मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडाच्या बातम्या फेटाळून लावल्या आणि मागील काही दिवासांपासून सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम देण्यात प्रयत्न केला. मात्र यानंतर आता महाराष्ट्रात अजित पवार विरुद्ध शिवसेना (UBT) नेते संजय राऊत असा वाद रंगताना दिसत आहे. संजय राऊत यांनी सामनाच्या रोकठोक या सदरामध्ये काही लिखाण केलं, त्यात त्यांनी अजित पवार यांची भूमिका मांडली, असा आरोप त्यांच्यावर होऊ लागला अन् यावरुनच अजित पवार यांनी राऊत यांच्यावर थेट टीका केली. यानंतर वाद सुरु झाला.
ADVERTISEMENT
दरम्यान या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मुंबई तकला विशेष मुलाखत दिली. यात त्यांनी अजित पवार यांनी केलेल्या टीकांवर प्रत्युत्तर दिलं आहे. तसंच महाविकास आघाडी म्हणून आपण भूमिका मांडल्याचं स्पष्ट केलं.
संजय राऊत मुंबई तकशी बोलताना नेमकं काय म्हणाले?
आपण एकत्र आहोत.. महाविकास आघाडी मजबूत रहावी हीच आमची इच्छा :
अजित पवार हे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत, प्रमुख स्तंभ आहेत. आमच्यासारखे काही लोक महाविकास आघाडीचे चौकीदार आहोत. आमच्या महाविकास आघाडीला हात लावायचा नाही. शिवसेना फोडली तेव्हा महाविकास आघाडीला धक्का बसला होता. तेव्हा हे बरोबर नाही, अशाप्रकारे केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन कोणी पक्ष फोडणं ही हुकुमशाही आहे, हा दहशतवाद आहे, अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली. काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी घेतली. स्वतः अजित पवार यांनी भूमिका घेतली. ते आमच्या पाठीशी ठाम उभे होते. ते काय आमचे प्रवक्ते आहेत का? राष्ट्रवादीवर तेच संकट येत आहे हे दिसतं होतं. स्वतः शरद पवार यांनी हे जाहिर भाषणात सांगितलं आहे, देशाच्या गृहमंत्र्यांना त्यांनी पत्र लिहिलं, भेट घेतली.
मी अजित पवार यांना आधीच सांगितलं होतं.. खुलासा करा :
अजित पवार यांच्याविषयी या वावड्या उठतं आहेत, याबाबत माझ्या रोकठोक सदरात लिहण्यापूर्वी अशा बातम्या, वावड्या होत्या. म्हणून मी लिहिलं. त्याबाबत त्यांनी खुलासा केला पाहिजे हे मी त्यांना सांगितलं. नागपूरमध्येही मी त्यांना भाषण करण्याचा सल्ला दिला. विमानातही आमची चर्चा झाली. जे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी काल केलं हे आधीच करा म्हणून सल्ला होता.
पवार कुटुंबीय एकसंध :
अजित पवार कुठेच जाणार नाहीत, हे आधी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. नाना पटोले म्हणाले. मला विचारलं मी पण तेच सांगितलं, अजित पवार कुठेही जाणार नाहीत. ते आमच्या आघाडीचे प्रमुख स्तंभ आहेत, यात मी कुठे त्यांची भूमिका मांडली? पवार कुटुंबीय एकसंध आहे.
राहिला प्रश्न शरद पवार आणि माझ्यातील संभाषण उघडं केलं याबद्दलचा. तर त्यावर शरद पवार यांनीही हरकत घेतली नाही किंवा ते नाकारलं नाही. माझं अजित पवार यांच्याशी काही भांडणं नाही. आम्ही एकत्र आहोत. उलट शरद पवार यांनी व्यापक भूमिका मांडली म्हणून कौतुक करायला हवं.
माझी टीका फक्त भाजपवर :
मी राष्ट्रवादीत ढवळाढवळ करत नाही. माझी टीका थेट केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार, भाजपची विरोधी पक्षाविषयीची भूमिका, त्यांचं दबावतंत्र यावर आहे. मी अजित पवार यांची भूमिका मांडलेली नाही. मी आजही लिहलं आहे की, काहीच नसताना अजित पवार यांना बदनाम करता? माझ्या माहितीनुसार भाजपचा दबाव आहे वगैरे सांगण्यासाठी काही आमदार शरद पवार यांना भेटले होते. त्यांनी काहींची नाव सांगितलेली नाहीत.
नेमका काय होता वाद :
संजय राऊतांनी 16 एप्रिलला रविवारी रोखठोक सदरात महाराष्ट्रात फोडाफोडीचा सीझन टू सुरू असल्याचा दावा केला. आतापर्यंत दबक्या आवाज सुरू असलेल्या या चर्चांना राऊतांनी शरद पवारांचा हवाला दिला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली.
यावर अजित पवार यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, तुम्ही ज्या पक्षाचे प्रवक्ते आहात, त्या पक्षाचं सांगा ना काय सांगायचं ते. तुम्ही ज्या पक्षाचं मुख्यपत्र आहे, त्याबद्दल बोला. पण, तुम्ही आम्हाला कोट करून… ते असं झालं, तसं झालं… आम्ही आमची स्पष्टपणे भूमिका मांडायला खंबीर आहोत”.
तसंच आमच्याबद्दल बातम्या पेरण्याचं काम काही विघ्नसंतोषी लोक करत असतील. मी माझ्या पक्षाबद्दल म्हणत नाही. माझ्या पक्षात माझ्याबद्दल आकस असणारं कुणी नाही. परंतु पक्षाबाहेरचे आणि काही काही तर बाहेरच्या पक्षाचे प्रवक्ते ते आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते झाल्यासारखंच चाललंय. त्यांना कुणी अधिकार दिलाय कुणास ठावूक? पक्षाची बैठक ज्यावेळी होईल, त्यावेळी मी विचारणार आहे”, असं म्हणत अजित पवार यांनी खासदार संजय राऊत यांच्याबद्दल संताप व्यक्त केला.
ADVERTISEMENT