पाटणा: बिहारची राजधानी पाटणामध्ये (Patana) आज (23 जून) देशातील सर्व विरोधी पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बिहारच्या या बैठकीचं आयोजन मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी केलं होतं. या बैठकीत काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतचे अनेक महत्त्वाचे नेते सहभागी झाले होते. ज्यामध्ये महाराष्ट्रातून शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे देखील होते. मात्र, याच बैठकीनंतर जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये शिवसेना (UBT)पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाजूला काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) देखील बसल्या होत्या. ज्यावरुन भाजपला (BJP) आता आयतं कोलीत मिळाल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. (shiv sena ubt uddhav thackeray sitting next mehbooba mufti opposition meeting press conference patna criticized bjp)
ADVERTISEMENT
2019 साली शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन करत भाजपला दूर लोटलं. अशावेळी भाजपकडून सातत्याने शिवसेनेवर टीका करण्यात येत होती की, त्यांनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं. दरम्यान, त्यांच्या याच टीकेला प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे वारंवार भाजपला त्यांच्या काश्मीरमधील सत्तास्थापनेची आठवण करुन द्यायचे. ‘मेहबुबा मुफ्तींसोबत सत्ता स्थापन करताना भाजपचं हिंदुत्व कुठे गेलं होतं?’ अशी टीका ठाकरेंनी वारंवार केली आहे.
भाजपला मिळालं आयतं कोलीत?
दरम्यान, ज्या मेहबुबा मुफ्तींवरुन उद्धव ठाकरे हे भाजपवर टीका करायचे त्याच मेहबुबा मुफ्तींच्या बाजूला आज उद्धव ठाकरेंना बसावं लागलं. भाजपला सत्तेवरुन खाली खेचण्यासाठी विरोधकांची जी बैठक पाटण्यात आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीला उद्धव ठाकरे आणि मेहबुबा मुफ्ती असे दोघेही नेते उपस्थित होते. पत्रकार परिषदेत तर हे दोन्ही नेते अगदी बाजूबाजूला बसले होते.
आता याच मुद्द्यावरुन भाजपने उद्धव ठाकरेंना घेरण्यास सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावरून तात्काळ ठाकरेंवर टीका देखील केली. त्यामुळे आता हा मुद्दा उद्धव ठाकरेंना राजकीय अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा >> Darasha Pawar : राहुल हंडोरे दर्शनाचा नातेवाईक होता का? ओळख झाली तरी कशी?
भाजपला घेरण्यासाठी सर्वपक्षीय विरोधकांची रणनीती
सलग दोन टर्म सत्तेत असलेल्या मोदींना सत्तेतून खाली खेचण्यासाठी विरोधकांनी आता मोट बांधण्यास सुरूवात केली आहे. अशावेळी पाटण्यात पहिली बैठकही पार पडली. आता दुसरी बैठक ही शिमल्यात होणार असून इथे लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपांवर चर्चा होणार आहे. आता भाजपला सत्तेपासून दूर होण्यासाठी विरोधक कोणती रणनिती आखणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
‘गांधींच्या देशाला गोडसेचा देश बनू देणार नाहीत’, मेहबुबा मुफ्तींचा हल्ला
दरम्यान, आज झालेल्या बैठकीत महेबुबा मुफ्ती म्हणाल्या की, ‘आम्ही जर जम्मू-काश्मीरमधून आलो आहोत. मी आणि ओमर साहेब.. देशामध्ये जे घडत आहे.. आपली लोकशाही, आमच्या धर्मनिरपेक्षतेवर हल्ला होत आहे. त्याची प्रयोगशाळा आमचं काश्मीर बनलं आहे. सुरुवात आमच्या जम्मू-काश्मीरपासून झाली आणि आता संपूर्ण देशात तेच होत आहे जे आमच्यासोबत झालं. पण आम्ही ज्या गांधी, नेहरुंच्या देशासोबत हात मिळवला आहे.. ते आयडिया ऑफ इंडिया आहे. जिथे गंगा-जमुना एकत्र नांदतात. आज आपण पाहतोय की, देशामध्ये लोकांसोबत जो व्यवहार केला जात आहे विशेषत: अल्पसंख्यांकांसोबत.. ज्या पद्धतीने लोकशाहीला धोका पोहचवला जात आहे. त्यासाठी आम्ही एकत्र झालो आहोत. आमच्याकडे तशी फार ताकद नाही.. कारण जम्मू-काश्मीरमध्ये फक्त 5-6 जागा आहेत. पण आम्ही समजतो की, आयडिया ऑफ इंडियाचा पाठिंबा हा जम्मू-काश्मीर आहे. आमचा प्रयत्न हाच असेल की, आम्ही गांधींच्या देशाला गोडसेचा देश बनू देणार नाहीत.’
‘मतभिन्नता असू शकते पण…’, पाहा उद्धव ठाकरे काय म्हणाले
पाटण्याच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आपण पाहत आहात की, देशातील प्रमुख नेते हे इथे आले आहेत. सगळ्यांना हे देखील माहिती आहे की, आम्ही वेगवेगळ्या पक्षाचे नेते आहोत. स्वाभाविक आहे की, आमची विचारधारा वेगवेगळी आहे. काही मतभिन्नता असू शकते. पण देश एक आहे. या देशाला वाचविण्यासाठी आणि देशाची अखंडता कायम राखण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.’
हे ही वाचा >> Pune, MPSC: राहुलसोबत लग्नाला नकार, दर्शना पवारच्या कुटुंबीयांनी नव्हे तर…
‘यापुढे जो कोणी आमच्या देशाच्या लोकशाहीवर आघात करेल त्याचा आम्ही विरोध करू. जसं ममता दीदी म्हणाल्या की, विरोधकांची एकता असेल की, नाही.. मी तर मला स्वत:ला विरोधक मानतच नाही. विरोध जरूर.. जे देशद्रोही आहेत, जे देशात हुकूमशाही आणू पाहत आहेत.. त्याविरोधात आम्ही राहू.. मला विश्वास आहे की, जेव्हा सुरुवात चांगली होते तेव्हा पुढे सर्व काही चांगलं होतं.’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.
ADVERTISEMENT