सिल्व्हर ओक आणि यशवंतराव चव्हाण सेंटर या मुंबईतील दोन्ही ठिकाणी वेगाने घडामोडी घडत आहेत. शरद पवारांनी पक्षाध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भूकंप आला असून, सध्या शरद पवारांनी निर्णय मागे घ्यावा, यासाठी नेत्यांकडून मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, यशवंतराव चव्हाण सेंटर येथे नेमकं काय सुरू आहे, याबद्दल पक्षाच्या नेत्यानेच माहिती दिली.
ADVERTISEMENT
मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये नेत्यांची लगबग वाढली आहे. शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय मागे घ्यावा, यासाठी मंगळवार (2 एप्रिल) दुपारपासून मनधरणीचे प्रयत्न पक्षातील काही नेत्यांकडून केले जात आहे.
यशवंतराव चव्हाण सेंटरला काय घडतंय?
यशवंतराव चव्हाण सेंटरला राष्ट्रवादीची बैठक सुरू असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिलं होतं. मात्र, याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी माहिती दिली.
भुजबळ म्हणाले, “आज कुठलीही नेत्यांची बैठक किंवा समितीची बैठक किंवा साहेबांनी जाहीर केलेल्या नावांची बैठक आज बोलावण्यात आलेली नाही. आमचे काही सहकारी, काही बाजार समितीच्या कामासंदर्भात, साखर कारखान्यासंदर्भात किंवा इतर तातडीच्या कामासंदर्भात मुंबईच्या बाहेर आहेत.”
हेही वाचा >> राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का, जितेंद्र आव्हाडांनीही दिला राजीनामा!
“आम्ही मुंबईत आहोत आणि काही राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख हे शरद पवारांनी त्यांचा निर्णय थांबवावा, मागे घ्यावा या विनंतीसाठी आलेले आहेत. ते सगळे साहेबांना भेटत आहेत. काही जिल्ह्यातील, काही राज्यातील नेते आलेले आहेत. केरळातून नेते आलेले आहेत. दिल्लीतून काही नेते आलेले आहेत. भेटत आहेत”, अशी माहिती छगन भुजबळ यांनी यावेळी दिली.
हेही वाचा >> ‘चोमडेगिरी vs चाटुगिरी’, नाना पटोलेंचा सुटला संयम, संजय राऊतही भिडले
“एक दोन दिवसात अशी बैठक होईल आणि तोपर्यंत साहेबांचं मन वळण्याचा प्रयत्न झाल्यानंतर पुढचं काय पाऊल उचलायचं आहे. ते पुढे सर्व नेते मंडळी ठरवतील. जयंत पाटील मुंबईत नाहीये. सगळे नेते त्या बैठकीला हजर राहतील. जयंत पाटील संध्याकाळी मुंबईत येणार आहेत. त्यांना आमंत्रित केलेलं नाही, असं काही नाही”, असं सांगत छगन भुजबळ यांनी जयंत पाटील यांच्याबद्दलचे वृत्त फेटाळून लावलं.
छगन भुजबळांचा खुलासा
राष्ट्रवादीचे नेते भुजबळ यांनी “राष्ट्रवादीच्या कामाची विभागणी आधीच झाली आहे. राज्यात अजित पवार, तर केंद्रात सुप्रिया सुळे यांचे काम आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे या अध्यक्ष व्हायला अडचण नाही,” असं विधान केलं होतं. मात्र, त्यावर भुजबळांनी खुलासा केला. “सकाळी मी जे काही बोललो ते माझं मत आहे. आता मी जे काही बोललो हे मी माझ्या पक्षातर्फे बोललो आहे”, असं ते म्हणाले.
ADVERTISEMENT