Saamana Editorial, Uddhav Thackeray vs Eknath Shinde : उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि समाजवादी पक्षात राजकीय मैत्री झाली. या राजकीय समीकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर बाण डागला. शिंदेंनी केलेल्या टीकेला ठाकरेंच्या सेनेने प्रत्युत्तर दिलं आहे. ‘सामनात ‘मिंध्यांचे ढोंगांतर’ अग्रलेखातून शिंदेंना ग्रंथालयात जाण्याचा सल्ला देत वार करण्यात आलाय.
ADVERTISEMENT
शिवसेनेने म्हटलं आहे की, “मुख्यमंत्री शिंदे हे काही दिवसांचेच पाहुणे आहेत असा सर्वोच्च न्यायालयाचाच निवाडा आहे. त्यांचे मुख्यमंत्रीपद जसे बेकायदा आहे तसे त्यांचे हिंदुत्वदेखील ढोंगी आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘ढोंगांतर’ करून जे हिंदुत्व स्वीकारले ते बेगडी आहे. शिंदे आता म्हणतात, उद्धव ठाकरेंना हिंदुत्ववादी म्हणवून घेण्याचा अधिकार नाही. मुख्यमंत्री आणखी बरेच काही बरळले. ते त्यांचे राजकीय वैफल्य आहे.”
शिदेंच्या टीकेला ठाकरें गटाचं उत्तर…
“अन्नात भेसळ करणाऱ्यांना जर हे महाशय मिलावटराम म्हणत असतील तर ज्यांनी तुमच्या ताटात आतापर्यंत सुग्रास जेवण वाढले ते जेवण ओरपून बेइमानी करणाऱ्यांना ‘नमकहराम’ म्हटले पाहिजे. आता या नमकहरामांचे हिंदुत्व किती पुचाट आहे ते पहा. अहमदाबादेत ‘वर्ल्ड कप’ क्रिकेटचे सामने सुरू आहेत. तेथे पाकिस्तानचा संघ उतरला तेव्हा अहमदाबाद विमानतळापासून ते नरेंद मोदी स्टेडियमपर्यंत पाकडय़ांच्या स्वागतासाठी भाजपने म्हणजे ‘मोदी-शाह’ सरकारने लाल गालिचे अंथरले व पाकड्या खेळाडूंवर फुलांचा वर्षाव करून स्वागत केले. हेच काय तुमचे ‘मिंधे’ छाप हिंदुत्व? यावर मिंधे म्हणतात, ‘खेळ व धर्माची गल्लत करू नका.’ वा! हे कोणी सांगावे, तर ज्यांनी इमान आणि सत्ता यांची गल्लत केली आहे त्यांनी? मुळात असे सांगणे हा मिलावटी हिंदुत्वाचा प्रकार तर आहेच, पण नमकहरामीचे टोक आहे”, असे प्रत्युत्तर ठाकरे गटाने शिंदेंच्या टीकेला दिले आहे.
सामना अग्रलेखात काय काय म्हटलंय?
“पाकिस्तान व हिंदुत्वाचा जेव्हा जेव्हा प्रश्न आला तेव्हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका कठोर होती. ‘जोपर्यंत कश्मीरातील हिंदूंचा रक्तपात थांबत नाही तोपर्यंत पाकडय़ांचे पाय माझ्या देशात पडू देणार नाही,’ या शिवसेनाप्रमुखांच्या भूमिकेचा मिंध्यांना विसर पडलेला दिसतो. पाकड्यांचे स्वागत करणे, कश्मीरात पंडित व जवान मारले जात असताना तोंडात मिठाची गुळणी घेऊन बसणे हे हिंदुत्व नसून नामर्दानगीच आहे”, अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेने केली आहे.
हेही वाचा >> ‘मी कुणाचीच…’, अजितदादांनी सोडलं मौन, मीरा बोरवणकरांना प्रत्त्युतर
“शिवसेना व समाजवादी विचारांच्या मंडळींचे मनोमीलन झाल्याबद्दल मिंधे गटाच्या दाढीला आग लागली आहे. बाळासाहेब ठाकरे यांना हे पटले नसते वगैरे मुक्ताफळे त्यांनी उधळली आहेत. शिवसेना व समाजवादी एकत्र आले हे भाजपास पटलेले दिसत नाही. म्हणून मुख्यमंत्री मिरच्या झोंबल्याप्रमाणे तडतडत आहेत”, असा टोला ठाकरेंनी शिंदेंना लगावला आहे.
समाजवाद्यांचा इतिहास, शिंदेंना वाचनाचा सल्ला
“महाराष्ट्र व राष्ट्र जाती-धर्माच्या नावाने पेटवून फोडण्याचे कारस्थान त्यांनी रचलेले नाही. देशाच्या स्वातंत्र्यलढय़ात समाजवादी उघडपणे सहभागी होते व देश स्वतंत्र झाल्यावर समाजवाद्यांनी आपापल्या घरावर तिरंगे फडकवून स्वातंत्र्याचे स्वागत केले”, असे म्हणत शिंदेंनी केलेल्या टीकेला ठाकरेंनी उत्तर दिले आहे.
हेही वाचा >> ‘ज्यांनी बाळासाहेबांना आयुष्यभर…’, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
पुढे म्हटलं आहे की, “समाजवादी हे धर्मनिरपेक्ष, तरीही वाजपेयींच्या सरकारात ते सामील झाले. समाजवादी सरकारात आल्याने भाजपचे ‘हिंदुत्व’ मिलावटीराम झाले नव्हते काय? मुख्यमंत्री शिंदे यांनी पुढच्या काळात विधिमंडळ ग्रंथालयाचा वापर करणे गरजेचे आहे. इतिहासाची पाने चाळली तर त्यांच्या अगाध ज्ञानाची त्यांनाच लाज वाटेल. ‘उचलली जीभ लावली टाळय़ाला’ हा त्यांचा प्रकार राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवत आहे. मिंध्यांनी पक्षांतर केले व ढोंगांतरही केले. त्यातून निर्माण झालेला ‘माजवाद’ जनता कायमचा गाडेल”, अशा शब्दात ठाकरेंनी शिंदेंवर वार केला आहे.
ADVERTISEMENT