Uddhav Thackeray-Amit Shah News : अमित शाह पुण्यात येऊन गेले. यावेळी एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं तोंडभरून कौतुक केलं. शाहांचं कौतुक करताना देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते की, त्यांना महाराष्ट्र चांगला कळतो. शिंदे, पवार आणि फडणवीसांनी उधळलेल्या स्तुतीसुमनांवरून आता उद्धव ठाकरेंनी सामना अग्रलेखातून अमित शाहांवर हल्ला चढवलाय.
ADVERTISEMENT
‘अमित शाहांना महाराष्ट्र कळतो म्हणजे नक्की काय?’, या मथळ्याखाली सामनात अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. यात सुरुवातीलाच ‘पुण्यातील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी गृहमंत्री शाह यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. फडणवीस यांनी इतके केले. मग मुख्यमंत्री मिंधे आणि अजित पवार तरी कसे मागे राहतील? त्यांचीही गाडी सुसाट सुटली’, असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे आणि पवार-फडणवीसांना लक्ष्य करण्यात आलंय.
ठाकरेंच्या शिवसेनेने म्हटलं आहे की, “शाह यांचा जन्म मुंबईतला, शाह यांनी मुंबईत व्यापार केला आहे. कारखाना चालवला आहे. त्यांना महाराष्ट्र चांगला कळतो, असे प्रशस्तीपत्र फडणवीसांनी द्यावे यात आश्चर्य वाटावे असे काहीच नाही. जे व्यापारी डोक्याचे आहेत त्यांना मुंबईचे महत्त्व माहीत असायलाच हवे. पोर्तुगीजांनी मुंबईत व्यापार केला. त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने मुंबईस व्यापारी केंद्र बनवले. आता हे नवे शेठ मंडळ आले.”
शेठ मंडळ… मोदी शाहांवर हल्ला
“मुंबईचे महत्त्व कमी व्हावे. मुंबई कमजोर पडावी यासाठी हे ‘शेठ मंडळ’ नेहमीच पडद्यामागून कारस्थाने करीत आले. गेल्या आठ-नऊ वर्षांत या कारस्थानांना जास्तच विष चढले आहे. कारण देशाची सूत्रे गुजरातच्या ताब्यात असून मुंबई-महाराष्ट्र कमजोर करण्याच्या डावपेचांना निरंकुश सत्तेमुळे बहार आली आहे. महाराष्ट्रातले सध्याचे सरकार त्याच हेतूने बसवले गेले आहे व महाराष्ट्राची लूट मिंधे सरकार उघड्या डोळ्यांनी पाहत आहे”, असं ठाकरेंच्या शिवसेनेनं अग्रलेखात म्हटलं आहे.
वाचा >> ‘हीच जागा योग्य होती, पण…’; अमित शाहांचं विधान ऐकून अजित पवारांनी जोडले हात
“फडणवीस म्हणतात, शाह यांचा जन्म मुंबईत झाला. होय, झाला असेल. या मुंबईत अनेक महान लोकांनी जन्म घेतला. राजीव गांधी यांचाही जन्म मुंबईत झाला. शाहांनी महाराष्ट्रात त्यांचा कारखाना चालवला यात उपकार काय? मोदी-शाह यांच्या काळात महाराष्ट्रातील मोठमोठे उद्योग, कार्यालये त्यांनी हलवून गुजरातला नेली. मुंबईत जन्म घेतल्याचे असे पांग ते फेडत आहेत काय?”, असा सवाल ठाकरेंनी केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सवाल
“सत्तेवर सर्व मिंधे, पण बादशाही गुजरातकडे असे जे चित्र दिसत आहे ते महाराष्ट्राच्या स्वाभिमानास ठेच पोहोचविणारे आहे. मिंधे मुख्यमंत्री म्हणाले, शाह हे महाराष्ट्राचे जावई आहेत. मग हुंडा म्हणून ते महाराष्ट्रातील उद्योग, गुंतवणूक, मुंबईतील धनसंपत्ती गुजरातेत घेऊन चालले आहेत काय? याचे उत्तर द्या”, असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेने शिंदेंनाही घेरलं आहे.
अजित पवारांची खिल्ली
अजित पवारांनी अमित शाहांचं कौतुक केलं. त्यावर अग्रलेखात म्हटलंय की, “अजित पवार हे तर इतक्या ओशाळवाण्या पद्धतीने बोलत आहेत की, त्यांना पाठकणा आहे की नाही? असा प्रश्न पडू लागला आहे. ‘महाराष्ट्राचे एकमेव हितकर्ते अमित शहाच,’ अशी भाषणे अजित पवार करू लागले आहेत. आम्हाला त्यांच्या प्रकृतीची चिंता वाटत आहे. अमित शाह यांनी महाराष्ट्राच्या कोणत्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेतली? मुंबईत जन्मले, महाराष्ट्राचे जावई झाले, येथे कारखाना चालवला, यात महाराष्ट्राला काय मिळाले?”, असा सवाल अजित पवारांना ठाकरेंच्या शिवसेनेने केला आहे.
वाचा >> Ajit Pawar भाजपसोबत हा अमित शाहांचा प्लॅन? एका वाक्याने मोठा खुलासा
“गुजरातने डहाणूच्या सीमेत घुसून दोन किलोमीटरचा भूभाग कब्जात घेतला. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यावर काय भूमिका घेणार आहेत? अमित शहा हे मुंबई महापालिकेच्या निवडणुका घ्यायला तयार नाहीत. प्रशासकाच्या माध्यमातून मुंबईची लूट करीत आहेत. मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे, असे भाजपला वाटते. त्यामुळे भाजप कोंबडीच मारून खात आहे. कारण फडणवीस म्हणतात ते खरे आहे. शाहांना मुंबई चांगली कळते. शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत. त्यांना सर्व कळते, पण मणिपुरात नेमके काय घडते आहे व हिंसाचार कसा थांबवायचा ते कळत नाही हे आश्चर्यच म्हणायला हवे”, असा खोचक टोला शाहांना लगावला आहे.
वाचा >> केजरीवालांना BJP कडून मोठा धक्का, पहिल्याच परीक्षेत ‘INDIA’ फेल
“मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, शाह हे कष्टाळू आहेत. मात्र मुंबईसह महाराष्ट्र हा मऱ्हाटी माणसांच्या कष्टातून, रक्तातून निर्माण झाला याचा विसर मिंध्यांना पडलेला दिसतो. महाराष्ट्रात दंगली पेटाव्यात व त्यातून भाजपला राजकीय लाभ मिळावा असे एक कारस्थान रचले जात आहे. सर्वज्ञानी गृहमंत्र्यांपर्यंत ही खबर गेली असेलच”, असंही अग्रलेखात म्हटलं गेलं आहे.
मोदी-शाहांना व्यापारी म्हणत इशारा
“पोर्तुगीज, ईस्ट इंडियाचे व्यापारी आले-गेले तसे सध्याचे धनिक व शेठ मंडळांचे सावटही दूर होईल. फडणवीस म्हणतात की, अमित शाह यांना महाराष्ट्र चांगला कळतो. बहुधा म्हणूनच ते मुंबई व महाराष्ट्रात निवडणुका घ्यायला धजावत नाहीत. व्यापारी बहुमत विकत घेतात, पण जनतेस सामोरे जात नाहीत. हे जुलमाचे व्यापारी राज्य लवकरच उलथे पडेल. देशात तसेच वारे वाहत आहेत”, असा इशारा ठाकरेच्या शिवसेनेने दिला आहे.
ADVERTISEMENT