मुंबई: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असणाऱ्या वाल्मिक कराड याच्यावरून सध्या विरोधक रान उठवत आहेत. अशातच आज (20 डिसेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात बोलताना थेट वाल्मिक कराडचं नाव घेत मास्टर माईंडवर कारवाई केली जाईल असं विधान केलं. याचवेळी विरोधकांनी आता थेट धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अशावेळी मागील दोन दिवसांपासून सभागृह आणि माध्यमांसमोर न आलेले धनंजय मुंडे हे मात्र आज मीडियासमोर आले.
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट सभागृहातच धनंजय मुंडें यांच्यावर हल्लाबोल केला. फडणवीसांसारखे मुख्यमंत्री असताना या प्रकरणाची निष्पक्ष कारवाईची त्यांनी मागणी केली. त्याचवेळी त्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचीही मागणी केली.
हे ही वाचा>> CM Devendra Fadnavis : "दादागिरी खपवून घेतली जणार नाही...", 'त्या' प्रकरणावरून भर सभागृहात फडणवीस संतापले
दरम्यान, आता या सगळ्या आरोपांना धनंजय मुंडेंनी स्वत: आज उत्तर दिलं आहे. पाहा धनंजय मुंडे नेमंक काय म्हणाले.
संतोष देशमुखांची हत्या केली त्यांना फाशी झाली पाहिजे - धनंजय मुंडे
'मी सुरुवातीपासून म्हणतोय की, हे व्यवहारातून झालेलं भांडण आहे. ज्यामधून संतोष देशमुखांची निर्घृण हत्या झाली आहे. अशाप्रकारे हत्या झाली आहे की, ज्याचं कोणीच समर्थन करू शकत नाही. त्यामुळे जवळजवळ सर्वच आरोपी हे अटक झाले आहेत. जेवढी तीव्र भावना ही आमची सर्वांचीच होती. त्यात आरोपी अटक झाले आहेत, एसआयटी नेमली आहे. आता यामध्ये शेवटपर्यंत तपास होईल.'
'आदल्या जो गुन्हेगार आहे तो आणि त्याचा भाऊ आणि एक पोलीस अधिकारी यांचा चहा पितानाचा व्हीडिओ समोर आला आहे. या सगळ्या गोष्टीचा तपास आता तपास यंत्रणेने काढणं गरजेचं आहे.'
हे ही वाचा>> CM Devendra Fadnavis : "संतोष देशमुख हत्या प्रकरणात मास्टरमाईंडच्या मुसक्या आवळणार..", सरकारने घेतले 'हे' मोठे निर्णय
'यामध्ये मकोका लावण्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी जे काही बोलले.. आणि याच प्रकरणात मकोका लावायचा की, आणखी अशी प्रकरणं बीड जिल्ह्यात आहेत. त्याही ठिकाणी मकोका लागला पाहिजे. या भूमिकेचा मी आहे. आता जे काही मुख्यमंत्र्यांनी निवेदन या ठिकाणी केलंए. त्यामुळे स्वाभाविक सर्वांचं समाधान झालं आहे.'
'माझ्या नावाशी संबंध जोडणं आणि आरोप करणं.. या सदनात असे प्रकार अनेकदा घडले आहेत. शेवटी पोलीस याचा तपास करणार आहेतच. आता केसही सीआयडीकडे देण्यात आली आहे. त्यामुळे मी म्हटलं ना.. दूध का दूध आणि पानी का पानी होणार आहे.'
'विरोधी पक्ष नेत्याने काय बोलावं हे मला सांगता येत नाही. पण त्यांनी हे जरी सांगितलं असतं की, वाल्मिक कराड नागपुरात कुठे आहे तर तेही पोलिसांनी काम केलं असतं. त्यांना अटक केली असती.'
'या घटनेमध्ये ज्या कोणी आरोपीने संतोष देशमुखांची हत्या केली त्यांना फाशी झाली पाहिजे ही माझी स्पष्ट भूमिका आहे.' असं धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT
