कर्नाटकातील मुख्यमंत्रीपदाबद्दल सलग चार दिवस मंथन झाल्यानंतर काँग्रेस हायकमांडचा निर्णय अखेर झाला आहे. कर्नाटकचे पुढचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे असतील, तर डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी कर्नाटकात सरकार स्थापन करण्यासाठी पक्षातंर्गत एकमत जळवून आणले. 20 मे रोजी दुपारी 12.30 वाजता बंगळुरू येथे शपथविधी सोहळा होणार आहे.
ADVERTISEMENT
काँग्रेस विधिमंडळ पक्षाची (CLP) बैठक आज (18 मे) सायंकाळी 7 वाजता बेंगळुरूमध्ये बोलावण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) च्या केंद्रीय निरीक्षकांना CLP बैठकीसाठी बंगळुरूला पोहोचण्यास सांगण्यात आले आहे. याआधी बुधवारी काँग्रेसचे कर्नाटकचे प्रभारी रणदीप सुरजेवाला यांनी पुढील मुख्यमंत्रिपदाचा निर्णय आज किंवा उद्या घेतला जाईल आणि ७२ तासांत नवीन मंत्रिमंडळ स्थापन केले जाईल, असे सांगितले होते.
Karnataka CM : मध्यरात्री झाली सहमती
बुधवारीही दिल्लीत काँग्रेस हायकमांडसोबत मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारांची बैठकांची प्रदीर्घ मालिका सुरूच होती. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. एकमत करण्यासाठी डीके शिवकुमार यांनाही बैठकीत बसवण्यात आले. आदल्या दिवशी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार आणि ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांच्यात मुख्यमंत्रीपदाबाबत समन्वय झाल्याच्या बातम्या आल्या होत्या.
हेही वाचा >> Karnataka : सर्वात मोठा विजय! BJP, JD(S) चे बालेकिल्ले काँग्रेसने कसे बळकावले?
बंगळुरूमध्ये शपथविधीची तयारी जोरात सुरू असल्याचा दावा करण्यात आला. मात्र सायंकाळपर्यंत पक्षाने याचा इन्कार केला आणि मुख्यमंत्र्यांचे नाव ठरवण्यासाठी अजून 2-3 दिवस वेळ लागेल असे सांगण्यात आले. त्यानंतर मध्यरात्री मुख्यमंत्रिपदाच्या नावावर एकमत झाल्याची बातमी समोर आली.
अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला
प्रत्यक्षात दिवसभराच्या प्रदीर्घ भेटीगाठीत पक्षात अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावरही चर्चा झाली. यावर डीके शिवकुमार यांनीही अट घातली होती. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार डीके शिवकुमार म्हणाले होते की, जरी हा फॉर्म्युला असला तरी सुरुवातीच्या अडीच वर्षांचा कार्यकाळ मला द्यावा, तर दुसरा सिद्धरामय्या यांना द्यावा. डीके शिवकुमार म्हणाले की, मला पहिली टर्म द्यावी अन्यथा मला काहीही नको. अशा परिस्थितीतही मी गप्प राहीन. यासोबतच डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपदासाठीही साफ नकार दिला होता.
हेही वाचा >> Karnataka Results 2023 : भाजपचं टेन्शन वाढलं! 2024 मध्ये असा होणार परिणाम?
काँग्रेस हायकमांडच्या मनात काय?
डीके शिवकुमार यांनी बुधवारी पुन्हा एकदा मल्लिकार्जुन खरगे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डीके आपल्या अटीवरून माघार घ्यायला तयार नव्हते आणि ते उपमुख्यमंत्री पद स्वीकारत नव्हते. नंतर पक्ष हायकमांडने बोलून त्यांना विश्वासात घेतले. सिद्धरामय्या किंवा डीके हे दोघेही एकटे शपथ घेऊ शकत नाहीत, असा पक्ष हायकमांडचं म्हणणं होतं. निवडणुकीतील विजय सामूहिक नेतृत्वामुळे झाला असून सर्वोच्च नेतृत्वाला कोणत्याही किंमतीत ‘वन मॅन शो’ नको होता.
सिद्धरामय्या, शिवकुमार यांनी बाळगलं मौन
त्याचवेळी मुख्यमंत्रीपदाचे दोन्ही दावेदार दोन दिवसांपासून राजधानीत तळ ठोकून होते. दरम्यान, दोन्ही नेत्यांनी असे कोणतेही विधान किंवा प्रस्ताव देण्याचे टाळले, त्यामुळे पक्षाला कोंडीत पकडल्यासारखं होईल.
हेही वाचा >> Karnataka Election Result : भाजपला ‘या’ चुका भोवल्या, पराभवाची 6 कारणे
कर्नाटकात काँग्रेसने 135 जागा जिंकत मिळवले स्पष्ट बहुमत
10 मे रोजी झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जबरदस्त विजय मिळवला. पक्षाने 224 पैकी 135 जागा जिंकल्या आहेत. भाजपला राज्यातून हद्दपार करण्यात आले आहे. भाजप 66 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर जेडीएसला केवळ 19 जागा मिळाल्या आहेत. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्याच्या पुढील मुख्यमंत्र्याबाबत काँग्रेसमधील कसरत अधिक तीव्र झाली होती.
ADVERTISEMENT