महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यापासून महाराष्ट्रात ठाकरे विरुद्ध शिंदे हा संघर्ष बघायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदार, खासदारांना ठाकरे गट वेगवेगळ्या मुद्द्यांवरून लक्ष्य करताना दिसत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंवर हल्ला चढवला आहे. “बाळासाहेबांनी या कृत्याबद्दल शिंदेंची शिवसेनेतून हकालपट्टीच केली असती”, असं राऊत म्हणालेत. राऊतांनी शिंदेंबद्दल विधान का केलंय, तेच बघूयात…
ADVERTISEMENT
खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केलं. ट्विटमधून राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली. या टीकेमागचं कारण आहे शिंदेंचा कर्नाटक दौरा! कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. प्रचार जोरात सुरू आहे. अशात भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदेंही कर्नाटकात पोहोचले. शिंदे दोन दिवसांच्या दौऱ्यात भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ रोड शो आणि सभा घेणार आहेत.
संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर काय टीका केली?
खासदार राऊत यांनी एक ट्विट केलं आहे. ट्विटमध्ये राऊत म्हणतात, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटकात भारतीय जनता पक्षाच्या प्रचारास गेले आहेत. शिवसेना आमचीच… बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार आम्हीच, असा डांगोरा ते रोज पिटत आहेत. आता काय?”, असा सवाल करत राऊतांनी शिंदेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
“कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई म्हणतात महाराष्ट्र एकीकरण समितीचे लोकं उचापती आहेत, त्यांना आम्ही धडा शिकवू… आणि शिंदे त्याच बोम्मईंच्या पखाली वाहत आहेत. शिंदे व त्यांची टोळी सीमा भागात फिरकली नाही. उलट एकीकरण समितीच्या विरोधातील भाजपा उमेदवारांना खोके पाठवून मराठी माणसांच्या पाठीत खंजीर खुपसला”, असं टीकास्त्र राऊतांनी डागलं.
हेही वाचा >> शरद पवारांच्या राजीनाम्यासाठी काहीजण देव पाण्यात घालून बसले होते -जयंत पाटील
संजय राऊत पुढे म्हणतात की, “सीमा भागातील एकीकरण समितीचे उमेदवार पराभूत व्हावेत म्हणून शिंदे यांनी जोर लावला आहे. नकली शिवसेना! ढोंगी हिंदूत्व! हे तर महाराष्ट्राचे वैरी. बाळासाहेबांनी या कृत्याबद्दल शिंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टीच केली असती. एकशे पाच हुतात्म्यांशी ही बेइमानी आहे. महाराष्ट्र ही गद्दारी लक्षात ठेवील! जय महाराष्ट्र”, असं म्हणत राऊतांनी शिंदेंवर घणाघात केला.
असा आहे एकनाथ शिंदेंचा कर्नाटक दौरा…
एकनाथ शिंदे आज कर्नाटकात दाखल झाले असून, आज (7 मे) ते भाजप उमेदवारासाठी काढण्यात येणाऱ्या प्रचार रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. असा आहे दौरा…
रविवार, 7 मे 2023
सकाळी 9.00 वाजता मुंबईकडून बंगळुरूकडे खाजगी विमानाने प्रस्थान
सकाळी 10.30 वाजता बंगळुरू एचएएल विमानतळावर आगमन
दुपारी 1.00 ते 4.00 वाजता
महाराष्ट्र मंडळ गांधीनगर येथे जाऊन कर्नाटकातील मराठी लोकांशी संवाद आणि भेटीगाठी
संध्याकाळी 5.30 वाजता
बंगळुरू विमानतळावर आगमन त्यानंतर मंगळुरू कडे प्रस्थान
हेही वाचा >> राज ठाकरेंचं अजित पवारांकडे बोट; पवारांच्या राजीनाम्यावर मोठं विधान
संध्याकाळी 6.30 वाजता
गोल्डफींच हॉटेल मंगळुरू येथे आगमन आणि राखीव
सोमवार, 8 मे 2023
सकाळी 9.00 वाजता
मंगळुरू येथून हेलिकॉप्टरने धर्मस्थळ येथे रवाना होणार
सकाळी 9.40 ते 10.40वाजता
श्री मंजुनाथ स्वामी मंदिराला भेट देऊन पूजा आणि दर्शन करणार तसेच धर्मस्थळ संस्थानचे धर्माधिकारी श्री वीरेंद्र हेगडे यांची भेट घेणार
दुपारी 11.00 वाजता
धर्मस्थळ येथून हेलिकॉप्टरने उडुपीकडे प्रस्थान
दुपारी 12 ते 12.30 वाजता
श्रीकृष्ण मंदिर उडुपी येथे पूजा आणि दर्शन घेणार
दुपारी 3.00 ते 4.00 वाजता
उडपी जिल्ह्यातील कापू विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी काढण्यात येणाऱ्या रोड शो मध्ये सहभागी होणार
दुपारी 4.00 ते 5.00 वाजता
उडपी विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी काढण्यात येणाऱ्या रोड शो मध्ये सहभागी होणार
संध्याकाळी 5.00 वाजता
प्रचार संपवून उडपीहुन हेलिकॉप्टरने मंगळुरूला परतणार
रात्री 9.00 वाजता
मंगळुरू विमानतळाकडे प्रस्थान करून मुंबईकडे रवाना होणार
रात्री 10 वाजता
मुंबईत आगमन आणि राखीव
ADVERTISEMENT