Sanjay Raut wrote letter to UN : महाराष्ट्राच्या राजकारणात सतत चर्चेच्या केंद्रस्थानी राहणारे खासदार संजय राऊत आता संयुक्त राष्ट्रे संघापर्यंत पोहोचले आहेत. यामागचं कारण म्हणजे जून 2022 मध्ये शिवसेनेत झालेले बंड! एकनाथ शिंदे आणि 40 बंडखोर आमदारांना लक्ष्य करत संजय राऊतांनी संयुक्त राष्ट्रे संघाला 20 जून हा गद्दार दिवस म्हणून घोषित करण्याची मागणी केलीये.
ADVERTISEMENT
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी युएन अर्थात संयुक्त राष्ट्रे संघाचे महासचिव एंटोनियो गुटेरस यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात संजय राऊतांनी जसा 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणू साजरा होतो, तसाच 20 जून हा जागतिक गद्दार दिवस म्हणून पाळण्यात यावा आणि तशी घोषणा करावी अशी मागणी केली आहे.
हेही वाचा >> Lok Sabha Election : मोदी-शाहांचा आता यांच्यावर ‘डोळा’! काय आहे स्ट्रॅटजी?
संजय राऊत यांनी त्यांच्या पत्रात शिवसेनेत झालेल्या बंडखोरीच्या घटनाक्रमावर प्रकाश टाकला आहे. आपण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रतिनिधीत्व करतो आणि संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचा सदस्य असल्याचा उल्लेख राऊतांनी पत्रात केला आहे.
संजय राऊतांनी पत्रात काय म्हटलंय?
उद्धव ठाकरे नोव्हेंबर 2019 ते जून 2022 या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते मुख्यमंत्री असतानाच भारतीय जनता पक्षाकडून चौकशा सुरू असल्याने शिवसेनेतील 40 आमदाराच्या गटाने पक्ष सोडला. त्या प्रत्येकांनी पक्षांतरासाठी 50 कोटी रुपये घेतले, असंही राऊतांनी पत्रात म्हटलं आहे.
पुढे राऊतांनी म्हटलं आहे की, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपने त्यांचा वापर केला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 40 आमदारांनी आम्हाला धोका दिला. 10 अपक्ष आमदार महाविकास आघाडी सरकार सोडून गेले.
हेही वाचा >> शिंदे-ठाकरेंची मोर्चेबांधणी, पण हर्षवर्धन जाधवांमुळे होणार ‘करेक्ट कार्यक्रम’?
पक्ष सोडून जाण्याची घटना 20 जून रोजी सुरू झाली, जेव्हा एकनाथ शिंदे मुंबईवरून गुजरातला गेले. उद्धव ठाकरे आजारी असताना त्यांनी हे केलं. त्यांच्या आजाराचा त्यांनी गैरफायदा घेतला.
त्यामुळे 20 जून हा आंतरराष्ट्रीय गद्दार दिवस घोषित करावा, जसा 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. जगाला गद्दार लक्षात राहवेत म्हणून हे करायलाच हवं, असंही राऊतांनी त्यांच्या पत्रात म्हटलेले आहे.
’50 खोके’चा उल्लेख
संजय राऊत यांनी युएनला लिहिलेल्या पत्रात 40 आमदारांनी 50 खोके घेतल्याचा दावा केला आहे. त्याचबरोबर भाजपकडून त्यांची चौकशी केली जात असल्याने त्यांनी पक्षांतर केल्याचंही राऊतांनी युएनच्या पत्रात म्हटलं आहे.
ADVERTISEMENT