मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 21 दिवसांनी म्हणजे रविवारी (15 डिसेंबर) महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. यावेळी एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यात 6 राज्यमंत्री आहेत. यापूर्वी 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मंत्रिमंडळात एकूण 43 सदस्यांचा समावेश केला जाऊ शकतो. म्हणजे एक मंत्रिपद अद्यापही शिल्लक ठेवण्यात आलं आहे. मात्र, असलं तरी अवघ्या अडीच महिन्यात देखील खराब कामगिरी असणाऱ्या मंत्र्याचं मंत्रिपद हे जाऊ शकतं. त्यामुळे महायुतीतील मंत्र्यांचे धाबे आधीच दणाणले आहेत.
ADVERTISEMENT
फडणवीस मंत्रिमंडळात 42 सदस्य सामील झाले आहेत. एक-दोन दिवसांत मंत्रालयाचेही विभाजन होणार आहे. संख्याबळ एकमताने ठरले असून मंत्र्यांची नावे एकमताने ठरल्याचे महायुतीचे म्हणणे आहे. पुढील खातेवाटप देखील संमतीने वितरित केले जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही शपथ घेतल्यानंतर चांगली कामगिरी करणारेच भविष्यात मंत्री राहू शकतील, असे स्पष्ट केले. याचाच अर्थ वादात अडकलेल्या मंत्र्यांना फार काळ खपवून घेतले जाणार नाही.
हे ही वाचा>> Sudhir Mungantiwar: "मंत्रिमंडळात माझं नाव असल्याचं सांगितलं आणि..."; सुधीर मुनगंटीवारांनी सगळंच सांगून टाकलं
'अडीच महिन्यांतही मंत्री बदलू...'
महाराष्ट्रातील मंत्र्यांबाबत अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्याची बाबही समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून मंत्री झालेल्या नेत्यांना प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे. मात्र, फडणवीस यांनी कालमर्यादा नमूद केलेली नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांना अडीच वर्षांचा कालावधी मिळेल आणि जे दाखवतील त्यांची प्रगती होईल. अजित पवार म्हणाले, चांगली कामगिरी न करणाऱ्यांना अडीच महिन्यातही बदलता येईल.
...तर मंत्रिमंडळातून लगेच मिळेल डच्चू!
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, 'आम्ही सर्व मंत्र्यांच्या कामगिरीचे ऑडिट करणार असून ऑडिटमध्ये जे मंत्री योग्य काम करत नसल्याचे आढळून आल्यास त्या मंत्र्यांच्या नावाचा फेरविचार करण्यात येईल. म्हणजे त्या मंत्र्याचा पत्ता कापून नवीन आमदाराला मंत्री करून संधी दिली जाईल. मंत्रिमंडळात स्थान न मिळवू शकलेल्या भाजप नेत्यांना संघटनात्मक भूमिका दिल्या जाऊ शकतात.'
हे ही वाचा>> Chhagan Bhujbal: छगन भुजबळ राष्ट्रवादीला करणार बायबाय? अजितदादांची सोडणार साथ? मोठी अपडेट आली समोर
अडीच वर्षांचा असेल कार्यकाळ...
शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'मंत्र्यांच्या रोटेशन फॉर्म्युल्यावर कोणतीही चर्चा नाही. प्रत्येक मंत्र्याला अडीच वर्षांचा कार्यकाळ देण्याचा निर्णय आमच्या पक्षाने घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एकतर काम करा किंवा राजीनामा द्या हा नियम लागू केला जाईल. चांगली कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांना पुढे जाण्याची संधी मिळेल. या नियमामुळे अधिकाधिक आमदारांना कामगिरी करण्याची संधी मिळणार असून, त्याद्वारे ते आपली क्षमता सिद्ध करून पक्षात महत्त्वाची भूमिका बजावू शकतील.'
कोणत्या पक्षाकडे कोणतं खातं?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपकडे गृह, महसूल, पाटबंधारे, शिक्षण अशी महत्त्वाची मंत्रालये असतील. त्याचबरोबर नगरविकास, गृहनिर्माण, उद्योग, वाहतूक, आयटी, पर्यटन ही खाती शिवसेनेला मिळणार आहेत. तर अर्थ, सहकार आणि क्रीडा मंत्रालये राष्ट्रवादीकडे जाऊ शकतात.
ADVERTISEMENT