Sharad Pawar Ajit Pawar Supriya Sule : अनंतराव पवार यांच्या नावावरुन असलेल्या शाळेच्या उद्घाटनाचा सोहळा रविवारी (22 ऑक्टोबर) पार पडला. या कार्यक्रमाला पवार कुटुंबीय उपस्थित होतं. शरद पवार आणि अजित पवार यावेळी एकत्र आलेले पाहायला मिळाले. शरद पवार अजित पवार एकत्र असले, तरी अजित पवारांनी शरद पवारांशी बोलणं टाळलं. पवारांच्या भाषणानंतर अजित पवार कार्यक्रमातून लगेच निघून गेले. पण, याच शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्या संवादाचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होतोय. ज्यामध्ये शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील हसत एकमेकांशी गप्पा मारताना दिसत आहेत. या व्हिडीओवरुन नव्या राजकीय समीकरणाचे अंदाज बांधण्यास सुरुवात झाली आहे. ‘कालचे हे चित्र नक्कीच अनेकांची झोप उडवणार आहे… असं महाविकास आघाडी ऑफिशयल या ट्विटर हँडलवर देखील म्हटलं आहे. (Sharad Pawar Met Harshwardhan Patil)
ADVERTISEMENT
एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होतोय. या व्हिडीओमध्ये शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील हसताना दिसत आहेत. या व्हिडीओवरुन आता अनेक अर्थ लावले जात आहेत. पवार कुटुंबाच्या कार्यक्रमाला हर्षवर्धन पाटील यांना देखील आमंत्रित करण्यात आले होते.
अजित पवार-हर्षवर्धन पाटील संघर्ष
राष्ट्रवादी विशेषतः अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांचा जुना वाद आहे. २०१९ च्या निवडणुकीला आघाडी नाही झाली, तरी चालेल पण इंदापूरची जागा राष्ट्रवादी सोडणार नाही, असं अजित पवार म्हणाले होते. नंतर इंदापूरची जागा मीच लढवणार असं हर्षवर्धन पाटील म्हणाले होते. पुढे झालं असं की निवडणुकीच्या आधी हर्षवर्धन पाटील हे भाजपात गेले होते. राष्ट्रवादीमुळे काँग्रेस सोडली असा आरोप त्यांनी त्यावेळी केला होता. त्यामुळे अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांचा वाद सर्वश्रुत आहे.
इंदापुरात नेतृत्व उभे करण्याचा पवारांचा प्रयत्न
आता अजित पवारांनी राष्ट्रवादीमध्ये बंड करत आपली वेगळी चूल मांडली आहे. तर इंदापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रेय भरणे हे अजित पवारांसोबत गेले आहेत. त्यामुळे इंदापूरमध्ये तयार झालेली पोकळी शरद पवारांना भरुन काढायची आहे. त्यातच इंदापूर विधानसभा मतदारसंघ हा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये येतो. आघाडीच्या काळात हर्षवर्धन पाटलांचा सुप्रिया सुळे यांना नेहमीच फायदा होत आला आहे.
हे ही वाचा >> “अख्खे कुटुंब याच वावरात पुरेन”, भाजप आमदार सुरेश धसांच्या पत्नीसह तिघांविरुद्ध गुन्हा
आता दत्ता भरणे हे अजितदादांसोबत गेल्याने सुप्रिया सुळे यांना याचा फटका बसू शकतो. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये हर्षवर्धन पाटील यांचा सुळे यांना फायदा होऊ शकतो. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे अजितदादा आणि हर्षवर्धन यांचं विळा भोपळ्याचं नातं आहे, त्यामुळे अजित पवारांच्या विरोधात हर्षवर्धन पाटलांचा पवारांच्या राष्ट्रवादीला फायदा होऊ शकतो.
सुप्रिया सुळेंना हवी हर्षवर्धन पाटलांची मदत?
इंदापूरमध्ये भाजपचं मोठं मतदान आहे. गेल्या निवडणुकीमध्ये दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभ्या होत्या. कांचन कुल यांनी सुळेंच्या विरोधात चांगली मतं घेतली होती. त्यामुळे दौंड इंदापूर तालुक्यात सुप्रिया सुळेंना लीड मिळवण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांची मदत घ्यावी लागणार आहे.
हे ही वाचा >> Maratha Reservation : ‘ती’ जाहिरात शिंदे सरकारच्या अंगलट, 24 तासांत डॅमेज कंट्रोल?
आता हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये आहेत. कारवाईच्या भीतीने ते भाजपमध्ये गेल्याची टीका त्यांच्यावर केली गेली. भाजपमध्ये गेल्यापासून चांगली झोप लागते असं वक्तव्य केल्याचा पाटलांचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. असं असलं तरी राष्ट्रवादीमुळे त्यातही अजित पवारांमुळे राष्ट्रवादीमुळे काँग्रेस सोडल्याचं पाटील म्हणाले होते. त्यामुळे अजित पवारांनी बंड केल्याने पाटील पवारांना मदत करतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण असं झालं तर अजित पवारांचं टेन्शन वाढणार हे निश्चित.
ADVERTISEMENT