NCP Ajit Pawar Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका मोठ्या गटाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बंड केले आणि पक्षाची दोन शकलं उडाली. इतकंच नाही तर अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा ठोकला आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात दंड थोपटले. (sharad pawar explained what differences between shiv sena and bjp hindutva )
ADVERTISEMENT
भाजपसोबत जाण्यासाठी पक्षातील आमदार, खासदारांसह पदाधिकाऱ्यांचा आग्रह आहे, असं अजित पवार गटाकडून सांगितलं जात आहे. उजव्या आणि हिंदुत्ववादी भाजपसोबत जाण्याबद्दलचा मुद्दा उपस्थित होताच अजित पवारांनी शिवसेनेसोबत केलेल्या युतीकडे बोट दाखवलं.
वाचा >> ‘खोटं बोललो तर पवाराची अवलाद सांगणार नाही..’, अजित पवारांनी काय दिलं चॅलेंज?
शिवसेना हिंदुत्ववादी आणि जातीयवादी नाही का? मग आम्ही त्यांच्यासोबत गेलोय तर भाजपसोबत न जाण्याचा प्रश्न येत नाही, अशा आशयचं विधान अजित पवारांनी केलं. त्याला पटेलही दुजोरा देताना दिसत आहेत. प्रफुल्ल पटेलही असं म्हणाले आम्ही शिवसेनेसोबत सत्तेत जाऊ शकतो तर भाजपसोबत जाऊच शकतो.
अजित पवारांकडून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून पवारांची कोंडी
राष्ट्रवादी काँग्रेस हा वेगळ्या विचारधारेचा पक्ष आहे आणि भाजपची विचारधारा हिंदुत्ववादी आहे, असा प्रश्न बंड केल्यापासून सातत्याने अजित पवार यांना केला जातोय. याच मुद्द्यावरून ते काका शरद पवार यांची कोंडी करण्याचा प्रयन्त करत आहेत. शिवसेनेसोबत का आघाडी केली असं म्हणून ते शरद पवारांना घेरण्याचा प्रयन्त करताना दिसत आहेत.
शरद पवारांनी सोडलं मौन, सांगितला हिंदुत्वातील फरक
5 जुलै रोजी मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. यावेळी पवारांनी या मुद्द्यावर उत्तर दिले. इतकंच नाही तर भाजपसोबत न जाण्याचं कारणही सांगितलं.
शरद पवार म्हणाले, “शिवसेना आणि भाजपमध्ये मी फरक करतो. आणीबाणीच्या काळात संपूर्ण देशात स्व. इंदिरा गांधींच्या विरोधात वातावरण होते. त्यावेळी स्व. बाळासाहेब ठाकरेंनी वक्तव्य केले की देशाच्या एकीसाठी इंदिरा गांधींना या संकटात पाठिंबा दिला पाहिजे.”
वाचा >> भाजपने महाराष्ट्रात केला ‘करेक्ट कार्यक्रम’, एकाच दगडात मारले दोन पक्षी
“सहकार्याची भूमिका घेताना विधानसभेला राज्यात एकही उमेदवार शिवसेनेने उभा न करता काँग्रेसला पाठिंबा दिला. आणीबाणीच्या काळात अजून कटुता वाढू नये यासाठी त्यांनी हा निकाल घेतला होता. त्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये फरक आहे”, असं भाष्य पवारांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलताना केलं.
दोन्ही पक्षाच्या हिंदुत्वातील फरक सांगताना पवार असंही म्हणाले की, “शिवसेनेचे हिंदुत्व हे अठरा पगड जातीच्या लोकांना घेऊन जाणारे आहे आणि भाजपचे हिंदुत्व हे विभाजनवादी, विषारी, मनुवादी आणि विघातक आहे. माणसामाणसात अंतर वाढवणारे हिंदुत्व भाजपकडून केले जाते. जो समाजाच्या ऐक्याला तडा देतो तो राष्ट्रप्रेमी असू शकत नाही. त्यामुळे जो राष्ट्रप्रेमी नाही त्याच्यासोबत जाण्याची भूमिका आम्ही घेणार नाही.”
ADVERTISEMENT