उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची कायदेशीर लढाई एका निर्णयाक वळणावर येवून ठेपली आहे. शिवसेनेतील या दुहीमुळे महाराष्ट्रात सत्ता संघर्ष निर्माण झाला आणि आता तो सुप्रीम कोर्टात आहे. ठाकरे विरुद्ध शिंदे यांच्यातील राजकीय संघर्षावरील सुनावणी पूर्ण झाली असून, आता सगळ्यांना प्रतिक्षा आहे ती निर्णय काय येणार, याची! सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. हा निकाल लवकरच येईल, अशी चर्चा सुरू असून, आता संजय राऊत यांनी या प्रकरणाबद्दल मोठं विधान केलं आहे.
ADVERTISEMENT
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांची मुंबईत पत्रकार परिषद झाली. यावेळी सुप्रीम कोर्टात प्रलंबित असलेल्या प्रकरणाबद्दल त्यांनी विधान केलं. राऊत यांनी म्हटलं की, “आम्ही न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहतोय. आम्हाला अजूनही असं वाटतं की या देशात संविधान आहे. या देशात कायदा आहे. या देशात राजकीय स्वैराचार रोखण्याची ताकद सर्वोच्च न्यायालयामध्ये आहे, असं आम्हाला आजही वाटतंय. त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल याबद्दल आम्ही आशावादी आहोत.”
राहुल नार्वेकरांच्या विधानावर संजय राऊत काय म्हणाले?
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर असं म्हणालेले की, ‘आमदारांच्या अपात्रतेबद्दलचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांशिवाय कुणालाही नाही.’ यावर राऊतांनी राहुल नार्वेकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली. कायदेपंडित आहेत की फक्त पंडित आहेत, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
राऊत म्हणाले, “तुम्ही आधी राजीनामा द्या. ज्यांनी हा अपात्रतेचा निर्णय दिला आहे, त्यांना निर्णय घेऊ द्या. हा निर्णय नरहरी झिरवळ यांनी विधानसभेचे अध्यक्ष म्हणून घेतलेला आहे. त्यांच्यामुळे पात्र अपात्र ठरवण्याचा अधिकार, हा तेव्हाच्या अध्यक्षांना आहे. हे त्यांना मान्य आहे का? ते स्वतः कायदेपंडित आहे. बरोबर आहे ना की फक्त पंडित आहेत, ते बघावं लागेल. नरहरी झिरवळ यांनी त्यांच्या खुर्चीवर बसून घेतलेला निर्णय दुसरा अध्यक्ष आल्यावर फिरवू शकत नाही”, असं भाष्य संजय राऊत यांनी केलं.
बजरंगबली यांच्या डोक्यात पराभवाची गदा मारणार – संजय राऊत
कर्नाटकातील निवडणुकीबद्दल राऊत म्हणाले, “कर्नाटक हे दक्षिणेतील महत्त्वाचं राज्य आहे. दक्षिणेतील एकमेव राज्य जे भाजपकडे आहे. ते राहणार नाही. पंतप्रधान मोदी, देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ देशभरातील राज्याराज्यांतील भाजपचे मुख्यमंत्री आणि नेते यांनी नेहमीप्रमाणे कर्नाटका ठाण मांडलं. पैशांचा महापूर उसळला. यंत्रणा वापरली. अगदी बजरंगबलीला निवडणुकीत उतरवलं. हनुमान चालीसा वगैरे. पण तुम्हाला सांगतो यांना कोणताही देव पावणार नाही. आणि बजरंगबलीच्या यांच्या डोक्यात पराभवाची गदा मारणार आहे. 13 तारखेला काय होतं बघा तुम्ही?”
एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र
“आम्हाला दुःख फक्त याच गोष्टीचं आहे की, कर्नाटकातील निकाल जो लागायचा तो लागेल. शिवसेनेची भूमिका सीमाप्रश्नाविषयी तीव्र आहे. गेल्या 65 वर्षांपासून आम्ही लढा देत आहोत. आतापर्यंत शिवसेना म्हणून घेणारे कुणीही की, आम्ही शिवसैनिक आहोत. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे नेतोय, असं सांगणारा कुणीही मायचा लाल हा बेळगावसह सीमाभागात जाऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पराभवासाठी प्रयत्न करत नव्हता. यावेळी प्रथमच झालं. गेल्या 7 वर्षात देवेंद्र फडणवीस आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रथमच सीमाभागात मराठी बांधवांचा, एकीकरण समितीचा पराभव व्हावा म्हणून शर्थ केली. ताकद लावली. सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या टोळीने कोट्यवधी रुपये बेळगावात पाठवले आहेत. एकीकरण समितीचा पराभव करण्यासाठी, हे पाप आहे”, असं राऊत म्हणाले.
“याचे काही लोक मंगलोरला उतरले आणि तिथून पैसे पाठवले, बेळगावात. या राज्यात आणि देशात असं कधी घडलं नाही. कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये पैशाचा प्रचंड वापर होतोय. पण, सीमाभागात इतक्या मोठ्याप्रमाणात पैशाचा वापर झाला. हा महाराष्ट्रातील खोके संस्कृती तिकडे नेण्याचा प्रयत्न झाला. त्याचा आम्ही निषेध करतो”, असा आरोप राऊतांनी केला.
ADVERTISEMENT