERTISEMENT