Sharad Pawar NCP: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिलेल्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर पक्षात बराच गदारोळ सुरू आहे. अशातच आता नव्या अध्यक्षाच्या निवडीसाठी शरद पवार यांनी जी समिती नेमली होती त्यांनी पवारांचा राजीनामा फेटाळून त्यांनीच अध्यक्षपदी कायम राहावं असा प्रस्ताव पारित केला आहे. या सगळ्या घडामोडीतून शरद पवार हेच पक्षाचे बिग बॉस असल्याचं पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. पण याशिवाय शरद पवार यांनी पक्षातील आणि पक्षाच्या बाहेरील त्यांच्या विरोधकांना त्यांची नेमकी काय ताकद आहे हे दाखवत आपला खुंटाही बळकट केला आहे. (sharad pawar is the big boss in ncp know the exact meaning of his resignation move)
ADVERTISEMENT
शरद पवार यांना जनतेची नाडी अचूक कळते. त्यामुळे कोणत्या वेळी कोणता निर्णय घ्यायचा हे शरद पवार यांना अगदी बरोबर समजतं. याच ‘टायमिंग’च्या जोरावर शरद पवारांनी आपलं राजकारण केलं आहे. असं असताना आता त्यांनी राजीनाम्याचं जे टायमिंग साधलं आहे. त्यातून अनेकांना योग्य तो ‘मेसेज’ दिला आहे.
शरद पवारांनी राजीनाम्याची घोषणा करून नेमकं काय-काय मिळवलं?
1. राष्ट्रवादीत आपणच बॉस : शरद पवार हे आता 83 वर्षांचे असले तरीही पक्षावर आपण म्हणजेच राष्ट्रवादी आहोत हे त्यांनी त्यांच्या तीन दिवसांपूर्वीच्या कृतीतून दाखवून दिलं आहे. जरी पक्षात आमदारांची चलबिचल चाललेली असली तरी पक्षाचा कार्यकर्ता हा आपल्या मागेच आहे आणि त्यामुळेच राजीनामास्त्र पुढे सरकवत आपणच पक्षात बॉस आहोत हे शरद पवार यांनी दाखवून दिलं आहे.
यासोबतच पवारांनी हे देखील दाखवून दिलं आहे की, जरी त्यांचं वय झालं असलं तरीही आजही पक्षावर त्यांचीच पकड आहे आणि ती किती मजबूत आहे हे सुद्धा शरद पवारांनी पक्षातील सर्व नेत्यांना अगदी योग्यरित्या दाखवलं.
2. महत्त्वाकांक्षी नेत्यांना घातली वेसण: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संपूर्ण राजकारण हे कसं फक्त आपल्याभोवतीचं फिरतं हे शरद पवारांनी पक्षातील नेत्यांना दाखवून दिलं. आपल्याशिवाय राष्ट्रवादी पक्ष कार्यकर्ते स्वीकारणार नाहीत हे पवारांनी दाखवून देत पक्षातील महत्त्वाकांक्षी लोकांना देखील एक प्रकारे वेसण घातली आहे.
हे ही वाचा >> “शरद पवारांनी अजित पवारांना मामा बनवलं”, निखील वागळेंचं स्फोटक विश्लेषण
सध्याच्या राजकीय परिस्थिती राष्ट्रवादीमध्ये दुफळी असल्याचं समोर आलं होतं. असं असताना पक्षाला एकसंध ठेवण्यासाठी शरद पवार यांनी एक मोठी खेळी खेळली ती देखील अचूक टायमिंग साधत. ज्यामध्ये ते बऱ्याच अंशी यशस्वीही झाल्याचं दिसून येत आहे.
3. संभाव्य बंडखोरांना स्पष्ट संदेश: जनमानसाच्या काय भावना आहेत हे शरद पवारांना अगदी बरोबर कळतं असं नेहमी म्हटलं जातं. त्यामुळेच त्याचा भावनेवर आरूढ होत अगदी प्रॅक्टिकल राजकारण करत शरद पवार यांनी राष्ट्रवादीतील संभाव्य बंडखोरांना योग्य तो मेसेज या निमित्ताने दिला आहे.
शिवसेनेत नुकतीच बंडखोरी होऊन त्यांचा पक्ष फुटला.. हीच गोष्ट लक्षात घेऊन पवारांनी राष्ट्रवादीत असं काहीही होऊ नये यासाठी वेळीच पावलं उचलली आणि टायमिंग साधत आपला राजीनामा पुढे केला. यामधून पक्षासह संपूर्ण राज्यात पवारांबाबत एक सहानुभूतीची लाट तयार झाली. ज्या लाटेविरोधात आपल्याला आता जाता येणार नाही हेच पवारांनी संभाव्य बंडखोरांनाही कळून चुकलं.
हे ही वाचा >> NCP: ‘सिल्व्हर ओक’वर राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर शरद पवारांचं पुन्हा मोठं विधान, म्हणाले…
4. राजकारणाचं केंद्रबिंदू पवारच: राज्यात किंवा देशाच्या राजकारणात शरद पवार हे नेहमीच केंद्रस्थानी असतात. ते का हे त्यांनी आपल्या राजीनाम्याच्या निर्णयावरुन दाखवून दिलं आहे. कारण शरद पवारांनी राजीनामा दिल्यानंतर त्याची दखल ही थेट राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. अनेक राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांनी पवारांनी आपला राजीनामा मागे घ्यावा अशी गळ घातली. ज्यामुळे देशाच्या पातळीवर देखील पवारांनी आपलं महत्त्वं अधोरेखित केलं आहे. तसंच महाविका आघाडीत देखील पवारांचं महत्त्व यानिमित्ताने सिद्ध झालं.
या सगळ्या गोष्टींचा विचार करता शरद पवार यांनी एका दगडात अनेक पक्षी मारल्याचं आता अनेक राजकीय जाणकार सांगत आहेत.
ADVERTISEMENT