Uddhav Thackeray vs Eknath shinde, Maharashtra political News : “पक्ष चोरला, नाव चोरलं, बाप चोरायचा प्रयत्न केला… आता हेही?”, असा सवाल करत शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र डागलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ राजस्थानात गेले होते. यावेळी त्यांच्या रॅलीचे पोस्टर समोर आले. या पोस्टर एकनाथ शिंदे यांच्यासाठी वापरलेल्या एका शब्दावरून ठाकरे गटाला संताप अनावर झाला.
ADVERTISEMENT
राजस्थानातील हवामहल विधानसभा मतदारसंघातून भाजपचे बालमुकुंदाचार्य महाराज (हाथोज धाम) निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वाहन रॅली आयोजित करण्यात आली होती. त्यांच्या रॅलीचे पोस्टर शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शेअर केले आहे.
हिंदुह्रदयसम्राट एकनाथ शिंदे
भाजप उमेदवाराकडून तयार करण्यात आलेल्या पोस्टरवर एकनाथ शिंदे यांचा उल्लेख हिंदुह्रदयसम्राट असा करण्यात आलेला आहे. त्यावरुनच ठाकरे गटाने एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा >> ‘ही पद्धत पक्षपाती”, ठाकरे गटाचा विधानसभा अध्यक्षांवर गंभीर आरोप
ठाकरे गटाने ट्विट करत म्हटलं आहे की, निर्लज्जपणाचा कळस! हिंदुह्रदयसम्राट पद पळवण्याचं धाडस? पक्ष चोरला, नाव चोरलं, बाप चोरायचा प्रयत्न केला… आता हेही? किती तो निर्लज्जपणा?”, असे म्हणत शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) टीकेचा बाण डागला आहे.
हेही वाचा >> ‘ठाकरेंचा ‘तो’ व्हिप बोगस, खोटा..’, शिंदेंच्या वकिलांचा खळबळजनक आरोप
“जगात ‘हिंदुहृदयसम्राट’ फक्त एकच… वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे! त्यांच्या आधी ना कोणी होता, त्यांच्यानंतर ना कोणी होऊ शकेल! जनता दूधखुळी नाहीये, सगळ्याचा हिशोब होणार”, असा इशारा शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) एकनाथ शिंदेंना दिला आहे.
डबल इंजिन सरकार आणा -एकनाथ शिंदे
राजस्थानातील प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारांना राजस्थानात डबल इंजिन सरकार आणण्याचे आवाहन केले. राजस्थान महाराणा प्रतापांची भूमी आहे आणि मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातून आलो आहे. देशाला आणि राज्याला प्रगतीपथावर न्यायचे असेल, तर एकाच विचारांचे सरकार आवश्यक आहे, असे शिंदे म्हणाले.
ADVERTISEMENT