Uddhav Thackeray INDIA Alliance Meet : इंडिया आघाडीची दिल्लीत बैठक होत आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी बोलावलेल्या बैठकीला शिवसेनेचे (यूबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. बैठकीत सहभागी होण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना इंडिया आघाडीच्या चेहऱ्याबद्दल मोठं विधान केले.
ADVERTISEMENT
उद्धव ठाकरे दिल्लीत बोलताना म्हणाले, “तीन-चार राज्यात निवडणुका होत्या. त्या निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि त्या राज्यातील इंडिया आघाडीतील सामील असलेले आणि नसलेले पक्ष होते. पण एवढ्या कालावधीनंतर ‘इंडिया’ची बैठक होत आहे. साहजिकच आहे की, निवडणूक निकालांवर चर्चा होईल. डिसेंबर संपला. पुढील वर्षी निवडणुका वेळापत्रकानुसार होतील, त्याच्या तयारीला सगळ्यांनी लागण्याची गरज आहे. बाकीच्यांच्या सूचना काय असेल, त्यानंतर आमच्या सूचना मांडू”, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.
इंडिया आघाडीचा चेहरा ठरवावा लागेल -ठाकरे
“इंडिया आघाडीला चेहरा असणं गरजेचं आहे का? या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, “शेवटी मोदीजींसमोर चेहरा हा एक विषय असला, तरी देखील या आघाडीला समन्वयक, निमंत्रक त्याचबरोबर एक चेहरा आज नाही तर उद्या ठरवावा लागेल. जसं शरद यादव होते. जॉर्ज फर्नांडिस होते”, अशी भूमिका ठाकरेंनी इंडिया आघाडीच्या नेतृत्वाबद्दल मांडली.
हेही वाचा >> आठ पानी सुसाईड नोट, चार नेत्यांची नावे; गळफास लावून शेतकऱ्याने संपवलं आयुष्य
“आमच्या डोक्यामध्ये नेतृत्वाची हवा भरलेली नाही. आम्हाला देश वाचवायचा आहे. कालसुद्धा खासदारांचं निलंबन झालं. हे बघितल्यानंतर देशातील लोकशाही शेवटची घटका मोजतेय का? हा प्रश्न आहे तिला जिवंत ठेवायचं असेल, तर सगळ्यांनी देश सर्वोच्च ठेवायला हवा. त्यासाठी इंडिया म्हणून आम्ही एकत्र आलोय”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
माझी वेडीवाकडी स्वप्न नाहीत, उद्धव ठाकरे काय बोलले?
“मुख्यमंत्रिपदही मला जबाबदारी म्हणून स्वीकारावं लागलं. जेव्हा मला कळलं, तेव्हा मी ते एका क्षणात सोडून दिलं. त्यामुळे माझी कोणतीही वेडीवाकडी स्वप्न नाहीत. माझ्यासमोर देश आहे. माझा महाराष्ट्र आहे. देशातील जनता आहे. कारण जनता आपल्याकडे बघतेय. आम्ही आमची स्वप्न घेऊन व्यक्तीगत… मला पंतप्रधान व्हायचंय… उपयोग काय? जनतेला मी हवा की नको… मी म्हणजे ज्याला पाहिजे असेल तो”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
हेही वाचा >> “राम मंदिर प्राणप्रतिष्ठेला येऊ नका”, अडवाणी-जोशींना का करण्यात आली विनंती?
“पहिला महत्त्वाचा मुद्दा ज्यांच्यामध्ये मतभेद होते, ते इंडिया आघाडीत एकत्र आले आहेत. पूर्वीचे मतभेद काय होते? कोणत्या थराला होते आणि त्यांच्या मनामध्ये अजूनही सुप्तावस्थेत आहेत का? हे तपासून मग त्याची व्याप्ती वाढवता येईल. आता जे आहेत, त्यांना मजबूत करणं महत्त्वाचं आहे”, अशी भूमिका ठाकरेंनी मांडली.
ADVERTISEMENT